कै. ती. धोंडूशास्त्री कस्तापूरकर उर्फ 'दुर्गा' | पं. सुहास दातार
१९४९-५० च्या सुमारास मास्तर कृष्णरावांची भाऊबीजेच्या दिवशी पुणे भारत गायन समाजामध्ये एक अत्यंत सुश्राव्य अशी प्रातःकालीन मैफल झाली. सुदैवाने त्या मैफलीचे वायरवर केलेले रेकॉर्डिंग शाबूत होते. ते रेकॉर्डिंग पं. उल्हासजी कशाळकर यांच्यामार्फत डिजिटल स्वरूपात आम्हांला प्राप्त झाले. ते ध्वनिमुद्रण मिळाल्यावर त्वरित मास्तरांच्या या वेबसाईटवर आणि You Tube चॅनेलवर अपलोड केले. ती मैफल ऐकत असताना मास्तरांच्या मागे तंबोऱ्यावर एका गायकाने अत्यंत मधुर, सुरेल आवाजात स्वरसाथ केलेली दिसून येते. हे रेकॉर्डिंग ऐकताना सगळ्यांना असा प्रश्न पडला की हे स्वरसंगतकार कोण आहेत? तो गोड व तयारीचा आवाज नक्कीच पं. सुरेश हळदणकर किंवा पं. राम मराठे यांचा नाही यावर खूप जणांचे एकमत झाले. मग प्रश्न तसाच अनुत्तरीत राहिला होता की ती स्वरसाथ कोणी केली? तर नंतर याचा उलगडा झाला. ती स्वरसाथ मास्तरांकडे साधारण वीस वर्षे गुरुकुल पद्धतीने संगीत शिकलेल्या तेलंगणातील श्री. धोंडूशास्त्री कुस्तापूरकर या शिष्याने केली आहे.
श्री.धोंडूशास्त्री हे दुर्गा राग इतक्या प्रसन्नतेने, बहारदार गात असत की गुरुवर्य मास्तरांनी खुश होऊन आपल्या या शिष्याचे नामकरण 'दुर्गा' असे केले. मग हे तेलुगू भाषिक पट्टशिष्य आपले नाव धोंडूशास्त्री कुस्तापूरकरच्या ऐवजी धोंडूशास्त्री दुर्गा असे लिहू लागले.
श्री.धोंडूशास्त्री यांचा जन्म जानेवारी १९२२ मध्ये तेलंगणातील कुस्तापूर गावामध्ये झाला. त्यांनी सुमारे वीस वर्षे गुरुवर्य मास्तर कृष्णराव यांच्या घरी वास्तव्य करून त्यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची गंडाबद्ध तालीम घेतली. हिंदी व मराठी भजन, टप्पा, ठुमरी, ख्याल, नाट्यसंगीत, भावगीते अशा सर्व संगीत प्रकारांमध्ये मास्तरांकडून त्यांना दर्जेदार तालीम मिळाली. त्यांनी अनेक मैफलींमध्ये मास्तरांना तानपुऱ्यावर स्वरसाथ केली.
श्री.धोंडूशास्त्री हे ऑल इंडिया रेडिओ हैद्राबाद येथील उच्च मानांकित कलावंत होते. त्यांनी रेडिओवर तेलुगू गीतरामायण सुमधुर व तयारीच्या आवाजात गायले आणि ते गीतरामायण मूळ मराठी गीतरामायणा इतकेच अफाट लोकप्रिय झाले. त्यांनी १९५४ पासून आंध्र प्रदेशात ठिकठिकाणी एकूण दहा हजार शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भजन व गीतरामायणाचे कार्यक्रम सादर केले. त्यांचे सर्व जीवन संगीतमय होते. ऑल इंडिया रेडिओ स्टेशन हैद्राबादचा तेलुगू गीतरामायण गायक पुरस्कार आणि ऑल इंडिया रेडिओचे इतर विविध पुरस्कार लाभले. गीतरामायणाच्या रौप्य महोत्सवात मुंबई येथे त्यांना सन्मानित केले गेले. कोयना भूकंपग्रस्तांसाठी स्थापन केलेल्या रिलीफ फंडासाठी त्यांनी संगीत मैफली सादर करून मोठी आर्थिक मदत केली. त्यांचा गाण्यातील अधिकार व कौशल्य बघून पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाने देखील त्यांना संगीत अध्यापक म्हणून प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित केले.
श्री.धोंडूशास्त्रींची गुरुवर्य मास्टर कृष्णराव उर्फ मास्तरांवर आत्यंतिक श्रद्धा होती. त्यांनी एकमेव मास्तरांकडून सर्व गानविद्या हस्तगत केली होती. दरवर्षी त्यांच्या गावी ते गुरुपौर्णिमा व मास्तरांची पुण्यतिथी या पवित्र दिनी संगीत सेवा सादर करत असत. या शिष्याच्या साधेपणा, स्वच्छ राहणी, निर्मळ आचरण, सत्यप्रियता, मधुर वाणी, रियाझाची आवड, कष्टाळूपणा इत्यादी गुणांचे मास्तरांना प्रचंड कौतुक वाटायचे. या शिष्याने घरची शेती सांभाळली आणि मास्तरांचे गाणे व गायकीतून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा आयुष्यभर प्रचार व प्रसार केला. गुरूंप्रति प्रेमादर व निष्ठा दर्शवून सातत्याने गानसेवा केल्यामुळे त्यांना गुरूवर्य मास्तरांचा प्रेमळ आशीर्वाद सदैव लाभला.
गुरुवर्य मास्तरांचे पट्टशिष्य असलेल्या धोंडूशास्त्रींचे ऑगस्ट २००२ मध्ये निजामाबाद जिल्ह्यातील मुपकल गावी वार्धक्याने निधन झाले.
कै. ती. धोंडूशास्त्रींचे उपलब्ध झालेले तेलुगू गीतरामायणातील एका पदाचे हे रेकॉर्डिंग : -