कै. ती. धोंडूशास्त्री कस्तापूरकर उर्फ 'दुर्गा' | पं. सुहास दातार
मास्तर कृष्णरावांचे एकमेवाद्वितीय गुरुवर्य देवगंधर्व गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले यांचे नातू पं. सुहास दातार हे बुवांच्या धाकट्या कन्या प्रमिलाबाई दातार यांचे ज्येष्ठ सुपुत्र. घरात संगीत नांदत होतेच; शिवाय भारत गायन समाजाच्या वास्तूत तळमजल्यावर दातार कुटुंबीय राहत असल्याने यांच्या मनावर नकळत्या वयापासून संगीताचे संस्कार होत गेले. त्यांना अगदी बालवयापासूनच मास्तर कृष्णराव यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व व त्यांचे भारत गायन समाजातील मैफिलींमधील रंगतदार गायन यांनी मनास भुरळ घातली होती. मास्तरांच्या गायकीचे मनावरील गारुड व ही गायकी आत्मसात करण्याची प्रबळ इच्छा असल्याने त्यांनी पुढे एकूण वीस वर्षे मास्तरांकडे प्रत्यक्ष गंडाबद्ध संगीत तालीम घेतली. मास्तरांनी पं. दातार यांना बुवांनी त्यांना शिकवलेली आग्रा, ग्वाल्हेर व जयपूर अशा तिन्ही घराण्यांची वैशिष्टये असलेली दमदार गायकी शिकवली. विविध स्वरचित राग, चीजा व जोड रागांची तालीम दिली. शिवाय, उ.दौलत खाँसाहेब यांच्याकडून त्यांनी शिकलेल्या अनवट रागांतील बंदीशी इत्यादी सर्व काही भरभरून शिकवले. गुरुवर्य बुवांचे नातू म्हणून मास्तरांना यांच्याबद्दल अतिशय जिव्हाळा व माया वाटायची. मास्तर स्वभावाने अत्यंत ऋजु, प्रेमळ व अजातशत्रू होते.
मास्तरांच्या या शिष्योत्तमाने शाळेतील गणित शिक्षकाची नोकरी सांभाळून अनेक नवोदितांना शास्त्रीय संगीत शिकवले; तसेच शैला दातार, मधुवंती दांडेकर, पं.उल्हास कशाळकर, पं.अरविंद थत्ते, पं.राजेंद्र मणेरीकर, डॉ.राम नेने, सुयोग कुंडलकर, डॉ.चैतन्य कुंटे अशा अनेक कलावंतांना देखील मास्तरांच्या चीजांबद्दल वेळोवेळी संगीत मार्गदर्शन करून मास्तरांच्या गायकीचे मनोज्ञ दर्शन घडवले. यांनी आजीवन भारत गायन समाजात निष्ठेने विद्यादान व संस्थेचा कारभार सांभाळण्याचे मोठे कार्य केले. याशिवाय दातार कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र असल्याने घरात सर्वांचे 'दादा' म्हणून त्यांनी आयुष्यभर सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या. साधी राहणी व उच्च विचारसरणी या उक्तीचे ते मूर्तिमंत प्रतीक होते.
या व्रतस्थ स्वरयोगीला मास्तरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात एप्रिल २०२२ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे कै. माधव कृष्णराव उर्फ राजाभाऊ फुलंब्रीकर पुरस्कृत 'मास्टर कृष्णराव स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
योगायोग असा की पं.सुहास दातार यांचे गुरुवर्य मास्तरांच्याच पुण्यतिथीला म्हणजे श्री ललिता पंचमी या शुभदिनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी निर्वाण झाले.