संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव आणि सौ.राधाबाई फुलंब्रीकर यांच्या पोटी पुणे येथे १४ ऑगस्ट १९३५ रोजी वीणा या कन्यारत्नाचा जन्म झाला. त्यांचा जन्म झाला त्यावेळी मास्टर कृष्णराव यांचा प्रभात फिल्म कंपनीत संगीत दिग्दर्शक म्हणून सुवर्णकाळ सुरू होता. त्या जन्मल्या तेव्हा प्रभात कंपनीचे एक मालक व सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी कौतुकाने त्यांचे नामकरण 'उदयप्रभा' असे केले. पुढे शाळेपासून प्रभा फुलंब्रीकर अशी त्यांची ओळख निर्माण झाली.
वीणाताईंचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कुलमधून झाले तर पुणे भारत गायन समाज संस्थेतून त्यांनी 'संगीत विशारद' ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत - गायन विभागातील पदवी संपादन केली. मा.कृष्णराव यांची कन्या म्हणून वीणा चिटको यांचे प्रभात स्टुडिओ व नंतर राजकमल कलामंदिराच्या स्टुडिओमध्ये येणे-जाणे होते. प्रभात स्टुडिओतल्या कोरस विभागात वीणा चिटको यांना लहानपणी गायला मिळत असे. मास्टर कृष्णराव यांनी भारतात सर्वप्रथम संगीतबद्ध केलेल्या बुद्धवंदनेतील कोरसमध्येदेखील त्या गायल्या आहेत. तसेच त्या भारतात ठिकठिकाणी वडील मास्टर कृष्णरावांच्या होणाऱ्या शास्त्रीय संगीत मैफलीत त्यांना तंबोऱ्यावर उत्कृष्ट स्वरसाथसुद्धा करायच्या. त्याच सुमारास पं. निखिल बॅनर्जी यांच्याकडून त्यांनी सतारीचे शिक्षण घेतले. अल्पावधीतच त्यांनी सतार या त्यांच्या लाडक्या वाद्यावर प्रभुत्व मिळवले. पुणे येथील नूमवि शाळेत १९५८ साली मास्टर कृष्णराव यांचा षष्ठयब्दीपूर्ती सोहळा एकूण नऊ दिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला; तेव्हा त्यात बालगंधर्व, उस्ताद तिरखवा, मल्लिकार्जुन मन्सूर, हिराबाई बडोदेकर, भीमसेन जोशी आदी देशातील सत्तर कलावंतांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली होती. त्या दिमाखदार सोहळ्याचा शुभारंभ वीणाताईंच्या बहारदार सतार वादनाने झाला. त्यास माधव करंदीकर या उदयोन्मुख तबलावादकाने अगदी समर्पक साथसंगत केली होती. त्यावेळी तरुण वयातील वीणाताईंचे शाळा, महाविद्यालयांमध्ये सतार वादनाचे कार्यक्रम व्हायचे. त्याच सुमारास त्यांचा विवाह रामचंद्र चिटको या अभियंता युवकाशी होऊन पतीच्या नोकरीनिमित्त त्या मध्य प्रदेशातील नागदा येथे राहू लागल्या. तिथे त्यांनी सतारीच्या खाजगी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली.
मास्टर कृष्णराव यांच्या ज्येष्ठ कन्या असलेल्या वीणाताईंनी पित्याच्या छत्रछायेखाली राहूनदेखील संगीत क्षेत्रात स्वयंप्रकाशित ताऱ्यासारखी स्वतंत्र नवनिर्मिती केली. त्या जशा प्रतिभाशाली संगीतकार होत्या तशाच काही मोजक्या, दर्जेदार मराठी भावगीतांच्या गीतकारसुद्धा होत्या. कवित्व शक्तीचे उपजत वरदानच त्यांना लाभले होते. सत्तरच्या दशकात वीणा चिटको यांनी संगीतबद्ध केलेल्या व पं. रामदास कामत यांनी गायलेल्या भावगीतांच्या एचएमव्ही कंपनीने दोन ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्या ध्वनिमुद्रिकांचा विक्रमी खप झाला. या उल्लेखनीय कार्याबद्दल एचएमव्ही कंपनीच्या मराठी भावगीत प्रकारातील पहिल्या स्त्री-संगीतकार म्हणून एचएमव्हीने वीणाताईंचा जाहीर सत्कार केला. या ध्वनिमुद्रिकांमधील 'अंबरातल्या निळ्या घनाची शपथ तुला, मयुरा रे फुलवीत ये रे पिसारा', 'वाटे भल्या पहाटे', 'सांग प्रिये' अशा अत्यंत सुश्राव्य गाण्यांवर मराठी रसिकांनी भरभरून प्रेम केले. याच ध्वनिमुद्रिकांतील 'पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव' या सुर्यदेवाची तेजस्वी प्रार्थनाच असलेल्या भावगीताच्या सुरेल धुनीने आकाशवाणीवरील कार्यक्रमांचा दररोज गेली पन्नास वर्षे आरंभ व्हायचा. पं. रामदास कामत, ज्योत्स्नाबाई भोळे, उत्तरा केळकर अशा दिग्गज गायकांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायन केले आहे. त्यांनी १९९७ साली मा.कृष्णराव यांच्या स्वनिर्मित चीजांवर आधारित गीत निर्मिती करून ती गीते पं. रामदास कामत व उत्तरा केळकर यांच्याकडून गाऊन घेतली.
