मास्टर कृष्णराव उर्फ मास्तर यांना 'मैफलीचे बादशाह' म्हटले जायचे. परंतु, अलीकडील श्रोत्यांना मास्तर त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात मैफलीमध्ये कसे गायचे हे कळून येण्यासाठी मास्तरांचे मैफलीतील पूर्ण सलग ध्वनिमुद्रण अजून उपलब्ध झाले नव्हते. कारण त्या काळात म्हणजे सुमारे एकोणीसशे पन्नासपर्यंत लाईव्ह मैफल सहजगत्या ध्वनिमुद्रित होऊ शकेल अशी यंत्रणा अस्तित्वात नव्हती.
आता मात्र 'वायर'वर ध्वनिमुद्रित केलेली मास्तरांची ही एक पूर्ण मैफल उपलब्ध होऊ शकली आहे.
१९५० मध्ये दिवाळीतील भाऊबीजेच्या दिवशी सकाळी मास्तरांनी ही मैफल त्यांचे गुरु पं. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या भारत गायन समाजामध्ये सादर केली. त्यावेळचे पुण्याचे महानगरपालिका आयुक्त आदरणीय श्रीयुत सदाशिव गोविंद बर्वे उर्फ स गो बर्वे हे या मैफलीस अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
मास्तरांनी या मैफलीमध्ये शिवमत भैरव मधील " आज मौजूद भये " ही पारंपरिक बंदीश सादर केली आहे. तसेच बरवा रागातील बंदीश " एरी मैंको नाही " आणि भटीयार मधील स्वकृत बंदीश " रैन गई भई भोर " अशा बंदीशी नजाकतीने गाऊन सादर केल्या आहेत. याशिवाय त्यांनी गांधारी या अनवट रागातील " कन्हैया आवो रे " ही स्वकृत बंदीश देखील सादर केली असून जौनपुरी मधील पारंपरिक तराणा सादर केला आहे. तसेच मास्तरांनी संगीतबद्ध केलेले आणि गीतकार क़मर जलालाबादी यांनी लिहिलेले प्रभात फिल्म कंपनीच्या लाखारानी चित्रपटातील " मुरलीवाले तुम जवाब दो " हे मिश्र पहाडी मधील सिनेगीत या मैफलीत मास्तरांनी अत्यंत तरल आवाजात रंजकतेने पेश केले आहे.
ही अविस्मरणीय मैफल ' भाई वे तोरी सावरो ' या अत्यंत माधुर्याने व सुरेलपणे गायलेल्या भैरवीतील चीजेने समाप्त होते. ही प्रसिध्द चीज बडोद्याच्या शेख राहत अली यांच्या संग्रहातली आहे.
कालजयी मौल्यवान खजिना असं हे कृष्णरावांचे वायरवरील मुद्रित संगीत श्रीयुत चंद्रा पै यांनी हस्तगत करून अतिशय काळजीपूर्वक डिजिटल स्वरूपात घेतले. मग हा खजिना त्यांनी विख्यात गायक पंडित उल्हासजी कशाळकर यांच्याकडे सुपूर्त केला.
शास्त्रीय संगीत क्षेत्रातील मोजके कलावंत आणि संगीत प्रेमी यांचा समुदाय ह्या दुर्मिळ सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यायला कृष्णरावांच्या पुण्यातील निवासस्थानी जमला होता. त्यावेळी पं. उल्हासजींनी उत्स्फूर्तपणे कृष्णरावांच्या गायकीची वैशिष्ट्ये विशद केली. त्यानंतर त्यांनी या मैफलीतील काही ध्वनिमुद्रण उपस्थित श्रोत्यांना ऐकवले आणि मग हे ध्वनिमुद्रण त्यांनी फुलंब्रीकर कुटुंबीयांना भेट दिले.
पं. उल्हासजी यावेळी म्हणाले, "मास्तरांचे उपलब्ध झालेले हे लाईव्ह 'वायर' रेकॉर्डिंग आहे. हे ध्वनिमुद्रण स्पष्ट ऐकू येणारे, सलग व सुस्थितीतील असून ध्वनीचा दर्जा देखील उच्च प्रतीचा आहे."
त्यांनी सांगितले, "मास्टर कृष्णराव यांचे अत्यंत सुरेल गाणे आणि दुर्मिळ संगीत रचना ऐकणे हा एक अलौकिक आनंद आहे. माझे गुरू पं. रामभाऊ मराठे यांनी मास्तरांनी या मैफलीत गायलेली शिवमत भैरव मधील बंदीश मला शिकवलेली आहे."
नंतर ते म्हणाले, "मास्टर कृष्णराव यांचे मैफलीतील गायन मला प्रत्यक्ष ऐकता आले नाही, परंतु माझे गुरुजी पं. गजाननबुवा जोशी आम्हा शिष्यांना कायम सांगत असत की मास्तरांनी सादर केलेली प्रत्येक मैफल ही संगीतातील दर्दी व रसिक अशा सर्वांना अतिशय आवडायची. त्यामुळे त्यांची मैफल हमखास यशस्वी ठरत असे."
सोनेरी सुरांची ही आत्यंतिक सुरेल मैफल आता मास्टर कृष्णराव यांच्या या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. हे मौल्यवान ध्वनिमुद्रण उपलब्ध करून दिल्याबद्दल फुलंब्रीकर कुटुंबीय श्री. चंद्रा पै आणि पं. उल्हासजी कशाळकर यांचे मनःपूर्वक ऋणी आहे. हा दुर्मिळ सांगीतिक ठेवा भारतीय शास्त्रीय गायन क्षेत्रातील अर्काइव्हजमध्ये सर्वांसाठी उपलब्ध झालेला 'आनंद ठेवा' आहे.