देशभक्त कलावंत मास्तर कृष्णराव

महान स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांनी रुजवलेला हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचा आणि देशाभिमानाचा संस्कार संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव (कृष्णामास्तर किंवा नुसते मास्तर हे नाव महाराष्ट्रात अधिक प्रचलित) यांच्या मनावर बालवयापासूनच खोलवर उमटला होता. यामुळेच त्यांच्या हातून जीवनभर संगीताच्या माध्यमातून थोर देशसेवा घडत गेली. विशेषतः वंदे मातरम् हे भारतमातेचे स्तवन स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे हा ध्यास त्यांनी अगदी तरुण वयापासूनच घेतला होता. याकरिता त्यांच्या हातून जे अथक प्रयत्न व तेजस्वी कार्य घडले त्यांचे मूळ प्रेरणास्थान आदरणीय लोकमान्य टिळकच असे मास्तर कृष्णराव अनेकदा जाहीरपणे नमूद करत असत.

' स्वकृत चालीत वंदे मातरम् '

१९३४ साली पुणे येथील प्रभात फिल्म कंपनीत 'धर्मात्मा' या संतपटाचे संगीतकार म्हणून मास्तरांनी प्रवेश केला. त्यावेळी प्रभात कंपनीचे एक भागीदार असलेले चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या संमतीने मास्तरांनी प्रभातच्या म्युझिक स्टुडिओमध्ये वंदे मातरम् ह्या सर्वांना वंदनीय असणाऱ्या गीतास राष्ट्रगीताच्या दृष्टिकोनातून सुयोग्य चाल देण्याचे कल्पक प्रयोग सुरू केले होते. त्यावेळी या प्रतिभावान कलावंताने भूप, पहाडी अशा प्रचलित रागात वंदे मातरम् गीतास चाली लावण्याचे प्रयोग करून पाहिले. प्रभात कंपनीमधील गायक व वाद्यवृंद यांच्या साथीने त्यांनी ते प्रयोग केले होते. अनेक दिवस त्यांचे या गीताविषयी सखोल चिंतन सुरू होते आणि शेवटी सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना अगदी लहान मुलांनादेखील सांघिकरित्या सहजपणे गायला शक्य होईल असा मुख्यत्वे मंद्र व मध्य सप्तकात गायला जाणारा 'झिंझोटी' हा राग त्यांनी वंदे मातरम् साठी निश्चित करून त्या रागात या गीतास सुलभ चाल लावली. त्यांनी हे गीत प्रभातच्या म्युझिक स्टुडिओत ध्वनिमुद्रितदेखील केले. झिंझोटी या रागास त्यांनी 'राष्ट्रीय राग' असे संबोधले. १९३६ साली झालेल्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये मास्तर कृष्णरावांनी गायलेल्या या वंदे मातरम् ची ध्वनिमुद्रिका स्वातंत्र्यपूर्व भारताचे राष्ट्रगीत म्हणून प्रथम वाजवली गेली होती.

गायनाचार्य स्वरभास्कर पं. बखलेबुवांचे गंडाबद्ध पट्टशिष्य असलेले मास्तर कृष्णराव एक बुद्धिवान व तयारीचे शास्त्रीय गायक असल्यामुळे त्यांच्या संगीत मैफलीत ते 'करीन यदुमनी सदना', 'ललना मना' अशी नाट्यगीते, 'राधिका चतुर बोले', 'मन पापी भुला' अशी चित्रपट गीते, 'परब्रह्म निष्काम तो हा' सारखे अभंगदेखील दरवेळी नवनवीन सांगीतिक हरकती घेत गायकी अंगाने विस्तार करून सादर करायचे. परंतु त्यांनी गायन मैफलीत वंदे मातरम् हे गीत कधीच गायकी अंगाने विस्तारपूर्वक सादर केले नाही. याचे कारण म्हणजे हे सर्वांना वंदनीय असे गीत स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे हाच एकमेव ध्यास त्यांनी तरुण वयापासून घेतलेला होता. भारत देश गुलामगिरीत असतानादेखील मास्तर त्यांच्या संगीत मैफलीत नानाविध प्रांतातील, धर्मांतील उपस्थित श्रोत्यांसमोर वंदे मातरम् हे गीत संपूर्ण कडव्यांसहीत झिंझोटी रागात राष्ट्रगीतासारखेच गाऊन सादर करत असत.

