समग्र जीवनपट
भारतीय संगीताच्या सोनेरी इतिहासाचा शिलेदार - संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर!
जन्म व बालपण | बाल गायकनट | सद्गुरू भेट व कृपाशीर्वाद | गुरूंशी भेट व संगीत शिक्षण | पहिली जाहीर शास्त्रीय संगीत मैफल व सत्कार | प्रतिभाशाली हिंदुस्थानी शास्त्रीय गायक, गायकनट व संगीतकार | संगीतकलानिधीचा अस्त
जन्म व बालपण
श्री. कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर म्हणजेच संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव उर्फ मास्तर कृष्णराव किंवा कृष्णा मास्तर (नुसते 'मास्तर' हे नाव अधिक प्रचलित) यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी देवाची आळंदी येथे आजोळी सौभाग्यवती मथुराबाई फुलंब्रीकर यांच्या पोटी झाला.
मास्तरांचे घराणे वेदपठण करणाऱ्या देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मणांचे. मराठवाड्यातील 'फुलंब्री' हे मास्तरांच्या घराण्याचे मूळ गाव असून वेदपठण करणारे याअर्थी 'पाठक' हे मूळ आडनाव होते. या घराण्यातील मास्तरांच्या तीन पिढ्या आधीचा ज्ञानी, वेदमूर्ती असा पूर्वज एकदा फ़ुलंब्री गावाहून पुणे येथे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्यासमोर वेदपठण करण्याकरिता आला. पर्वती पायथ्याशी भरत असलेल्या रमण्यात पेशवे सरकार विद्वान ब्राह्मणांची विद्वत्ता पारखून त्यांचा मानसन्मान करायचे. त्या वेदमूर्तींनी पेशवे सरकारांना सुस्वर व स्पष्ट आवाजात वेदांमधील ऋचा म्हणून दाखवल्या. मग नानासाहेब पेशवे सरकारांनी खुश होऊन त्या वेदज्ञानी पूर्वजाचा यथोचित आदरसत्कार करून त्यास 'आजपासून आपण फुलंब्रीकर म्हणून ओळखले जाल," अशा शब्दांत गौरविले. या घटनेमुळे मास्तरांच्या घराण्याचे मूळ आडनाव जे पाठक होते ते बदलून 'फुलंब्रीकर' असे झाले. तेव्हापासून तो पूर्वज पुणे येथे स्थायिक झाला. तसेच त्यांच्या पुढील पिढ्यापण पुणे येथे स्थायिक झाल्या.
मास्तरांचे वडिल श्री. गणेशपंत हे देखील वेदमूर्ती होते; परंतु दुर्दैवाने मास्तरांचे मौजीबंधन व्हायच्या आधीच अकाली त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली.
बाल गायकनट
कृष्णा मास्तर हे पुणे येथील नवीन मराठी शाळेत इयत्ता चवथीत शिकत असताना त्यांची संगीताची आवड ओळखून आई मथुराबाई व मास्तरांचे थोरले बंधू त्यांना सवाई गंधर्व यांचेकडे गाणे शिकण्यासाठी घेऊन गेले. तेव्हा सवाई गंधर्व संगीत नाटकांमध्ये अत्यंत व्यग्र असल्यामुळे त्यांनी मास्तरांना गाण्याची तालीम देण्याऐवजी थेट ते काम करत असलेल्या "नाट्यकला प्रवर्तक" ह्या नाटक कंपनीतच नाटकांत गायक-नट म्हणून भूमिका करण्यासाठी घेतो असे सुचवले. आई व बंधूंनी तत्काळ यास अनुमती देऊन कृष्णाला त्या नाटक कंपनीत भरती केले. अशाप्रकारे १९११ साली लहानग्या कृष्णाला (म्हणजेच मास्तरांना) "नाट्यकला प्रवर्तक" या मराठी संगीत नाट्यसंस्थेत बाल गायकनट म्हणून भूमिका करण्याची संधी मिळाली. तिथे मास्तरांना नाट्यपदांकरिता सवाई गंधर्व आणि उस्ताद निसार हुसेन खान यांचे संगीत मार्गदर्शन लाभले.
