मास्तर हे शीघ्र संगीतकार, गीत रचनाकार व गायक होते. मास्तरांना संगीत देते वेळी पेटी किंवा इतर कोणत्याही वाद्याची तसेच पद्याचीदेखील कधीच आवश्यकता भासली नाही. कोणत्या प्रसंगासाठी गाणे हवे आहे तो नुसता प्रसंग मास्तरांना वर्णन केला तरी ते तिथल्या तिथे स्वरांची गुंफण करून गुणगुणून दाखवायचे. संगीतकार म्हणून अशा अगणित चाली गाऊन दाखवून वेगवेगळ्या चालींचे पर्याय मास्तर त्या व्यक्तीसमोर निवडीकरिता ठेवायचे.
अनेकदा मास्तर त्यांच्या शास्त्रीय गायन मैफलीत लोकाग्रहास्तव त्यांनी संगीत दिलेली तसेच त्यांनी सिनेमात गायलेली लोकप्रिय चित्रपटगीते विस्तारपूर्वक गाऊन सादर करायचे. दरवेळी ते त्यात नवनवीन सांगीतिक हरकती घ्यायचे त्यामुळे तेच चित्रपट गीत वेगळे व अधिक रंजक व्हायचे.
स्वतःची लोकप्रिय चित्रपट गीते शास्त्रीय गायन मैफलीत सादर करण्याची पद्धत लोकाग्रहास्तव प्रथम मास्तरांनी सुरू केली. परंतु त्यातदेखील त्यांनी कल्पकतेने विस्तार करून दरवेळी नाविन्य आणले. त्यांनी कोणताही संगीत प्रकार निषिद्ध मानला नाही. ते ठिकठिकाणी जिथे जात असत त्या मातीतील संगीताचा बाज अवगत करत असत.
मास्तरांच्या चाली ऐकायला सोप्या वाटल्या तरी त्या सहजसुंदरपणे, भावपूर्णतेने गायला अवघड अशा आहेत. मास्तरांना गाण्याच्या चाली जरी सहजतेने सुचत असल्या तरी गाण्याला अंतिम चाल देते वेळी ती चाल सर्व दृष्टीने परिपूर्ण व्हावी म्हणून मास्तर खूप मेहनत घ्यायचे.
मास्तरांनी १९३४ साली 'धर्मात्मा' चित्रपटास संगीत देण्याकरिता प्रभात चित्रपट संस्थेत प्रवेश केला. मास्तरांनी 'संगीत कान्होपात्रा' या नाटकातील भक्तीगीतांना स्वतंत्र चाली दिल्या व असा स्वतंत्र स्वररचनेचा प्रथमच नाट्यसंगीतात प्रयोग केला गेला. तोपर्यंत नाट्यसंगीतात पूर्वांपर प्रचलित बंदिशी, वारकरी पद्धतीच्या अभंगांच्या चालींचा वापर नाट्यपदांसाठी करण्याची पद्धत होती. म्हणून कान्होपात्राचे संगीत हे नाट्यसंगीतात स्वतंत्र स्वररचनांमुळे वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण म्हणून मानले जाते. अगदी त्याप्रमाणेच धर्मात्मा या चित्रपटातील भक्तिसंगीत मास्तरांनी शास्त्रीय संगीताच्या चौकटीत बसवले. तो पर्यंत चित्रपटांत भक्तिगीते ही परंपरागत वारकरी संगीताच्या चालीत, प्रचलित अभंग, प्रार्थना व आरतीच्या चालीत म्हटली जायची. तसेच काही गाण्यांसाठी बालगंधर्वांच्या गळ्यावर चढलेला 'भीमपलास' रागाचा धर्मात्मा चित्रपटामध्ये मास्तरांनी कल्पकतेने वापर केला. अशाप्रकारे मास्तरांनी भक्तिसंगीतास शास्त्रीय संगीताच्या चौकटीत बसवून स्वतंत्र स्वररचना केल्या आणि भक्तीसंगीताचे नवे दालन निर्माण केले.
मास्तरांनी पुढील चित्रपटांत संगीतकार / अभिनेता म्हणून कार्य केले :-
गंधर्व नाटक मंडळीच्या संगीत अमृतसिद्धी नाटकावर आधारित हिंदी चित्रपट साध्वी मीराबाई (१९३७) चित्रित केला गेला. या सिनेमाला मास्तरांचे संगीत असून त्यात त्यांनी भूमिकादेखील केली.
भक्तीचा मळा ह्या चित्रपटात मास्तरांनी स्वतः अभंग व गीतांचे गायन केले होते आणि संगीत दिग्दर्शन पण मास्तरांचेच होते. तसेच या चित्रपटामध्ये मास्तरांनी संत शिरोमणी सावता महाराजांची म्हणजे मुख्य नायकाची भूमिका केली होती. मास्तरांनी कोणतीही डमी न वापरता नांगर, रहाट, बैलगाडी चालवणे ही सर्व दृष्ये स्वतः मेहनत करून दिली होती. शिवाय मास्तर वृत्तीने अतिशय धार्मिक व श्रद्धाळू असल्यामुळे संत सावता माळी यांच्या भूमिकेत ते अगदी शोभून दिसले जणू ही भूमिका ते जगले इतका त्यांचा चित्रपटात जिवंत अभिनय झाला. भक्तीचा मळा हा राजकमलचा सर्वांत पहिला मराठी चित्रपट. हा चित्रपट प्रकाशित झाल्यावर अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाला. अगदी खेड्यापाड्यातील भाविक लोकं बैलगाडीतून पूर्ण कुटुंबासहित अत्यंत श्रद्धेने हा चित्रपट बघायला पुणे व मुंबई येथे आवर्जून येत. या मराठी चित्रपटाची 'माली' ही हिंदी आवृत्तीदेखील राजकमलने काढली होती. त्यामुळे भारतभर हा चित्रपट पोहोचू शकला.
'मेरी अमानत' या चित्रपटात मास्तरांनी शिक्षकाची भूमिका केली व गायन केले. या चित्रपटास श्रीधर पार्सेकर यांचे संगीत होते. त्याकाळी या चित्रपटाच्या ध्वनिमुद्रिका खूप गाजल्या.
हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या चालला नाही तरी मास्तरांनी संगीत दिलेली यातील 'आला उदयाला नभी चंद्रमा आला' अशी सर्व गाणी अतिशय प्रसिद्ध झाली. मास्तरांना मैफिलीत ही गाणी गाण्यासाठी रसिक श्रोते आग्रह करायचे व मास्तर त्यांच्या शैलीत ती गाणी सादर करायचे.
हा चित्रपट मास्तरांनी संगीत दिलेल्या यातील गाण्यांसहित व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरला.
राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला मास्तरांनी भक्तीरसप्रधान संगीत दिले.