महत्त्वाच्या घटना, पुरस्कार व मानसन्मान

  • सन १८९८
    • २० जानेवारी रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे संध्याकाळी सहा वाजता गोरज मुहूर्तावर जन्म.
  • सन १९११
    • पुणे येथील नाट्यकलाप्रवर्तक संगीत नाटक मंडळीत संत सखुबाई ह्या अत्यंत प्रसिद्ध झालेल्या नाटकात बालगायकनट म्हणून विठोबाची भूमिका केली. या नाटक मंडळीत सवाई गंधर्व यांचे संगीत मार्गदर्शन लाभले. तिथे राजा हरिश्चंद्र नाटकांत संत रोहिदास, सौभद्रमध्ये नारद अशा बालगायक नटाच्या भूमिका गाजल्या. एकूण चार वर्षे नाटकांत काम करून रीतसर शास्त्रीय गायन शिकण्यासाठी ही नाटक कंपनी सोडली.
    • गुरुवर्य पं. भास्करबुवा बखले यांनी यावर्षी स्थापन केलेल्या किर्लोस्कर भारत गायन समाज (पुढे पुणे भारत गायन समाज असे या संस्थेचे नामकरण झाले) या संगीत संस्थेतील पहिले विद्यार्थी होण्याचे भाग्य. पुढे याच संस्थेचे अध्यक्ष म्हणून प्रदीर्घकाळ कार्य. तसेच गुरू म्हणून या संस्थेसाठी संगीत गायन विषयक सरकारमान्य अभ्यासक्रम तयार करून अखेरपर्यंत विद्यादानाचे कार्य. गुरुवर्य बुवांच्या स्मरणार्थ संस्थेत अखेरपर्यंत गायन सेवा सादर.
  • सन १९११
    • गायनाचार्य पं.भास्करबुवा बखले यांचेकडे शास्त्रीय संगीत शिक्षणास प्रारंभ.
    • धुळे येथील कमिन्स क्लबमध्ये वयाच्या तेराव्या वर्षी पहिली जाहीर मैफल गाजवली म्हणून पुणे येथील किर्लोस्कर थिएटरमध्ये साहित्यसम्राट न.चिं.केळकर यांचे हस्ते सुवर्णपदक देऊन सत्कार झाला व मास्टर कृष्णा अशी उपाधी मिळाली.
  • सन १९१५
    • गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश.
  • सन १९२२
    • गुरुवर्य बखलेबुवांचा स्वर्गवास. बुवांची गायन परंपरा पुढे चालवली. जालंधर येथील हरिवल्लभ संगीत सोहळा, मुंबई येथील ब्राह्मण सभा अशा अनेक ठिकाणांहून दरवर्षी बुवांना गायनाचे निमंत्रण यायचे. त्यांची ही सर्व सांगीतिक परंपरा तसेच गधंर्व नाटक मंडळीतील संगीत विभाग मास्तरांनी सांभाळला.
  • सन १९२५
    • सिंध प्रांतातील शिकारपूर येथे होळी उत्सवात गायन सादर केले. तिथे मोठे व्यापारी व गानरसिक असलेले सेठ लक्ष्मीचंद नारंग (उर्फ लालाजी) यांची प्रथम भेट. त्यांनी कराची येथे त्यांच्या निवासस्थानी नेऊन खाजगी गायन कार्यक्रम केला व त्याचे रेकॉर्डिंग केले. आपल्या सर्व गुरुबंधू व गुरुभगिनी यांची लालाजींशी भेट घडवून कराची येथे त्यांच्या संगीत मैफली घडवून आणल्या.
  • सन १९३०
    • श्रीमद शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी नाशिक येथे संगीतकलानिधि पदवी प्रदान केली.
  • सन १९३३
    • १९, २०, २१ ऑगस्ट रोजी सोलापूर येथे भरलेल्या 'महाराष्ट्र प्रांतिक संगीत परिषद' मध्ये सहभाग व त्या प्रसंगी नेमलेल्या संगीतज्ञ मंडळावर नियुक्ती.
  • सन १९३४
    • गंधर्व नाटक मंडळी बंद पडली. धर्मात्मा चित्रपटाकरिता संगीत दिग्दर्शक म्हणून पुणे येथील प्रभात फिल्म कंपनीत प्रवेश.
  • सन १९३६
    • बर्लिन ऑलिंपिकमध्ये कृष्णरावांनी स्वकृत चालीत गायलेल्या वंदे मातरम् ची रेकॉर्ड स्वातंत्र्यपूर्व भारताचे राष्ट्रगीत म्हणून वाजवली.
  • सन १९३७
    • २६ ऑक्टोबर रोजी पुण्यात वंदे मातरम् दिन टिळक स्मारक मंदिरात साजरा झाला. त्यावेळी स्वा. सावरकर, सेनापती बापट, श्री.ल. ब.भोपटकर, श्री.ग.वि. केतकर यांच्या उपस्थितीत प्रचंड जनसमुदायासमोर झिंझोटी रागामध्ये स्वरबद्ध केलेल्या वंदे मातरम् गीताचे गायन केले. गीतास कर्णमधुर व सोपी चाल लावल्याबद्दल श्री. भोपटकर यांनी सत्कार केला.
  • सन १९४१
    • जुलै महिन्यात श्रीमती सरोजिनी नायडू यांचे हस्ते मुंबईतील सेंट झेवीयर कॉलेज हॉल येथे गायन मैफलीनंतर सत्कार व गायकांचा नेता म्हणून गौरव.
  • सन १९४२
    • मुंबईच्या गोवालिया टॅंकवर ८ ऑगस्ट रोजी भरलेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक 'चले जाव' अधिवेशनात वंदे मातरम् गीत गायनासाठी कृष्णामास्तरांचीच निवड झाली.