' सर्वांत पहिला वंदे मातरम् दिन '

भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती तरी भारतामध्ये सर्वांत पहिला वंदे मातरम् दिन पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे १९३७ साली स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट अशा थोर नेत्यांच्या उपस्थितीत भव्यरित्या समारंभपूर्वक साजरा करण्यात आला होता. तेव्हा लोकमान्य टिळकांचे नातू श्री. ग. वि.केतकर यांच्या पुढाकाराने मादाम कामाचा आद्य वंदे मातरम् ध्वज अगदी वाजत गाजत धुमधडाक्यात टिळक स्मारक मंदिरात आणला होता. त्यावेळी मास्तर कृष्णराव यांनी मिश्र झिंझोटी या रागात स्वकृत चालीतील वंदे मातरम् संपूर्ण कडव्यांसहित भावपूर्णतेने म्हटले. तेव्हा मास्तरांचा श्री. ल. ब.भोपटकर यांनी सत्कार केला तर स्वा. तात्याराव सावरकर यांनी त्यांचे कौतुक करून गौरव केला. दैनिक केसरीमध्ये या समारंभावर विस्तृत लेख प्रसिद्ध झाला होता.

सरोजिनीदेवी नायडू तर मास्तरांना 'वंदे मातरम् वाले मास्टर कृष्णराव' असे त्यांच्या भाषणात आणि लेखी पत्रात संबोधायच्या. त्यांच्या हस्ते मास्तरांचा १९४१ साली मुंबई येथील सेंट झेवियर कॉलेजमध्ये वंदे मातरम् च्या सातत्याने करत असलेल्या प्रचार व प्रसार या कार्याबद्दल सत्कार केला होता; तेव्हा त्यांनी 'गायकांचा नेता' अशी बिरुदावली देऊन मास्तरांचा गौरव केला होता. तसेच मुंबईच्या गोवालिया टॅंकवर ८ ऑगस्ट १९४२ रोजी भरलेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक ' चले जाव ' अधिवेशनात वंदे मातरम् गीत गायनासाठी एकमेव कृष्णामास्तरांचीच निवड करण्यात आली होती.

' रेडियोवर बहिष्कार '

मास्तर कृष्णराव एक सच्चे देशभक्त असल्यामुळे आपल्या अनेक गानमैफलींच्या उत्तरार्धात स्वतः संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् चे राष्ट्रगीतासारखे गायन करून आपल्या संगीत मैफलीचा शेवट करीत असत. मात्र त्याकाळातील ब्रिटिश राजवटीत वंदे मातरम् जाहीरपणे गायला सरकारी पातळीवर बंदी होती. तरीसुद्धा मास्तरांनी रेडियोवरील त्यांच्या एका गाण्याच्या कार्यक्रमात नाट्यपदाला जोडून अचानक वंदे मातरम् चे गायन सुरू केले. हे लक्षात येताच स्टेशन डायरेक्टर श्री.बुखारी यांनी तातडीने ध्वनिक्षेपक बंद केले. याचा परिणाम म्हणून मास्तरांनी रेडियोवर गाण्यास पूर्णपणे बहिष्कार टाकला. त्याकाळी दूरदर्शनचे भारतात आगमन झालेले नव्हते म्हणून रेडियो (इंडिया स्टेट ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) हेच कलावंतांचे उपजीविकेचे आणि रसिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रमुख साधन होते. मास्तरांना रेडियोवर वंदे मातरम् गाऊ न दिल्याच्या घटनेचा भारतातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पुढे स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात असताना १९४७ साली गुढी पाडव्याच्या सुमुहूर्तावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीमुळे रेडियो (आकाशवाणी) ने मास्तरांना वंदे मातरम् गायला सन्मानाने आमंत्रित केले. तेव्हा मास्तरांनी आकाशवाणीवर वंदे मातरम् गाऊन बहिष्कार मागे घेत आपल्या रेडियोवरील सांगीतिक कारकिर्दीस पुन्हा प्रारंभ केला. पुढे आकाशवाणीच्या विनंतीनुसार नव्यानेच सुरू झालेल्या पुणे आकाशवाणीचे अधिकृत संगीतकार, शास्त्रीय गायक व सल्लागार म्हणून मास्तरांनी काही काळ कार्य केले.