नाट्यकला प्रवर्तकच्या 'संगीत संत सखुबाई' या अतिशय गाजलेल्या नाटकात सवाई गंधर्व हे संत सखुबाईची भूमिका करत असत तर त्या नाटकात बाल गायकनट कृष्णा (मास्तर) हा 'विठोबा' ची भूमिका साकारत असे. विठ्ठलाच्या भूमिकेत मास्तर 'भक्तजन हो सदा' हे नाट्यपद म्हणत असत व त्या पदाला कायम अनेक वन्समोअर मिळत असत.
नाट्यकला प्रवर्तक संस्थेच्या ह्या संत सखुबाई व इतर संगीत नाटकांमध्ये लहानगा कृष्णा बाल गायकनटाच्या भूमिका करत असे.
सद्गुरू भेट व कृपाशीर्वाद
अहमदनगर जिल्ह्यामधील राहता येथे नाट्यकला प्रवर्तक नाटक कंपनीचा मुक्काम असताना तिथे एकदा गरीब मुलांची भोजनाची पंगत बसली होती. त्यावेळी शिर्डीचे थोर संत श्री साईबाबा मुलांना पंगतीत वाढायला आले होते. त्या पंगतीत लहानगा कृष्णा देखील जेवायला आला होता. कृष्णाने श्री साईबाबांच्या चरण कमलांवर शिरसाष्टांग दंडवत घातला तेव्हा तेथील लोकांनी श्री साईबाबांना सांगितले की ह्या मुलाचे नुकतेच मौजीबंधन झाले असून हा नाटक कंपनीत गायकनट म्हणून काम करतो. तेव्हा श्री साईबाबांनी कृष्णास एखादा श्लोक म्हणावयास सांगितले. मग कृष्णाने एक श्लोक सुस्वर म्हणून श्री साईनाथांची कृपा संपादन केली.
गुरूंशी भेट व संगीत शिक्षण
एकदा नाटयकला प्रवर्तक संस्थेचे संगीत नाटक बघायला "पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर" आणि "गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले" एकत्र आले होते. त्यावेळेस कृष्णाच्या गाण्यातील गोडवा, कल्पकता आणि चतुराई बखलेबुवांनी हेरली. कृष्णा जेव्हा त्या दोन थोर कलावंतांच्या पाया पडला तेव्हा बखलेबुवांनी, "हा मुलगा नीट गाणे शिकल्यास पुढे मोठा गवई होईल," असे कौतुकाने उद्गार काढले. योगायोगाने त्याच सुमारास म्हणजे १९११ साली गंडाबंधन होऊन मास्तरांचे शास्त्रीय गाण्याचे शिक्षण बखलेबुवांकडे सुरू झाले. तेव्हा एकूण चार वर्षे नाट्यकला प्रवर्तक संस्थेमध्ये नाटकांत बाल गायकनटाच्या भूमिका केल्यानंतर मास्तरांनी ती नाटक कंपनी सोडली व पूर्णवेळ बुवांकडे संगीत शिक्षणास वाहून घेतले.
गुरुवर्य पं.भास्करबुवा बखले यांनी मास्तरांना पुत्रवत शिष्य मानून आग्रा, जयपूर व ग्वाल्हेर अशा तिन्ही घराण्यांचा त्रिवेणी संगम असलेली आपली भारदस्त गायकी शिकवण्यास सुरुवात केली आणि मास्तरांना ख्यालीये गवई म्हणून तयार केले. बुवांकडे प्रत्यक्ष संगीत शिक्षण घेत असताना व त्यांना ठिकठिकाणी मैफिलीत तंबोऱ्यावर साथसंगत करत असताना सुमारे चार वर्षांतच मास्तर बुवांच्या गायकीत तरबेज झाले आणि "माझी दहा वर्षातली विद्या तू चार वर्षातच ग्रहण केलीस" अशी त्यांनी बुवांची कौतुकाने शाबासकी मिळवली.
