संगीत कारकीर्द - भक्तिसंगीत

सृजनशील मास्तरांनी गंधर्व नाटक मंडळीच्या 'संगीत कान्होपात्रा' या नाटकातील भक्तीगीतांना स्वतंत्र चाली दिल्या आणि हा नवनिर्मितीचा भक्तीरसपूर्ण पदांसाठी नाटकात प्रथमच केलेला प्रयोग होता. त्याआधीपर्यंत पूर्वसूरींच्या बंदीशींवरून, प्रचलित भजने, अभंग यांवरून नाटकांतील भक्तीपदांना चाली दिल्या जात.

प्रभात फिल्म कंपनीच्या 'धर्मात्मा' या चित्रपटातील भक्तिसंगीतदेखील मास्तरांनी स्वतंत्र स्वररचना करून शास्त्रीय संगीताच्या चौकटीत बसवले. तो पर्यंत चित्रपटांत भक्तिगीते ही परंपरागत वारकरी संगीताच्या चालीत, प्रचलित प्रार्थना व आरतीच्या चालीत म्हटली जायची. अशाप्रकारे मास्तरांनी भक्तीसंगीताचे नवीन दालन सुरू केले. मग त्याच मार्गाने अनेक भक्तिसंगीतकार जाऊ लागले.

१९७०च्या सुमारास HMV ने मास्तरांच्या भक्तीसंगीताची एक रेकॉर्ड काढली. त्यातील मास्तरांनी गायलेले व स्वरबद्ध केलेले 'परब्रह्म निष्काम तो हा', ' तुझी ये निडळी', 'देव म्हणे नाम्या पाहे', 'कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता', 'भाव तेथे देव', 'ऐक ऐक सखये बाई' असे सर्व अभंग, गौळणी खूप प्रसिद्ध झाल्या.

'संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव मराठी भक्तिगीतें' या सन १९७० मध्ये HMV ने प्रकाशित केलेल्या ध्वनीमुद्रिकेवर त्या ध्वनीमुद्रिकेमधील मास्तरांच्या गाण्यांविषयी व मास्तरांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाविषयी कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी केलेले पुढील लिखाण छापले आहे :

बहात्तर वर्षांपूर्वी इंद्रायणीकांठच्या देवाच्या आळंदीत एक मूल जन्माला आले. सौंदर्य आणि संगीत याचे वरदान जणू त्याला उपजतच लाभलेले होते. वयाच्या दहाव्या वर्षी ते चुणचुणीत मूल मराठी रंगभूमीवर आले. त्याने रंगभूमीवर प्रवेश केला तोही प्रत्यक्ष विठ्ठलाचा वेष घेऊन. ती विठ्ठलाची भूमिका वठविताना त्याने आपल्या देवदत्त गळ्याने एक पद गायले. त्या पदाने साऱ्या रसिकतेला वेड लावले. कै. भास्करबुवा बखल्यांसारखा संगीतमहर्षीही या मुलाकडे आकर्षिला गेला. बुवांनी अत्यानंदाने त्या बालनटाला आपले शिष्यत्व बहाल केले. देणाऱ्याने प्रसन्न होऊन दिले. घेणाऱ्याने प्रसादप्राप्तीच्या आनंदाने त्याचा स्वीकार केला. मूळचा गळा तल्लख, लवचिक, हवा तसा फिरू शकणारा. फार गोड.

शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी भास्करबुवांनी रंगमंचाचे व्यासपीठ उपयोगांत आणले. मास्टर कृष्णराव (उर्फ मास्तर कृष्णराव) फुलंब्रीकरांनी आपल्या गुरुचीच परंपरा मोठ्या निष्ठेने सांभाळली. संवर्धित केली. संपन्न केली. प्रत्यक्ष गुरुनेच संस्कारित केलेला गंधर्वांचा गळा मास्तरांच्याही कामी आला. कै. बालगंधर्वांसाठी त्यांनी अनेक स्वररचना सिद्ध केल्या. स्वतःही संगीताची तपश्चर्या अखंड चालू ठेवली. गायक म्हणून अलौकिक यश मिळविले.

संगीतदिग्दर्शक हा शब्द कचकड्याच्या युगातला. नाटकमंडळ्यांच्या भरजरी काळातच मास्तरांनी सोनेरी स्वरांची अनेक महावस्त्रे विणली. नाट्यसुंदरीच्या साऱ्या हौशी पुरवल्या. स्वतःही रंगभूमीवर उत्तम भूमिका वठवल्या. गंधर्वांच्या 'कान्होपात्रा' नाटकाने मास्तरांच्या स्वररचनेला एका आगळ्या रंगाची झांक लाभली. संगीताच्या जरीपटक्याला एक भगवा समानधर्मा मिळाला. भास्करबुवांनी रंगमंचावर आणलेले संगीत - रंगमंदिराच्या पायऱ्या उतरून थेट समाजांत आले. मंदिरामंदिरांत निनादू लागले. शास्त्रीय रागरागिण्या भगवंताचे नाम आळविण्यात सुख मानू लागल्या. कै. नारायणराव गंधर्वांना देखील टाळ मृदुंगाचा छंद जडला, तो या कान्होपात्रेपासूनच.