'राष्ट्रगीताकरिता सांगीतिक लढा'

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तरी स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत कोणते असावे? हे निश्चित झाले नव्हते. त्यामुळे १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्रीच्या कार्यक्रमात 'जन गण मन' व 'वंदे मातरम्' ही दोन्ही गीते गायली गेली होती. डिसेंबर १९४७मध्ये घटना समितीच्या कामास सुरुवात झाली. त्यावेळी मास्तरांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंना 'वंदे मातरम् विषयी एक संगीततज्ञ म्हणून माझे मत ऐकावे' अशी दिल्लीला तार केली. तार मिळताच पं.नेहरूंनी त्वरित उत्तर धाडले. त्यांनी त्यात मास्तरांना दिल्लीला भेटण्याकरिता व सादरीकरणासाठी निमंत्रण पाठवले. मास्तरांनी दिल्लीत पं. नेहरू, डॉ.राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, काकासाहेब गाडगीळ, ग.वा.मावळणकर, जे. बी.कृपलानी, सी. राजगोपालाचारी, श्यामा प्रसाद मुखर्जी, बी.एन. राव, सर्वपल्ली राधाकृष्णन, मौलाना आझाद आदी घटना समितीच्या सदस्यांसमोर समुह गायनातील व केवळ वाद्यवृंदातील वंदे मातरम् ची स्वतः कष्टाने तयार केलेली एकूण दोन ध्वनिमुद्रणे ऐकवली. तसेच स्वतः तिथे गायन करून प्रत्यक्ष सादरही करून दाखवली. परंतु पं. नेहरूंनी संयुक्त संघात किंवा परदेशात सहजगत्या वाजविता येईल अशा प्रकारची रचना हवी असे सुचवले. मग मास्तर मुंबई येथील पोलीस बँडचे प्रमुख सी.आर.गार्डनर ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याला या संदर्भात भेटले. मिश्र झिंझोटी रागातील हीच रचना मास्तरांनी श्री.गार्डनर यांच्या मदतीने पाश्चात्य पद्धतीनुसार बँडवर बसवून घेतली. त्याचे पाश्चात्य पद्धतीचे नोटेशन छापून घेतले. या बँडवर वंदे मातरम् च्या संसदेतील सादरीकरणासाठी तीन ध्वनिमुद्रिका तयार केल्या. तसेच नेव्हल बँडचे प्रमुख असलेले श्री. स्टँले हिल्स यांनी देखील ब्रास बँडवर मास्तरांची रचना पाश्चात्य पद्धतीने बसवली. या तीन ध्वनिमुद्रिकांबरोबरच श्री.गार्डनर आणि श्री. हिल्स या पाश्चात्य संगीत तज्ञांचे अभिप्राय, बँड नोटेशन व वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होण्यासाठी स्वतःची संगीतकार म्हणून असलेली मते यांची मास्तरांनी पत्रके छापून घेतली. हे सर्व साहित्य आणि साथीदारांसह मास्तर पुन्हा दिल्लीत पोहोचले. तत्कालीन संसदेमध्ये घटनासमितीच्या सदस्यांसमोर मास्तरांनी वंदे मातरम् ची प्रात्यक्षिके सादर केली. १ मिनीट ५ सेकंदांचे तसेच ध्वजारोहणाच्या वेळी वाजविण्यात येणारे २० सेकंदांचे वंदे मातरम् अशी ध्वनिमुद्रणे ऐकवली.