मास्तरांनी लहानपणी नाट्यकलाप्रवर्तक संस्थेतील नाटकांकरिता प्राथमिक संगीत मार्गदर्शन सवाई गंधर्व व उ. निसार हुसेन खान यांचेकडून घेतले आणि पुढे तरुण वयांत काही अनवट चीजांसंदर्भात माहिती व मार्गदर्शन उ.दौलत खांसाहेब यांचेकडून घेतले. त्यांनी लहान वयात गंडाबद्ध शिष्य या नात्याने गानविद्या गुरूवर्य पं. भास्करबुवा बखले या एकाच गुरुजींकडून आत्मसात केली. परंतु मास्तरांच्या गायकीचे वैशिष्टय असे की मास्तरांचे गाणे म्हणजे हुबेहूब गुरुवर्य भास्करबुवांच्या गायकीची नक्कल नव्हती. मास्तरांचे गाणे हे बुवांच्या संस्कारित गायकीवर आधारित असले तरी मास्तरांनी आपले गाणे हे विद्याव्यासंग, बुद्धिमत्ता व उपजत प्रतिभाशक्ती यांनी समृद्ध केले होते. त्यामुळे मास्तरांचे गाणे हे सर्वस्वी त्यांच्या स्वतःच्या शैलीत सादर केलेले असे होते.
पहिली जाहीर शास्त्रीय संगीत मैफल व सत्कार
गुरुवर्य भास्करबुवांकडे गाणे शिकण्यास आरंभ केल्यानंतर थोड्याच अवधीत बुवांनी लहान वयातील कृष्णाला स्वतंत्र मैफल सादर करण्यात तयार केले. बुवांनी कृष्णाची पहिली जाहीर मैफल सन १९११ मध्ये म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी महाराष्ट्रातील धुळे येथील कमिन्स क्लबमध्ये आयोजित केली. त्यावेळी कृष्णाने मैफलीत तयारीने अप्रतिम गायन सादर केले आणि सर्व उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली. पितृतुल्य असलेल्या गुरुवर्य बखलेबुवांनी प्रेमाने शिष्याची पाठ थोपटून आशीर्वाद दिला. धुळे येथील मैफल गाजवल्यानंतर लगेचच कृष्णाचा पुणे येथील किर्लोस्कर थिएटरमध्ये जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. साहित्यसम्राट न. चिं. उर्फ तात्यासाहेब केळकर यांनी त्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविले होते. त्यावेळी साहित्यसम्राट केळकर यांनी बालगायक कृष्णाला सुवर्ण पदक बहाल करून कौतुकाने 'मास्टर कृष्णा' अशी उपाधी दिली. तेव्हापासून कृष्णाचा उल्लेख सर्वत्र मास्टर कृष्णा असा होऊ लागला.
प्रतिभाशाली हिंदुस्थानी शास्त्रीय गायक, गायकनट व संगीतकार
अल्पावधीतच तरुण वयातील मास्तर गुरुवर्य बुवांच्या आज्ञेनुसार शास्त्रीय गायनाच्या स्वतंत्र मैफिली करू लागले व राजदरबारी तसेच मायबाप संगीत रसिकांमध्ये कल्पक शास्त्रीय गायक म्हणून मान्यतेस पात्र ठरून वाहवा मिळवू लागले.
मास्तरांनी बालवयातच विठ्ठलाच्या भूमिकेतून रंगभूमीवर यशस्वी पदार्पण केले ते अखेरपर्यंत रंगभूमीवर गायक-नट, संगीतकार अशा विविध भूमिकांमधून कार्यरत राहिले. शिवाय मास्तरांनी काही मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये गायक-अभिनेते म्हणून भूमिका केल्या आणि अनेक चित्रपटांना संगीत दिले.