    • नाट्यनिकेतनचे 'संगीत कुलवधू' हे नाटक प्रदर्शित झाले. बोला अमृत बोला, क्षण आला भाग्याचा, मनरमणा मधुसूदना ह्या तिन्ही नाट्यपदांना शीघ्रतेने एका दिवसात चाली देऊन संपूर्ण नाटक एका आठवड्यात संगीतबद्ध केले. शास्त्रीय संगीतावर आधारीत परंतु बदललेल्या काळाची पाऊले ओळखून कालानुरूप दिलेल्या भावगीत वळणाच्या चाली हे कुलवधूच्या संगीतातील सर्वांत मोठं वैशिष्ट्य.
  • सन १९४४
    • राजकमल कलामंदिर संस्थेचा पहिला मराठी चित्रपट 'भक्तिचा मळा' यामध्ये संत सावता माळी ही प्रमुख भूमिका कोणतीही डमी न वापरता वास्तववादी साकारली. तसेच या चित्रपटास संगीत दिले व स्वतःच्या गीतांचे आणि अभंगांचे गायन देखील केले.
  • सन १९४७
    • भारत देश गुलामगिरीत असताना वंदे मातरम् हे गीत जाहीरपणे गाण्यास बंदी होती. पण देशभक्त मास्तर त्यांच्या मैफलीचा शेवट वंदे मातरम् गाऊन करायचे. मास्तरांनी १९३८ साली रेडियोवर वंदे मातरम् गाऊ दिलं नाही म्हणून रेडियोवर गाण्यास बहिष्कार टाकला होता. परंतु देशाला १९४७साली स्वातंत्र्य मिळालं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विनंतीवरून मास्तरांनी १९४७ साली गुढी पाडव्याला मुंबई आकाशवाणी केंद्रावर वंदे मातरम् गाऊन आपला बहिष्कार मागे घेतला.
  • सन १९४७ ते १९५०
    • वंदे मातरम् हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून संसदेत या गीताची प्रात्यक्षिके सादर केली. अखेर तत्कालिन सरकारतर्फे या गीताला १९५० साली भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून जाहीर करून राष्ट्रगीताइतकाच बहुमान दिला गेला.
  • सन १९५३
    • भारत सरकारतर्फे भारतीय कलावंतांच्या सांस्कृतिक शिष्टमंडळाच्या नेतृत्वाकरिता निवड व चीनला प्रयाण. पेकिंग (आताचे नाव बीजिंग) मध्ये या कलावंतांतर्फे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना कार्यक्रमाचा आरंभ मास्तरांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् गीत गायनाने व्हायचा.
  • सन १९५६
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खास विनंतीवरून भारतात प्रथमच बुद्धवंदना संगीतबद्ध करून त्याचे स्वतःच्या मुख्य आवाजात कोरसच्या साथीत गायन सादर केले. त्या बुद्धवंदनेचे डॉ. बाबासाहेबांनी ध्वनिमुद्रण करून घेतले. ती ध्वनि मुद्रिका १४ ऑक्टोबर १९५६ रोजी सम्राट अशोक विजयादशमी या शुभदिनी नागपूरमधील धर्मांतर सोहळ्यात वाजवली गेली.
  • सन १९५८
    • पुणे येथे नऊ दिवस षष्ठयब्दीपूर्ती सोहळा साजरा. त्यात अखिल भारतामधून सत्तर कलावंत सहभागी झाले.
  • सन १९६५
    • जाहीर केल्यानंतरचे सर्वांत पहिले बालगंधर्व सुवर्ण पदक प्रदान.
  • सन १९६६
    • भारतीय चित्रपट क्षेत्रातील संस्मरणीय योगदानाबद्दल फिल्म फोरमतर्फे प्रभात फिल्म समारोहात मानपत्र देऊन सत्कार.
  • सन १९६९
    • ५ नोव्हेंबर रोजी सांगली येथे नाट्याचार्य विष्णुदास भावे सुवर्ण पदक प्रदान.
  • सन १९७१
    • २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे भारत सरकारतर्फे राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी यांचे हस्ते पद्मभूषण किताब प्रदान.
  • सन १९७२
    • संगीत नाटक अकादमीतर्फे फेलोशिप (रत्नसदस्यत्व)चा बहुमान प्राप्त झाला.
  • सन १९७४
    • २० ऑक्टोबरला ललिता पंचमीच्या दिवशी रामप्रहरी स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळामुळे स्वर्गवास.
  • सन १९७५
    • पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात पुतळा स्थापन. पुतळ्याचे गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचे हस्ते अनावरण. त्यावेळी हिराबाई आणि पु. ल. देशपांडे यांचे गौरवपर जाहीर भाषण झाले.
  • सन १९८३
    • मराठवाड्यातील जालना येथे नव्याने बांधलेल्या नाट्यमंदिरात पुतळा उभारून त्या वास्तूस 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह' असे नाव दिले.

संवाद व संपर्क

अनुसरण करा