मास्तरांनी वंदे मातरम् ला दिलेल्या चालीस प्रथमपासून अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते, कलावंत व सामान्य नागरिकांचा भरभक्कम पाठींबा मिळाला होता. या चालीला मास्तरांचे परात्पर गुरू संगीतसम्राट उस्ताद अल्लादिया खांसाहेब यांनी भाषणात व लेखी जाहीर पाठींबा दर्शवला होता; शिवाय विख्यात गायक उस्ताद फैय्याज खांसाहेबांनीदेखील लेखी पाठींबा दिला होता.

अगदी धनिक लोकंदेखील मास्तरांच्या वंदे मातरम् च्या चालीला व हे गीत राष्ट्रगीत व्हावे या मास्तरांच्या प्रचाराला पाठींबा देणारी होती. तरीसुद्धा स्वाभिमानी मास्तरांनी कोणाहीकडून या देश कार्यासाठी आर्थिक मदत न घेता सर्व मेहनत स्वखर्चाने केलेली होती. यासाठी त्यांनी काहीही हातचे न राखता सढळ हाताने सर्व खर्च केला होता. शिवाय अफाट बुद्धी वापरून स्वतः प्रचंड श्रम तर घेतलेच होते. प्रतिभावान मास्तरांनी संगीतात केलेल्या सर्व नवनवीन प्रयोगांना यश लाभले होते; परंतु वंदे मातरम् मात्र यास एकमेव अपवाद ठरले. ते स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून तत्कालीन राज्यकर्त्यांकडून नाकारले गेले व जन गण मन ची राष्ट्रगीत (National anthem) म्हणून त्याजागी वर्णी लागली. स्वातंत्र्यानंतर देशात यावरून वाद नकोत अशी कदाचित राज्यकर्त्यांची धारणा असावी. पण मास्तरांची सर्व मेहनत अगदीच फुकट गेली नाही कारण राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी वंदे मातरम् गीताला राष्ट्रीय गीत (National song) म्हणून मान्यता देऊन राष्ट्रगीता इतकाच समान बहुमान देण्यात येईल असे जाहीर केले. मास्तरांची साहजिकच निराशा झाली होती तरी पण त्यांनी त्यापुढील काळात आयुष्यभर वंदे मातरम् गीताचा प्रचार व प्रसार चालूच ठेवला. अनेक संस्था, शाळा व विद्यालयातील मुलांना त्यांनी वंदे मातरम् सांघिकरित्या बसवून दिले. त्यांनी गायलेल्या वंदे मातरम् ची ध्वनिमुद्रिका अनेक वर्षे महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयांमध्ये नित्यनेमाने वाजवण्यात यायची. तसेच विविध राजकीय, सामाजिक व वैयक्तिक संस्था विशेष कार्यक्रमांच्यावेळी संपूर्ण कडव्यांसहीत वंदे मातरम् प्रत्यक्ष गाऊन सादर करायला मास्तरांना अगत्याने निमंत्रित करत असत.

' जगन्मित्र कलावंत '

