बुद्धवंदना पर्व

युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन भारताचे राजगायक संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव (मास्तर) यांच्या समन्वयातून स्वतंत्र भारतात सर्वप्रथम बुद्धवंदनेचे अजरामर सूर साकार झाले.

'वंदे मातरम् करता सांगीतिक लढा'

भारताच्या स्वातंत्र्याकरता काही क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला; तर काही क्रांतिकारकांनी अहिंसेचा मार्ग पत्करला. कट्टर देशभक्त असलेल्या मास्टर कृष्णरावांनी मात्र त्यांची 'मास्टरी' असलेल्या संगीताचा मार्ग देशाच्या स्वातंत्र्याकरता सांगीतिक लढा देण्यासाठी अंगिकारला. मास्टर कृष्णराव उर्फ मास्तर कृष्णराव हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वंदे मातरम् ह्या मातृभूमीची वंदना असलेल्या गीताचे राष्ट्रगीत म्हणून समर्थन करत होते. हे गीत स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे हा ध्यास घेऊन १९३४ साली त्यांनी सर्वप्रथम प्रभात फिल्म कंपनीच्या म्युझिक स्टुडिओत या गीतावर वेगवेगळ्या चालींचे प्रयोग करून बघितले. शेवटी त्यांनी झिंझोटी या रागात ह्या गीतास चाल दिली. पुढे १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत कोणते असावे हे ठरले नव्हते. त्यामुळे मास्तरांनी संसदेत १९४७ ते १९५० या कालावधीत तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू, राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व घटना समितीच्या इतर सदस्यांसमोर वंदे मातरम् हे गीत राष्ट्रगीत व्हावे म्हणून या गीतास स्वकृत चालीत संगीतबद्ध करून त्याची प्रात्यक्षिके दिली. त्यांची ही प्रात्यक्षिके संसदेत भारताच्या घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे उपस्थित राहून अनुभवली होती आणि त्यावेळी त्यांनी इतर संसद सदस्यांसमवेत मास्तरांच्या सांगीतिक लढ्याची, सांगीतिक ज्ञानाची, देशनिष्ठा आणि देशभक्तीची दखल घेतली होती. वंदे मातरम् हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत होऊ शकले नाही; परंतु त्या गीतास पूर्णपणे न वगळता राष्ट्रीय गीत म्हणून जन गण मन या राष्ट्रगीता इतका समान बहुमान देण्यात येईल असे १९५० साली डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सरकारतर्फे जाहीर केले. या भारत सरकारच्या निर्णयात मास्तरांनी वंदे मातरम् करता शेवटपर्यंत दिलेल्या सांगीतिक लढ्याचे योगदान नक्कीच महत्त्वपूर्ण मानले जाते.

'बुद्धवंदना पर्व'

पुढे १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये नवबौद्ध धर्माची संस्थापना करण्याचे ठरवले; तेव्हा त्यांनी मास्तर कृष्णरावांना भेटून त्यांना बुद्धवंदनेस संगीत देण्याची विनंती केली. कारण त्यांनी संसदेत वंदे मातरम् संदर्भात मास्तरांच्या सांगीतिक ज्ञानाचा अनुभव घेतला होता. मास्तरांनी डॉ. बाबासाहेबांच्या विनंतीस मान देऊन बुद्धवंदना संगीतबद्ध करण्याचे कार्य कोणतेही मानधन न घेता बुद्धदेवाची सेवा म्हणून आनंदाने स्वीकारले. संगीत देण्याआधी मास्तरांनी मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन तेथील प्राचार्यांकडून पाली भाषा शिकून घेतली व बुद्धवंदनेतील मंत्रांचा अर्थ जाणून घेतला आणि मगच त्रिशरण पंचशील संगीतबद्ध केले. ते त्यांनी स्वतःच्या मुख्य आवाजात कोरसचा प्रभावी वापर करून गायले. डॉ. बाबासाहेबांनी या बुद्धवंदनेचे ध्वनिमुद्रण करून घेऊन त्याची 78 RPM ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली.

'दिक्षा सोहळा'

डॉ.बाबासाहेबांनी नागपूरमध्ये सम्राट अशोक विजयादशमी या शुभ दिनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भव्य प्रमाणात धर्मांतरण सोहळा आयोजित केला. त्या धर्मांतरण सोहळ्यात मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध करून गायलेली ही बुद्धवंदनेची ध्वनिमुद्रिका वाजवली गेली.

'कार्यपूर्तीचे समाधान'

बुद्धवंदनेच्या कार्याकरता डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी आकाशवाणी धारवाडचे तत्कालीन केंद्र संचालक भास्कर भिकाजी भोसले यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. डॉ.बाबासाहेब यांना संगीताची उत्तम जाण होती आणि ते व्हायोलिन, तबला व हार्मोनियम ही वाद्ये सहजपणे वाजवत असत. मास्तरांच्या आवाजातील बुद्धवंदना ऐकून डॉ.बाबासाहेब अतिशय खुश झाले. त्यांनी बुद्धवंदनेची ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्यावर मास्तर कृष्णरावांना भगवान बुद्धाची मूर्ती व बुद्ध वाङ्मय भेट दिले, तर कोरसमध्ये सहभागी झालेली मास्तरांची तरुण कन्या प्रभा फुलंब्रीकर (म्हणजेच पुढे संगीतकार म्हणून नावारूपास आलेल्या मास्तरांच्या ज्येष्ठ कन्या वीणा चिटको) हिला पेन भेट दिले आणि त्यांचे अनुयायी भास्कर भिकाजी भोसले यांना त्यांनी हातातले घड्याळ काढून भेट दिले.

'बुद्धवंदना - अलौकिक संगीत कलाकृती'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजगायक संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर या दोन महान साधकांच्या साधनेतून निर्माण झालेल्या बुद्धवंदना ह्या पवित्र व मंगलमय संगीत कलाकृतीच्या निर्मितीची ही कथा अलौकिक आहे.

संवाद व संपर्क

अनुसरण करा