तरुण वयातच मास्तर बुवांच्या मार्गदर्शनाखाली संगीत नाटकांसाठी सह-संगीतदिग्दर्शन तसेच स्वतंत्र संगीत रचना करू लागले. आता संगीतकार म्हणून देखील मास्तर नावारूपास येऊ लागले. मास्तर नवनवीन शास्त्रीय बंदिशी बांधू लागले. पूर्णतः नवीन शास्त्रीय रागनिर्मिती करू लागले. असंख्य जोड राग आणि अनवट राग निर्माण करू लागले. नाट्यपदांच्या काही जुन्या चाली बदलून त्या पदांस स्वतंत्र चाली देऊन ती पदे नवीन रुपात सादर करून त्या पदांना लोकप्रियता मिळवू लागले.
मास्तरांनी शास्त्रीय संगीताची प्रत्यक्ष मैफल, नाटक, चित्रपट, रेडिओ अशा सर्व माध्यमांतून सहजसुंदररित्या आपली गानकला सादर केलेली आहे.
संगीतकलानिधीचा अस्त
ज्ञानोबाच्या आळंदीत जन्म घेतलेले संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर म्हणजे भारतीय संगीत क्षेत्रात असामान्य कल्पकतेने अभिजात संगीतकलेचं योगदान दिलेला समर्थ स्वरयोगी!
१९७४ च्या नवरात्रात पुणे येथील मास्तरांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस असलेल्या महाराष्ट्रीय मंडळाच्या सभागृहामध्ये रात्रभर वेगवेगळ्या कलावंतांची एक शास्त्रीय संगीत मैफल आयोजित केलेली होती. ती संगीत मैफल मास्तर त्यांच्या घरात पलंगावर निजून अगदी कान देऊन ऐकत होते. त्यांनी अनेक रात्री त्यांच्या ढंगदार गाण्याने सजवून रसिकांना अवर्णनीय श्रवणानंद दिला होता. आता वार्धक्यामुळे मैफलीत गाणं त्यांनी कधीच बंद केलेलं होतं, तरी सुद्धा मनात सतत गाण्याविषयी चिंतन चालू असे. तब्येत नरम झालेली असली तरी वार्धक्यात देखील त्यांचे नवनवीन राग, बंदिशी निर्माण करून शिष्यांना शिकवण्याचे कार्य अव्याहतपणे सुरूच होते. त्या रात्री ते श्रोता म्हणून त्या मैफलीचा रसास्वाद घेत होते. गाणं ऐकता ऐकता रात्र सरून पहाट झाली तसे मास्तरांच्या सुनबाईंनी त्यांना गरम काढा आणून दिला. तेव्हा मास्तर प्रसन्नतेने उद्गारले, " ललत बघ कसा रंग भरतोय! ". सकाळ होताच मास्तरांचे चिरंजीव खोलीत डोकावले तेव्हा मास्तर डोळे मिटून तल्लीनतेने त्या मैफलीमधून येणारे भैरवीचे सूर कानात साठवत त्या तालाच्या मात्रा बोटांनी मोजत होते. मग " बरे वाटत नाही. जरा निजतो, " असे त्यांनी म्हटल्यावर चिरंजीवांनी त्यांच्या अंगावर पांघरूण घालून दिले अन् त्यांनी डोळे मिटले ते कायमचेच!
मास्तरांनी बाल गायकनट म्हणून मराठी संगीत रंगभूमीवर सुरू केलेला सांगीतिक प्रवास अखंडपणे जीवनाच्या अखेरपर्यंत चालू राहिला. अखंड स्वरांच्या यात्रेतून प्रवास करणाऱ्या या स्वरयात्रीने भैरवीच्या सूरांबरोबर आपली जीवनभैरवी गाऊन इहलोकीची यात्रा पूर्ण केली होती. ती तारीख होती २० ऑक्टोबर १९७४. त्या श्री ललिता पंचमीच्या दिवशी रामप्रहरी आकाशात रवि झळकत होता; मात्र पृथ्वीतलावर या एकमेवाद्वितीय संगीतकलानिधीचा अस्त झालेला होता.