कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर (जन्म १८९८ - मृत्यु १९७४) म्हणजेच संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विश्वाला लाभलेले एक वरदान ! गळ्यात विलक्षण फिरत असलेली घराणेदार शास्त्रीय संगीत गायकी, अनेक अनवट राग व जोड रागांचे निर्माणकर्ते, बंदिशींचे रचनाकार, मराठी संगीत रंगभूमीवरील सर्जनशील संगीतकार-गायक नट, मराठी चित्रपट संगीत विश्वातील अनेक नवीन प्रयोगांचे आद्य प्रवर्तक, देशकार्यात संगीताच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान देणारे निष्ठावान देशभक्त.. अश्या अनेक पैलूंनी समृद्ध असलेले सिद्धहस्त मास्तर कृष्णरावांचे कार्य आजही अभ्यासू गायक, कलाकार आणि गुणीजनांना मार्गदर्शक ठरणारे व आत्मिक आनंद देणारे आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांनाही ते असेच दिशादर्शक ठरावे याकरिता त्यांच्या संगीतकार्याचा सर्वसमावेशक आढावा घेऊन त्याची एकत्रित नोंद राहावी हा या वेबसाईटचा उद्देश आहे.