मास्तरांनी वयाच्या दहाव्या वर्षी मराठी रंगभूमीवर पदार्पण करत "नाट्यकला प्रवर्तक" संस्थेचे अत्यंत गाजलेले संगीत नाटक 'संत सखुबाई' मध्ये बाल गायक नट म्हणून विठ्ठलाची भूमिका साकारली. ह्या नाटकातील मास्तर गात असलेल्या 'भक्तजन सदा म्हणती दयासिंधु मला' या पदाला अनेक वन्समोअर मिळत असत. त्याच नाट्यसंस्थेच्या "राजा हरिश्चंद्र" या संगीत नाटकात "संत रोहिदासाची" भूमिका केली तर "संगीत सौभद्र" नाटकात "नारदाची" भूमिका वठवली. त्या नाट्यसंस्थेत मास्तरांनी चार वर्षे बाल गायक नटाच्या भूमिका केल्यानंतर त्यांनी त्या संस्थेत नाटकांत काम करण्याचे थांबवले व १९११ सालापासून गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचे गंडाबद्ध शिष्यत्व पत्करून शास्त्रीय गायनाचे रितसर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढे काही वर्षांतच परत मास्तर मराठी संगीत रंगभूमीकडे वळले.
मास्तरांनी १९१५ साली बखलेबुवांच्या गुरूआज्ञेनुसार "गंधर्व नाटक मंडळी"त गायक नट (त्यासाली मास्तरांनी बडोदा येथे "संगीत शारदामध्ये शारदेची" मुख्य भूमिका साकारली) म्हणून प्रवेश केला. त्यानंतर १९१७-१८ च्या सुमारास "गायक नट" म्हणून सलग भूमिका करायला सुरुवात केली.
बालगंधर्व व मास्तर यांचे गुरु बखलेबुवा हे गंधर्व नाटक मंडळीतील संगीत विभाग सांभाळत असत. परंतु दिनांक ८ एप्रिल १९२२ रोजी बुवांचे दुःखद निधन झाले. गुरुवर्य बुवासाहेबांनी पुत्रवत पट्टशिष्य असलेल्या मास्तरांचे संगीत तसेच आयुष्य घडवले होते. बुवांच्या निधनामुळे गंधर्व नाटक मंडळीतील संगीतकार व संगीत शिक्षकाची गादी रिकामी झाली होती मग ती जबाबदारी बालगंधर्वांनी साहजिकच मास्तरांवर सोपवली. अशातऱ्हेने मास्तरांनी "गंधर्व नाटक मंडळी"त आपले गुरू बखलेबुवांचा देदीप्यमान संगीत वारसा पुढे चालवण्यास सुरुवात केली. वयाने दहा वर्षांनी मास्तरांपेक्षा मोठे असलेले बालगंधर्व गुरुवर्य बखलेबुवांच्या निर्वाणानंतर मास्तरांना आपल्या गुरूस्थानी मानत व मैफलीत मास्तरांनंतर कधीही गायला बसत नसत. बालगंधर्व मास्तरांच्या षष्ठयब्दीपूर्ती समारंभातल्या ध्वनिमुद्रित भाषणात म्हणाले आहेत, " मास्तर माझे गुरुबंधु आहेत आणि माझे गुरू पण आहेत. त्यांनी आम्हाला शिकविले आहे. माझ्या सात नाटकांना त्यांनी चाली दिल्या आहेत. काय सांगू? मला मोठा अभिमान वाटतो मास्तरांनी चाली द्याव्यात आणि नारायणरावने म्हणाव्यात. मी त्यांना (मास्तरांना) हेच सांगितले की तुम्ही चाली इतक्या प्रभावाने देता, इतक्या सुंदर देता त्यामुळे ही तुमची पुण्याई मला अनायसे मिळते."
मास्तर हे गंधर्व नाटक मंडळीतील गायक नट, संगीतकार व संगीत शिक्षक अशा भूमिका निभावणारे एक आघाडीचे कलाकार होते. त्यांनी गंधर्व नाटक मंडळीच्या पुढील नाटकांना संगीत दिले :
मास्तरांनी राजाराम संगीत मंडळीच्या पुढील नाटकांना संगीत दिले :
मास्तरांनी नाट्यनिकेतनच्या पुढील नाटकांना संगीत दिले :
सुमतीदेवी धनवटे यांनी लिहिलेल्या पुढील नाटकाला संगीत दिले :
तसेच मास्तरांनी संगीत एकच प्यालामधील 'ललना मना', स्वयंवर मधील 'एकला नयनाला', संशयकल्लोळमधील 'मज वरी तयाचे प्रेम खरे' तर सौभद्रमधील 'बलसागर तुम्ही वीर शिरोमणी' या पदांना सुमधुर व सुयोग्य अशा चाली लावल्या. याचा उल्लेख त्या त्या नाटकाच्या मूळ पुस्तकात जरी केलेला नसला तरी अनेक ठिकाणी स्वतः मास्तरांनी, त्यांच्या शिष्यांनी व संगीत तज्ज्ञांनी तसा उल्लेख केलेला आढळून येतो.