शास्त्रीय संगीताच्या सुवर्णपात्रात भक्तीचा महारस भरण्याची महान कामगिरी मास्तरांचीच हे मनःपूर्वक म्हटले पाहिजे. 'अगा वैकुंठीच्या राया', 'पतित तू पावना', 'परब्रह्म निष्काम', 'देव म्हणे नाम्या पाहे' इत्यादि त्यांच्या भक्तिगीतांचे स्वर अजूनही सुकलेले नाहीत. त्यांचा घमघमाट या महाराष्ट्र देशांत अखंड दरवळतो आहे.

यशस्वी नट, तपस्वी संगीतकार, तज्ज्ञ गायक आणि इतक्यावरही काळाबरोबर चालणारा चिरतरुण कलावंत ही मास्तरांची रास्त बिरुदावली. चित्रपटाच्या युगांतील प्रभातकाळ आठवावा. तेव्हाचा दिशा धुंद करणारा संगीताचा दरवळ खास मास्तरांचाच होता. अमरज्योती, गोपालकृष्ण, माणूस इत्यादि चित्रपटांचे संगीत मास्तरांचेच होते. 'सुनो सुनो बनके प्राणी' हे पद हिंदुस्थानभर गाजले होते. 'गोपालकृष्ण' हे चित्र तर एक अविस्मरणीय ऑपेरा होता. मास्तरांनी हजाराच्यावर चाली बांधल्या. हजारो मैफिली गाजविल्या. संगीतकलानिधि ही उपाधी थिटी वाटावी, अशी अमोल कामगिरी त्यांनी बजावली. गंधर्वाला 'गाणी' देणारा हा थोर गायक, संगीतकार.

मास्टर कृष्णरावांनी स्वतः गायिलेली अकरा ध्वनिमुद्रित भक्तिगीते या मुद्रिकेवर आहेत. चिरकाल दरवळत राहील असा हा एक पुष्पगुच्छ. प्रत्येक फुलाचे सौंदर्य वेगळे. सुगंध वेगळा. या फुलांना कोमेजणे माहित नाही. यांचा सुगंध आजच्यापेक्षा उद्या अधिक. यांना लय आहे. वय नाही.

- कविवर्य ग. दि. माडगूळकर

डॉ. अशोक दा. रानडे यांनी मास्तरांना 'सुगम संगीत प्रवर्तक' असे संबोधले आहे. भावसंगीत व सुगम संगीत हे संगीत प्रकार मास्तरांच्या संगीतात अंतर्भूत झाले असल्यामुळे हे दोन संगीत प्रकार त्यांच्या संगीतात कुठे ना कुठे डोकवत असताना दिसून येतात. मास्तरांच्या 'नाट्यनिकेतन'साठी दिलेल्या 'सं.कुलवधू' ह्या नाटकातील 'मनरमणा मधुसूदना' पदाच्या भक्तिसंगीतात, 'प्रभात'च्या 'गोपालकृष्ण' चित्रपटातील मास्तरांनी संगीतबद्ध केलेली सर्व गीते ही तर भक्तिसंगीताचा उत्कृष्ट नमुना आहेतच शिवाय 'प्रभात'च्या 'माणूस' चित्रपटातील 'मन पापी भुला' या भजनात, 'प्रभात'च्या 'शेजारी' चित्रपटातील 'श्रीरामाची अयोध्या नगरी' भजनात तर हा मिलाफ प्रकर्षाने दिसून येतो. ती सर्व गीते कानाला गोड व सोपी वाटतात. परंतु ती पदे गायला गेले की सहजसुंदरपणे सादर करायला अवघड जातात अशी अनेकांनी विविध ठिकाणी मास्तरांच्या संगीताबद्दल नोंद केलेली आढळून येते.

बुद्धवंदना

१९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये नवबौद्ध धर्माची संस्थापना करण्याचे ठरवले; तेव्हा त्यांनी मास्तर कृष्णरावांना भेटून त्यांना बुद्धवंदनेस संगीत देऊन गाण्याची विनंती केली. कारण त्यांनी १९४७ ते १९५० या काळात संसदेमध्ये वंदे मातरम् संदर्भात मास्तरांची प्रात्यक्षिके बघून त्यांच्या सांगीतिक ज्ञानाचा अनुभव घेतला होता. मास्तरांनी डॉ. बाबासाहेबांच्या विनंतीस मान देऊन बुद्धवंदना संगीतबद्ध करण्याचे कार्य कोणतेही मानधन न घेता बुद्धदेवाची सेवा म्हणून आनंदाने स्वीकारले. संगीत देण्याआधी मास्तरांनी मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन तेथील प्राचार्यांकडून पाली भाषा शिकून घेतली व बुद्धवंदनेतील मंत्रांचा अर्थ जाणून घेतला आणि मगच त्रिशरण पंचशील संगीतबद्ध केले. ते त्यांनी स्वतःच्या मुख्य आवाजात कोरसचा प्रभावी वापर करून गायले. डॉ. बाबासाहेबांनी या बुद्धवंदनेचे ध्वनिमुद्रण करून घेऊन त्याची 78 RPM ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली.

संवाद व संपर्क

अनुसरण करा