मास्तर मैफलीत उपस्थित श्रोतृवर्ग पाहून तिथल्या तिथे मैफलीत काय गायचे हे चाणाक्षपणे ठरवून त्याप्रमाणे मैफल सादर करत असत. मैफलीत गायन सादर करते वेळी मास्तरांचा कपाळावर बुक्का लावलेला प्रसन्न चेहरा, नीटनेटका पारंपरिक पेहराव आणि व्यवस्थित बैठक असे. ते कोणताही अंगविक्षेप न करता, स्वर ताणून लावण्याचा आटापिटा न करता प्रसंगानुरूप फक्त हात हलवून गाणे म्हणत. स्वतःच्या पांढरी तीन पट्टीत आणि मध्य लयीत ते गाणं सादर करत. ही नीटनेटक्या सादरीकरणाची शिकवण त्यांना बालपणीच बखलेबुवांकडून मिळाली होती.
रसिकांच्या वन्समोअरचा कायम मान राखून तेच गाणे दर वेळी वेगवेगळ्या नवनवीन ताना, हरकती घेऊन सादर करत. मास्तर मैफलीत गाताना सर्वांशी खेळीमिळीने वागत. त्यांच्या मैफलीचा दर्जा कायम उंचावलेला असे.
मैफलीत मास्तर पारंपरिक ठेवणीच्या चिजा तर सादर करतच शिवाय अनेकदा मैफलीतच तिथल्या तिथे नवीन बंदिशी प्रचलित रागात किंवा स्वतःच निर्माण केलेल्या नवीनच अनवट अथवा जोड रागात पेश करत. मास्तरांचा स्वभाव जात्याच बोलका व मिश्किल असल्यामुळे ते मैफलीत गात असताना श्रोत्यांशी संवाद साधत, साथसंगत करणाऱ्या साथीदारांशी बोलत किंवा एखादी कोटी करत आणि मग लगेच समेवर येण्याची किमया साधत. शिवाय मायबाप रसिक श्रोत्यांच्या आवडीचा, फर्माईशीचा आदर राखत असल्यामुळे प्रत्येकाला मास्तर आपल्यासाठीच गात आहेत अशी आपुलकीची भावना वाटायची.
मैफलीत सर्व संगीत प्रकार म्हणजे अगदी स्वतः संगीत दिलेले चित्रपटातील वा नाटकातील गाणे, अभंग, भजन देखील मास्तर विस्तार करून गायचे त्यामुळे मास्तरांची मैफल कधीच कंटाळवाणी झाली नाही. देशभक्त आणि वंदे मातरम् गीताचे समर्थक असल्यामुळे मास्तर अनेकदा मैफलीचा शेवट त्यांनी झिंझोटी रागात संगीतबद्ध केलेले संपूर्ण कडव्यांसहित वंदे मातरम् गाऊन करत असत. त्यांच्या मैफलीत कायम एक प्रकारचे प्रसन्न, आनंदवर्धक, उत्साहवर्धक असे चैतन्यमय वातावरण भरलेले असे. मास्तरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अखंड भारतभर शास्त्रीय संगीत मैफली सादर केल्या. ठिकठिकाणी गुरुवर्य बखलेबुवांना मैफलीत तंबोऱ्यावर साथसंगत केली तर स्वतंत्र मैफली गाजवल्या. पंजाबात मास्तर 'बाजे झनन मास्टर कृष्णा' म्हणून ओळखले जात इतकी त्यांनी जीवनपुरी रागातील 'बाजे झनन' ही बंदिश प्रसिद्ध केली. तसेच मैफलीत मास्तर बरेचदा 'देखो मोरी चुरीया करके गैया' ही ठुमरी अंगाची पारंपरिक भैरवी म्हणत. मास्तरांनी भैरवी रागामध्ये असंख्य नवीन पदे, बंदिशी बांधल्या ज्या ते मैफलीत म्हणत असत. त्यामुळे मास्तरांना 'भैरवी के बादशाह' असे संबोधले जाई. मास्तरांची भैरवीतील प्रत्येक रचना अर्थपूर्ण आहे शिवाय त्या प्रत्येक रचनेचा रंग, ढंग निराळा आणि त्यातील भाव अगदी मनाचा ठाव घेणारा - उत्कट, आर्त आणि सुरेल! याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर नाट्यनिकेतनच्या नाटकांतील नाट्यगीतांना मास्तरांनी शास्त्रीय संगीताच्या चौकटीत भावगीतासारखे स्वरूप देऊन कालानुरूप चाली दिल्या. नाट्यनिकेतनच्या नाटकांतील भैरवीमधील 'बोला अमृत बोला', 'हास हास रे हृदया', 'का रे ऐसी माया' ही तीन नाट्यपदे किती वेगवेगळ्या चालींची आणि प्रसंगानुरूप भाव व्यक्त करणारी आहेत!
गुरुवर्य बखलेबुवांनी स्थापन केलेल्या पुणे भारत गायन समाजाकरिता मास्तरांनी स्वतःच्या सुलभ, वैशिष्टयपूर्ण संगीत व्याकरण पद्धतीनुसार 'रागसंग्रहमाला - भाग १ ते ७' हा भारत सरकारची मान्यता मिळालेला संपूर्ण शास्त्रीय संगीत गायन अभ्यासक्रम तयार केला आहे. यांमध्ये बुवांनी शिकवलेल्या पारंपरिक बंदिशी, इतर प्रसिद्ध पारंपरिक बंदिशी आणि स्वरचित बंदिशी, भजन इत्यादी अंतर्भूत आहे.