मास्तरांचे शिष्य कै. श्री. मधुसूदन कानेटकर यांनी नाट्यसंगीतकार म्हणून मास्तरांच्या गुण वैशिष्ट्याची प्रत्ययकारी मीमांसा केली आहे. ते म्हणतात, "मास्तरांनी ज्या चाली बनवल्या त्या 'रीती'ने बनविल्या. त्यांच्या स्वररचनेमध्ये एक अंगभूत संतुलनाची जाणीव ऐकणाऱ्याला सतत होत असते. संदर्भाला सुयोग्य अशी चाल सुचणे यासाठी एक वेगळी प्रतिभा लागते. ती मास्तरांच्याजवळ होती...चाल देणे आणि ती रंगमंचावर रुजू होईपर्यंत नटगायकाकडून ती नीट बसवून घेणे याबाबतीत मास्तरांची ख्याती सर्वमान्य आहे."
मास्तरांनी गंधर्व नाटक मंडळीत गायक नट म्हणून काही पुरुष भूमिका व अधिक स्त्री भूमिका केल्या. गंधर्व नाटक मंडळीत मास्तर साकारत असलेल्या भूमिका पुढीलप्रमाणे :
१९३४ साली गंधर्व नाटक मंडळी बंद पडल्यावर मास्तर शास्त्रीय संगीत जलसे, चित्रपट संगीत, राष्ट्रसंगीत अशा इतर संगीत विषयक कार्यात पूर्ण वेळ मग्न राहिले. पुढील काळात १९४२-४३ साली 'नाट्यनिकेतन'च्या मो. ग. रांगणेकर यांनी लिहिलेल्या 'कुलवधू' नाटकासाठी शीघ्रतेने संगीत देण्याची विनंती संगीतकार व टीकाकार असलेले मास्तरांचे मित्र श्री.केशवराव भोळे यांनी मास्तरांना पत्र लिहून लिखित स्वरूपात केली. नाटकातील पदांच्या चाली तयार करून त्यांची गायक कलावंतांकडून तालीम घेऊन बसवायला फक्त एक आठवड्याची मुदत होती. कारण त्या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग एक आठवड्याने होणार असे आधीच सर्वत्र जाहिराती करून अधिकृतरित्या जाहीर केले होते अगदी नाट्यगृहाचे बुकिंगदेखील करून ठेवले होते; परंतु नियोजित संगीतकाराचा मात्र पत्ता नव्हता. संगीत हा तर संगीत नाटकाचा आत्मा आणि त्याचीच काही तयारी झालेली नव्हती म्हणून त्या नाट्यसंस्थेचे मालक व नाटकाचे नाटककार मो.ग.रांगणेकर आणि इतर कलावंतांचे अगदी धाबे दणाणले होते. ऋजु स्वभावाच्या जगन्मित्र मास्तरांनी त्या नाटकाशी संबंधित असलेल्या सर्वांची अडचण समजून घेतली आणि श्री.भोळे यांच्या विनंतीस मान देऊन नाटकास इतक्या कमी अवधीत संगीत देण्याची अवघड कामगिरी हाती घेतली. मास्तरांनी शीघ्रतेने पदांस तेव्हाच्या बदललेल्या काळानुरूप दर्जेदार चाली दिल्या. 'संगीत कुलवधू' हे नाटक अत्यंत लोकप्रिय झाले. मास्तरांनी शास्त्रीय संगीत आणि भावसंगीत यांचा सुरेख मेळ साधत काळानुरूप या नाटकातील पदांना चाली दिल्या. या नाटकातील सर्व पदे खूपच गाजली विशेषतः 'बोला अमृत बोला' ह्या भैरवीतील पदाने तर लोकप्रियतेचा कळस गाठला. विशेष म्हणजे मास्तरांनी या पदास एका दिवसात चाल देऊन त्याची तालीम सुरू केली होती. या नाटकामधील 'भाग्यवती मी त्रिभुवनी झाले' हे मराठी नाटकातील पहिले युगल गीत म्हणून वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
या मास्तरांच्या दर्जेदार व अप्रतिम संगीत रचनांमुळे बोलपटांच्या जमान्यात मरगळलेल्या मराठी संगीत नाट्यसृष्टीला पुन्हा एकदा उभारी आली. त्यानंतर मास्तरांनी नाट्यनिकेतनच्या कोणे एके काळी, एक होता म्हातारा, भाग्योदय या नाटकांनादेखील शास्त्रीय संगीत व भावसंगीत या दोहोंचा सुरेख मेळ साधून दर्जेदार चाली दिल्या. पुढील काळात आचार्य अत्रे यांनी मध्यस्थी करून संगीत देण्याविषयी केलेल्या विनंतीस मान देऊन मास्तरांनी अभिनेत्री वनमाला यांच्या सख्ख्या भगिनी असलेल्या श्रीमती सुमतीदेवी धनवटे यांनी लिहिलेल्या 'संगीत धुळीचे कण' या नाटकास चाली दिल्या.