वन्दे मास्तरम् पुस्तक प्रकाशन सोहळा

वन्दे मातरम् चा तेजस्वी सांगीतिक लढा...

२४ जानेवारी १९५० रोजी तत्कालीन भारत सरकारतर्फे 'वन्दे मातरम्' हे गीत राष्ट्रीय गीत (National Song) असे घोषित करण्यात येऊन या गीतास राष्ट्रगीता इतकाच समान बहुमान देण्यात आला.

प्रत्येक भारतीयास वंदनीय असलेल्या या गीतास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव यांनी राष्ट्रगीताचा दर्जा मिळावा म्हणून १९३४ सालापासून प्रखर सांगीतिक लढा देण्यास सुरुवात केली. त्यांच्या तेजस्वी लढ्याची कथा 'वन्दे मास्तरम्' या पुस्तकात लेखक श्री. मिलिंद सबनीस यांनी घडलेल्या इतिहासाचा आधार घेऊन विस्तृतपणे वर्णन केली आहे.

वन्दे मातरम् या गीतास २४ जानेवारी २०२४ रोजी ७४ वर्षे पूर्ण झाली. तसेच ७ नोव्हेंबर २०२३ पासून वन्दे मातरम् गीताच्या १५० व्या जयंती वर्षाचा आरंभ झालेला आहे. २० ऑक्टोबर २०२३ ते २० ऑक्टोबर २०२४ हे मास्तरांचे ५० वे पुण्यतिथी अर्थात् सुवर्णस्मृती वर्ष आहे.

या औचित्याने बिल्वबिभास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या श्री. मिलिंद सबनीस लिखित 'वन्दे मास्तरम्' या पुस्तकाचे प्रकाशन फुलंब्रीचे ज्येष्ठ भाजपा नेते व आमदार असलेल्या आदरणीय ती. हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते मास्तरांचे मूळ गाव असलेल्या फुलंब्री येथे मास्तरांच्या १२६ व्या जयंती निमित्ताने २० जानेवारी २०२४ रोजी झाले. हा पुस्तक प्रकाशन समारंभ फुलंब्री मधील संत सावता माळी महाविद्यालयात पं. दीनदयाळ उपाध्याय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने फुलंब्रीवासियांनी मास्तर कृष्णरावांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या सांगीतिक सोहळ्यात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रसिक उपस्थित होते.

तसेच या पुस्तकाचे प्रकाशन माजी भाजपा प्रवक्ते माननीय श्री. सुनीलजी देवधर यांच्या शुभहस्ते पुणे येथे वन्दे मातरम् ला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता मिळालेल्या २४ जानेवारी या दिवशी देखील झाले. यावेळी मा.सुनीलजी म्हणाले की, "वन्दे मातरम् हे राष्ट्रगीत नाही; परंतु ते देशाचे राष्ट्रगान होऊ शकले याचे संपूर्ण श्रेय मास्टर कृष्णराव यांना जाते ". या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असलेले प्रा. मिलिंद जोशी आपल्या भाषणात म्हणाले, " वंदे मातरम् या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा मिळावा म्हणून स्वातंत्र्य पूर्व काळात परकीयांविरोधात तर स्वातंत्र्योत्तर काळात स्वकीयांविरोधात केलेल्या सांगीतिक लढ्याची कहाणी या पुस्तकात आहे. मास्टर कृष्णरावांच्या प्रयत्नांमुळे या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळाला. त्यांच्या या संघर्ष गाथेची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हायला हवी. " यावेळी या पुस्तकाचे लेखक श्री.सबनीस यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की मा.कृष्णरावांचे कार्य इतर गायक व संगीतकारांपेक्षा काहीसे वेगळे आणि क्रांतिकारी वाटले म्हणून त्यांनी दिलेल्या कणखर सांगीतिक लढ्याची कथा लिहून काढावी असे वाटले. या प्रसंगी वन्दे मास्तरम् पुस्तकाच्या प्रकाशक प्रिया फुलंब्रीकर यांनी मनोगत व्यक्त करून मास्टर कृष्णराव यांच्या या देशव्यापी, तेजस्वी कार्याला मानवंदना दिली. या देशभक्तीने ओथंबलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.माधुरी जोशी यांनी अत्यंत मार्मिकपणे केले. ज्येष्ठ व्हायोलिन वादक पं.अतुलकुमार उपाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात श्री.मिलिंद सबनीस यांना बिल्वबिभास प्रकाशनातर्फे पं.उपाध्ये यांच्या शुभहस्ते 'मास्टर कृष्णराव गुणगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. अध्यक्षीय भाषण करते वेळी पं. अतुलकुमार उपाध्ये म्हणाले, " मास्तरांना मैफलीचे राजे म्हटले जायचे. त्यांच्या संगीत मैफलींमध्ये सदैव जिवंतपणा असायचा. त्याचा अभ्यास नवीन पिढीतील कलावंतांनी करायला हवा. "

संवाद व संपर्क

अनुसरण करा