वीणाताई जसं उत्तम सतार वादन करत असत तसंच त्या संवादिनी देखील नजाकतीने वाजवत असत. दूरदर्शनवर अनेकदा त्यांनी 'सुंदर माझं घर' या कार्यक्रमात संवादिनी वाजवत स्वतः चाल दिलेल्या लोकगीतांचे, सुगम व भावगीतांचे गायन सादर केलेले आहे. त्यांना उपजतच स्वरज्ञान होते आणि एखादं गाणं ऐकता ऐकता झटपट त्या गाण्याचे नोटेशन करण्याची कला त्यांना अवगत होती. लोकगीतांचा अभ्यास करते वेळी त्यांचे लोकगीतांच्या अभ्यासक व कवयित्री सरोजिनी बाबर यांच्याशी मैत्र जुळून आले आणि ती निर्व्याज मैत्री अखेरपर्यंत टिकून राहिली.
केवळ भारतातच नव्हे; तर परदेशात जाऊनही वीणाताईंनी भारतीय सुगम, चित्रपट व भावसंगीताचे कार्यक्रम सादर केले. प्रसिद्ध अभिनेत्री नूरजहाँ भारतात आल्या होत्या, तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ भारतातील कलावंतांनी मुंबईत जुन्या काळातील गाजलेल्या चित्रपट गीतांचा एक देखणा कार्यक्रम सादर केला होता. त्या संगीत सोहळ्यात वीणाताईंनी प्रभातच्या अमरज्योति या हिंदी चित्रपटातील 'सुनो सुनो बनके प्राणी' हे त्याकाळी अत्यंत प्रसिद्ध झालेले मा.कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेले गाणे गाऊन सादर केले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या संगीतकार नौशाद व अनिल विश्वास यांनी त्यांचे कौतुक केले होते. त्या समारंभाच्या वेळी हिंदी व उर्दू भाषा उत्तम अवगत असलेल्या वीणाताईंनी नूरजहाँ यांच्याशी अस्खलित उर्दूमधून संवाद साधून गतकाळातील सोनेरी स्मृतींना उजाळा दिला.
वीणाताईंना संगीतकलेबरोबरच साहित्याचा देखील वरदहस्त लाभलेला असल्याने त्या सतत काही ना काही साहित्यनिर्मिती करण्यात मग्न असायच्या. त्यांचे अनेक मासिके, दिवाळी अंक व वृत्तपत्रे यांमध्ये ललित लेख आणि मास्टर कृष्णराव यांच्यावरील संगीतविषयक स्मृतीलेख प्रसिद्ध झालेले आहेत. मास्टर कृष्णराव यांच्या समृद्ध व व्यापक संगीताविषयी त्या सप्रयोग व्याख्यान सादर करायच्या. मास्टर कृष्णरावांचे प्रेरणादायी सांगीतिक योगदान नीट समजून येण्यासाठी श्रीमती चिटको यांचे लेख, त्यांची सप्रयोग व्याख्याने व आकाशवाणीवरील मुलाखतींची मालिका या गोष्टी संगीत अभ्यासकांना महत्त्वाच्या ठरल्या.
नुकत्याच सरलेल्या श्रावण मासात एके दिवशी आकाशवाणीवर 'वायुसंगे येई श्रावणा' हे सदाबहार भावगीत ऐकत असताना त्या गीतातून खरोखर मनभावन श्रावण अनुभवण्यास मिळाला. हे सामर्थ्य होते गायक पं. रामदास कामतांच्या तरल आवाजाचे, गीतकार गंगाधर महांबरे यांच्या अर्थपूर्ण शब्दांचे आणि त्या गीतावर स्वरसाज चढवणाऱ्या संगीतकार वीणा चिटको यांच्या भावस्पर्शी चालीचे!
संगीतकार व गीतकार वीणा चिटको यांचे १९ सप्टेंबर २०१५ रोजी मुंबई येथे वृद्धापकाळाने निर्वाण झाले. त्यांनी केलेल्या संगीत सेवेचे स्मरण करून त्यांना अर्पण केलेली ही भावपूर्ण स्मरणांजली!