मास्तर कृष्णराव हे काँग्रेसच्या निधर्मीवादाचे खंदे समर्थक होते आणि ' सर्व धर्म समभाव ' या तत्त्वाचा प्रत्यक्ष जीवनात यक्तिशः अंगिकार करत आले होते. ते वेद पठण करणाऱ्या ज्ञानी ब्राह्मणांच्या कुटुंबातील असल्यामुळे वृत्तीने अत्यंत धार्मिक व आध्यात्मिक होते; परंतु ते अजिबात कर्मठ आणि बुरसटलेल्या विचारसरणीचे नव्हते. ते कायम व्यक्तीच्या गुणांना श्रेष्ठ मानणारे होते; त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी देखील कायम विविध धर्मातील, पंथातील गुणीजनांची ये-जा असायची. एखादी गोष्ट मनापासून पटली व योग्य वाटली तर त्या गोष्टीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावत झोकून देऊन कार्य करण्याची त्यांची कणखर वृत्ती होती. त्यांचा हाच मूळ स्व-भाव होता; त्यामुळे जवळजवळ सर्वपक्षीयांचा त्यांना वंदे मातरम् च्या वाटचालीत पाठींबा होता. मास्तरांचे सर्व पक्षीयांशी स्नेहत्व होते. ते मुळातच मिश्कील व मनमिळावू असे जगन्मित्र कलावंत असल्याने त्यांनी पुढील काळात तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरूंबाबत आकस न बाळगता त्यांचे राष्ट्रसंगीत हे देशगीतांचे स्वरावलीसहित तयार केलेले पुस्तक स्वतंत्र भारतदेशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पं.नेहरूंनाच अर्पण केले. पं. नेहरूंनी मास्तरांचा देशातील सर्वश्रेष्ठ संगीतकार असा गौरव केला होता; तरीपण घटना समितीच्या सदस्यांचे मतदान न घेता राष्ट्रगीताबाबत त्यांनी एकतर्फीपणे निर्णय घेतला होता. डॉ.राजेंद्रबाबूंनी जन गण मन हे देशाचे राष्ट्रगीत म्हणून जाहीर केले तेव्हा या निर्णयामुळे राष्ट्रगीताकरिता शेवटपर्यंत तन-मन-धन अर्पून झुंजार सांगीतिक लढा दिलेले भावनाप्रधान मास्तर साहजिकच अत्यंत दुखावले गेले होते; परंतु नुसती टीका करण्यात वेळ न घालवता त्यांनी पुढे आयुष्यभर आपल्यापरिने वंदे मातरम् चा प्रचार व प्रसार चालूच ठेवला होता. त्यास मास्तरांच्या संगीताचे चाहते, त्यांचे शिष्य, अनेक क्रांतिकारक, नेते आणि रसिकांनी सकारक प्रतिसाद देऊन त्यात सक्रिय सहभाग घेतला होता. १९५३ साली भारत सरकारतर्फे मास्तरांची भारतीय कलावंतांच्या सांस्कृतिक शिष्टमंडळात निवड झाली होती. तेव्हा त्या कलावंत पथकाला चीन येथे भारतीय कला व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी चीनमध्ये या कलावंत पथकाने सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाचा आरंभ मास्तर इतर कलावंतांच्या साथीने स्वकृत चालीतील वंदे मातरम् हे गीत गाऊन करत असत.

आपली कला राष्ट्रहितासाठी अर्पण करणाऱ्या आणि कलेसाठी स्वाभिमान-राष्ट्राभिमान दाखविणाऱ्या बाणेदार कलावंतांमध्ये संगीतकलानिधी मास्तर कृष्णरावांचे नाव कायम अग्रस्थानी राहिल. या चिकाटीने केलेल्या तेजस्वी कार्याचा गौरव करताना पु.ल.देशपांडे मास्तरांच्या षष्ठयब्दीपूर्ती सोहळ्यामध्ये केलेल्या ध्वनिमुद्रित जाहीर भाषणात म्हणाले, "वंदे मातरम् साठी मास्तरांनी घेतलेले परिश्रम पाहून मास्तरांनाच 'वंदे मास्तरम्' म्हणावेसे वाटते!"

सन २०२२ हे वर्ष ' भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष ' म्हणून विशेष आहे. तसेच हे वर्ष चतुरस्त्र गायक, शास्त्रीय रचनाकार, कल्पक संगीतकार, चित्रपट व संगीत नाट्य अभिनेते अशा भूमिकांतून अनेक सांगीतिक क्षेत्रांत यशस्वी विहार करणाऱ्या, आपल्या प्रसन्न स्वभावाने, दिलखुलास गाण्याने व बोलण्याने संगीत मैफली आणि रसिकांची मनं जिंकणाऱ्या प्रतिभावान मास्तर कृष्णराव यांचे एकशे पंचवीसावे जन्म वर्ष म्हणजेच शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म वर्ष आहे. ह्या औचित्याने या थोर देशभक्त कलावंताच्या दिव्य सांगीतिक लढ्याचे विनम्रपणे केलेले हे संस्मरण!

वंदे मास्तरम्! वंदे मातरम् !! जय हिंद!!!

संवाद व संपर्क

अनुसरण करा