संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव (कृष्णा मास्तर किंवा नुसते मास्तर हे नाव अधिक प्रचलित) यांचा २० ऑक्टोबर हा ४९ वा स्मृतिदिन!
मास्तर कृष्णरावांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी देवाची आळंदी येथे आजोळी सौभाग्यवती मथुराबाई फुलंब्रीकर यांच्या पोटी झाला. मराठवाड्यातील 'फुलंब्री' हे मास्तरांच्या पाठक घराण्याचे मूळ गाव. या घराण्यातील मास्तरांच्या तीन पिढ्या आधीचा ज्ञानी, वेदमूर्ती असा पूर्वज एकदा फ़ुलंब्रीहून पुणे येथे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्यासमोर वेदांतील ऋचा म्हणून दाखवायला आला आणि येथेच स्थायिक झाला. नंतर त्यांच्या पुढील पिढ्यापण पुणे येथेच स्थायिक झाल्या. मास्तरांचे वडील श्री. गणेशपंत हे देखील वेदमूर्ती होते; परंतु दुर्दैवाने मास्तरांचे मौजीबंधन व्हायच्या आधीच अकाली त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली.
मास्तरांची बालवयापासून संगीतकलेची आवड ओळखून त्यांच्या आईने ते लहान असताना त्यांना सवाई गंधर्व यांच्याकडे नेले. त्यांनी त्यांना थेट नाट्यकला प्रवर्तक संगीत नाटक मंडळीत संत सखू या नाटकात विठोबाची भूमिका करण्यासाठी घेतले. मग त्यांनी इयत्ता चौथीत शालेय शिक्षण सोडून देऊन पूर्ण वेळ नाटक कंपनीत काम करणे सुरू केले. संत सखू हे नाटक चांगलेच गाजले व त्यातील बालवयातील मास्तरांची विठोबाची भूमिका आणि त्या भूमिकेत त्यांनी गायलेले 'भक्त जन सदा म्हणती दयासिंधू मला' हे भूप रागातील नाट्यपद खूप प्रसिध्द झाले. मग त्यांनी त्या नाटक मंडळीत राजा हरिश्चंद्र नाटकात संत रोहिदासाची, सौभद्र मध्ये नारदाची अशा भूमिका केल्या. त्याच सुमारास १९११ साली त्यांनी गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले यांच्याकडे जाऊन पूर्णवेळ शास्त्रीय गायनाची गंडाबद्ध तालीम घेण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी गुरुवर्य भास्करबुवांनी या तेरा वर्षांच्या मास्तरांची म्हणजेच बालगायक कृष्णाची धुळे येथे कमिन्स क्लबमध्ये पहिली स्वतंत्र अशी जाहीर मैफल आयोजित केली. त्या मैफलीत मास्तरांनी सादर केलेल्या गायनाबद्दल त्यांच्यावर सर्वांकडून स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर बुवांनी लगेचच पुण्यात त्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित केला. त्या समारंभात त्यांना साहित्यसम्राट न.चिं. उर्फ तात्यासाहेब केळकर यांच्या शुभहस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले आणि *'मास्टर कृष्णा (उर्फ मास्तर कृष्णा)'* अशी उपाधी बहाल करून गौरवण्यात आले.
एकूण सलग चार वर्षे मास्तरांनी दिवसातील तिन्ही प्रहर गुरुवर्य बुवांकडे तालीम घेऊन बुवांची आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर अशा तिन्ही घराण्यांची अवघड व भारदस्त गायकी आत्मसात केली. याबद्दल *"शाबास, कुशा, तू माझी दहा वर्षांची विद्या चार वर्षांतच ग्रहण केलीस!"* अशी बुवांची प्रेमळ शाबासकी मिळवली. बुवांचे मास्तर हे पुत्रवत पट्टशिष्य असल्याने ते त्यांना मायेने कुशा असे संबोधत.
गुरुवर्य भास्करबुवांचे ८ एप्रिल १९२२ रोजी अकाली दुःखद निधन झाले. या घटनेनंतर बालगंधर्वांनी आपले गुरुबंधू व बुवांचे पट्टशिष्य असलेल्या मास्तरांकडे गंधर्व नाटक मंडळीतील सर्व संगीत विभाग सोपवला. तेव्हापासून गंधर्व नाटक मंडळीत गायक नटाशिवाय मास्तरांनी संगीतकार व संगीत शिक्षक अशा भूमिका देखील निभावण्यास सुरुवात केली. त्यांनी तिथे संगीतकार म्हणून १९३३ सालापर्यंत म्हणजे कंपनीच्या अखेरपर्यंत बुवांची गादी मोठ्या भक्तिभावाने चालवली. गुरुवर्य बुवांच्या निर्वाणानंतर वयाने दहा वर्षांनी मास्तरांपेक्षा मोठे असलेले बालगंधर्व मास्तरांना आपल्या गुरूस्थानी मानत असत. हा मास्तरांमधील विद्वत्ता, प्रतिभाशक्ती व गुरूतत्त्व यांचा फार मोठा सन्मान होता. मास्तर व बालगंधर्व यांच्यामधील अकृत्रिम स्नेहभाव अखेरपर्यंत कायम राहिला.
मास्तरांचे एकूण सांगीतिक कार्य लक्षात घेता शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, सुगम संगीत, भक्तिसंगीत, चित्रपट संगीत आणि देश संगीत ही कार्यक्षेत्रे सहज आढळून येतात. या सर्व क्षेत्रांमध्ये मास्तरांनी शास्त्रीय गायक, शास्त्रीय रचनाकार, संगीत नाटकातील स्त्री व पुरुष गायक नट आणि संगीत दिग्दर्शक, चित्रपटातील गायक, गायक नट आणि संगीत दिग्दर्शक, भक्ति गीते व देश गीतांचा गायक, रचनाकार आणि संगीत दिग्दर्शक या नात्याने आपला वेगळा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली एकला नयनाला, विराट ज्ञानी, पांडवा सम्राटपदाला, अगा वैकुंठीच्या राया, अवघाची संसार सुखाचा करीन, बोला अमृत बोला अशी नाट्यपदे, हासत नाचत जाऊ, कशाला उद्याची बात, लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया व धुंद मधुमती रात रे अशी चित्रपट गीते, मनमें मोहन बिराजे अशा बंदीशी, परब्रह्म निष्काम तो हा सारखी भक्तिगीते ही रसिकांच्या स्मृतीत सदैव चिरतरुण असून त्यांना कालातीत गीतांच्या पंक्तीत अढळ स्थान मिळाले आहे.
विविध सांगीतिक क्षेत्रांमध्ये अमूल्य योगदान देऊन जगद्गुरू शंकराचार्य डॉ.कुर्तकोटी यांनी नाशिक येथे १९३० साली प्रदान केलेली 'संगीतकलानिधी' ही उपाधी सार्थ ठरवणाऱ्या मास्तर कृष्णरावांचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी श्री ललिता पंचमीच्या शुभदिनी वृद्धापकाळाने पुण्यातील निवासस्थानी रामप्रहरी निर्वाण झाले. २० ऑक्टोबर २०२३ ते २० ऑक्टोबर २०२४ हे मास्तर कृष्णरावांचे सुवर्णस्मृती वर्ष (५०वी पुण्यतिथी) आहे. या औचित्याने मनःपटलावर उमटलेले त्यांचे हे स्मृतिचित्र!