मास्तरांच्या मातोश्री ती. मथुराबाई फुलंब्रीकर ह्या मास्तरांच्या पहिल्या गुरू. त्यांचे माहेर आळंदी येथे होते. त्या स्वतः विठ्ठलभक्त होत्या आणि ज्ञानेश्वर माऊलींवर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. त्यांचे यजमान म्हणजेच मास्तरांचे वडील वेदमुर्ती गणेशपंत यांचे अकाली निधन झाल्यावर यांच्यावर पोटच्या मुलांची जबाबदारी पडली. यांनी अविरत परिश्रम करून घरचा उदरनिर्वाह चालवला.
कृष्णा (मास्तर) लहान असताना त्याला मांडीवर घेऊन मथुराबाई जात्यावर दळण दळताना ओव्या म्हणायच्या, त्याला पौराणिक कथा सांगायच्या. या संस्कारांचा प्रभाव मातृभक्त कृष्णावर पडला.
आईनेच प्रथम मास्तरांची शास्त्रीय गायनाची आवड ओळखली व सवाई गंधर्व यांचेकडे नेले आणि पुढे सवाई गंधर्वांनी सुचवल्याप्रमाणे पं. बखलेबुवांकडे शास्त्रीय संगीत शिक्षणाकरता नेले.
जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण म्हणजे मास्तरांचे आराध्य दैवतच!
मास्तरांच्या निजघरात गोपालकृष्णाची मूर्ती व फोटो होता. त्यांच्या हृदयातच वसलेल्या श्रीकृष्णाने त्यांचे सर्व जीवन व्यापले होते. त्यांनी आयुष्यभर भगवान श्रीकृष्णाची आराधना केली.
मास्तरांवर जणू कृष्णतत्व प्रसन्न होते. त्यांनी अनाथन के नाथ तू यदुनाथ, चलत चलत मथुरा नगरीमें, मान पूजा ये मेरी जसोदा नंद के लाला, ब्रिजकी बाट चालो तुम श्याम मोहन प्यारे, रंग रंग मुखपे मत फेको बनवारी, मनमें मोहन बिराजे, खेलत हैं गिरीधारी, श्यामसुंदर रे, ओ मोरे प्यारे किसन कन्हाई अशा असंख्य बंदिशी भगवान श्रीकृष्णावर बांधल्या आहेत.
मास्तरांच्या सर्व कुटुंबाचीच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींवर अढळ श्रद्धा होती.
ह. भ. प. ल. रा. पांगारकर यांनी मास्तरांना उपदेशल्याप्रमाणे रोज श्री ज्ञानेश्वरीतील एक अध्याय वाचल्याशिवाय जेवायचे नाही हा मास्तरांचा नेम होता तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. त्यांचे आचार विचार भागवत धर्माचे होते. त्यांच्या कपाळावर बुक्का व गळ्यात तुळशीची माळ असायची. मास्तरांचे निर्वाण झाले तेव्हा दारात वारकरी दिंडीचे भजन चालू होते. त्या भजनाच्या नादात मास्तरांनी वैकुंठगमन केले.
सद्गुरु नर्मदावासी प.पू. सच्चिदानंद स्वामी उर्फ मौनीस्वामी (मोक्षगुरु) यांचा मास्तरांनी अनुग्रह घेतलेला होता. त्यांचा मास्तरांना प्रत्यक्ष सहवास लाभला होता.
याशिवाय मास्तरांच्या जीवनात शिर्डीचे श्री साईबाबा, दासगणू महाराज, शंकर महाराज, अवतार मेहेर बाबा, नारायण महाराज, उपासनी महाराज, पाचलेगावकर महाराज, गुळवणी महाराज हे संतमहात्मे येऊन गेले. मास्तरांनी या सर्व थोर संतमहात्म्यांसमोर गायनकला सादर केलेली आहे.
गुरुवर्य बखलेबुवांनी बालवयातील कृष्णाला (मास्तरांना) स्वतःचा पुत्र मानून संगीत शिकवले. त्यांनी मास्तरांचे जीवन व संगीत घडवले. मास्तर कायम गुरू आज्ञेत राहिले.
पितृतुल्य बखलेबुवांच्या स्वर्गवासानंतर मास्तरांनी शास्त्रीय गायक, संगीतकार आणि गुरू म्हणून आत्यंतिक गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठेने गुरुवर्य बखलेबुवांची गायन परंपरा समर्थपणे पुढे चालवली.
मास्तर जसे श्रद्धाळू होते तसे ते कट्टर देशभक्त ही होते म्हणूनच वंदे मातरम् हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत होण्यासाठी त्यांनी प्रखर सांगीतिक लढा दिला. हे भारताचे राष्ट्रीय गीत होण्यात मास्तरांचा हा प्रयत्नपूर्वक लढा महत्वपूर्ण मानला जातो.
वंदे मातरम् हे मातृभूमीचे भक्तिपूर्वक स्तवन व वंदना आहे असे ते या गीताचे समर्थन करत. त्यांच्या दिवाणखान्यात इतर पूजनीय व्यक्ती आणि देवादिकांच्या तसबीरींबरोबर भारतमाता/हिंदमातेचे पण चित्र होते.
स्वातंत्र्यसंग्रामात अतुलनीय पराक्रम गाजवलेले आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाभिमानाचे बीज रुजवणारे लोकमान्य टिळक म्हणजे मास्तरांचे प्रेरणादायी श्रद्धास्थान होते. मास्तरांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून वंदे मातरम् हे राष्ट्रगीत व्हावे हा ध्यास घेतला होता. याकरिता त्यांनी अनेक वर्षे निडरपणे दिलेल्या सांगीतिक लढ्याची प्रेरणा लो. टिळक होते.
पूजनीय लोकमान्य टिळकांसमोर केसरी वाड्यात गुरुवर्य बखलेबुवांच्या उपस्थितीत गायन सादर करता आले या गोष्टीचा त्यांना सविनय अभिमान वाटायचा.