स्मरणिका - 'आनंदयात्री मास्टर कृष्णराव'

चैतन्यदायी प्रसन्नता हा स्थायीभाव असलेल्या संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव यांच्या १२५ व्या म्हणजेच शतकोत्तर रजत जयंतीपूर्तीनिमित्त २० जानेवारी २०२३ रोजी 'आनंदयात्री मास्टर कृष्णराव' या बिल्वबिभास प्रकाशनाने निर्माण केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. राजा दीक्षित यांचे शुभहस्ते पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनात झाले. या प्रकाशन समारंभास मा. उल्हासदादा पवार आणि पद्मश्री पं. उल्हास कशाळकर हे सन्माननीय अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शतकोत्तर रौप्य जयंतीनिमित्त निर्माण केलेल्या 'आनंदयात्री मास्टर कृष्णराव' स्मरणिकेबद्दल प्रकाशिका व संपादिका थोडक्यात सांगत आहेत ....

  • स्मरणिकेत मास्तरांचे व्यक्तिमत्व, चारित्र्य आणि सांगीतिक कार्यकर्तृत्व यांतील सर्व पैलू समाविष्ट होतील याचा प्रयत्न केला आहे.
  • संगीत रसिक, अभ्यासक, तज्ज्ञ तसेच नातेवाईकांचे लेख, मुलाखती व आठवणी घेतल्या आहेत.
  • मास्तरांबाबत इतरांनी अनुभवलेली लहान-मोठी आठवण/आठवणी त्यातील सत्यता पडताळून अंतर्भूत केली आहे.
  • जुना काळ असल्यामुळे प्रत्येक महत्त्वाची घटना, घटना घडल्याचा काळ (सनावळ्या) यांमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न केला आहे.
  • स्मरणिकेत मास्तरांच्या व्यक्तिमत्वाचे व कार्याचे दर्शन घडवणारे भावस्पर्शी काव्य घेतले आहे.
    कविवर्य रमण रणदिवे यांनी मास्तरांचा अभ्यास करून मगच 'शतकातून एखादा जन्मे ऐसा प्रतिभावान' ही कविता केली आहे. 'कृष्णाची कला लय न्यारी' या कवितेमध्ये प्रतिभासंपन्न मास्तरांच्या संगीतकलेचे वर्णन केले आहे. 'माज्या कृष्णाची लीला लय न्यारी' या प्रभातच्या गोपालकृष्ण चित्रपटामधील पेंद्याच्या तोंडच्या गीताच्या ओळीत बदल करून 'कृष्णाची कला लय न्यारी' असे शीर्षक दिले आहे.

आनंदयात्री मास्टर कृष्णराव असे नाव का दिले?

  • चैतन्यदायी प्रसन्नता हा मास्तरांचा स्थायीभाव. त्यामुळे त्यांच्या मैफलीत प्रसन्नता असायची, आनंदाचे साम्राज्य पसरलेले असायचे. बालगंधर्व त्यांना आनंदमूर्ती म्हणायचे. घरात देखील मास्तरांचे प्रसन्न अस्तित्व जाणवायचे. त्यांच्याशी नुसते बोलल्याने देखील मनास प्रसन्न वाटायचे असे लोकं सांगायची.
  • बालपणीचा काळ अकाली पितृछत्र हरपल्याने अत्यन्त गरिबीत व दुःखात गेला असला तरी मूळ स्वभाव आनंदी असल्याने कधीही बोलण्यात व स्वभावात कटूता नव्हती. अजातशत्रू असल्याने विरोधक देखील मित्र व्हायचे. शत्रुत्वाने वागणाऱ्यालादेखील क्षमा करणारा क्षमाशील स्वभाव.
  • पु. ल. देशपांडे आपल्या जाहीर ध्वनिमुद्रित भाषणात म्हणाले आहेत की कोणी मला विचारले की मास्तर आज काय गायले? तर मी म्हणेन मास्तर आनंद गायले.

संवाद व संपर्क

अनुसरण करा