संगीत कारकीर्द - भावसंगीत

मास्तरांना चित्रपट किंवा नाटकातील गाण्यांना चाल देते वेळी कोणत्याही वाद्याची वा पद्याची आवश्यकता भासत नसे. दिग्दर्शकाने नुसते थोडक्यात कथानक सांगून जरी गाण्याचा प्रसंग कथन केला, तरी मास्तर त्या प्रसंगातील नेमका भाव शोधून त्वरित स्वरांची गुंफण करत आणि तिथल्या तिथे विविध चाली तयार करून अनेक चालींचा पर्याय त्या दिग्दर्शकासमोर निवडीकरता ठेवत. म्हणजे संगीतकार म्हणून मास्तरांकडून भावपूर्ण सुरावटी आधी तयार होत आणि मग गीतकार त्या स्वरांच्या गुंफणीनुसार त्यांत शब्द भरे.

मास्तरांच्या 'मराठी असे आमुची मायबोली', 'वेड्या मना तळमळशी' , 'जाई परतोनी बाळा' अशा गाण्यांच्या चाली या भावगीत वळणाच्या आहेत. तसेच 'कुलवधू', 'एक होता म्हातारा', 'कोणे एके काळी' इत्यादी नाट्यनिकेतनच्या नाटकांना दिलेल्या चाली ह्या शास्त्रीय संगीतावर आधारित असल्या तरी भावगीताच्या अंगाने दिलेल्या आहेत.

प्रभात फिल्म कंपनीने फक्त हिंदी भाषेत निर्माण केलेल्या ' वहाँ ' या चित्रपटाला मास्तरांनी संगीत दिले होते. त्यातील सुपरहिट झालेल्या 'हर गली में हैं बगीचे' या तरल, हळूवार चालीतील गाण्यावरून श्री.गजानन वाटवे यांनी 'गगनी उगवला सायंतारा' ह्या भावगीताला अगदी तशीच चाल लावली. यावरून प्रतिभावान मास्तरांच्या भावपूर्ण व दर्जेदार चालींचा मराठी भावगीत विश्वावर खोलवर उमटलेला ठसा दिसून येतो.

संवाद व संपर्क

अनुसरण करा