प्रतिभावान कलावंत संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर (मास्तर) यांनी १९३४ साली वन्दे मातरम् हे भारताचे राष्ट्रगीत व्हावे ह्या भावनेतून या गीतास सर्व वयोगटातील सामान्य स्त्री-पुरुषांना सामुदायिकरित्या सहजपणे गाता यावी अशी सोपी, सुमधुर व प्रार्थनेच्या अंगाने जाणारी भावपूर्ण चाल दिली. मास्तर त्यांच्या मैफलीत देखील हे गीत त्यात अवघड सांगीतिक हरकती न घेता त्या एकाच सुलभ चालीत उभे राहून कायम राष्ट्रगीतासारखेच सादर करायचे. त्यांनी हे गीत राष्ट्रगीत व्हावे हाच एकमेव ध्यास अगदी तरुण वयापासूनच घेतला होता. सर्व देशवासियांना वन्दे मातरम् एका सुरात गाता यावे म्हणून मास्तरांनी झिंझोटी हा मुख्यत्वे मंद्र व मध्य सप्तकात गायला जाणारा राग या गीतासाठी निवडला होता. सध्या गायले जाणाऱ्या वन्दे मातरम् गीताची वि. रा.आठवले यांनी दिलेली प्रचलित चाल ही प्रामुख्याने मास्तरांच्या चालीवरच आधारीत आहे.
मास्तरांनी एकदा गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची भेट घेऊन स्वतः चाली दिलेली गाणी व भजने त्यांना ऐकवली होती. ते कर्णमधुर व सर्जनशील गायन ऐकून प्रभावित झालेल्या गुरुदेवांनी "यु आर अ म्युझिकल जिनियस!" अशा शब्दांत उत्स्फूर्तपणे मास्तरांचे कौतुक करून त्यांना अमेरिकेला जाऊन गाणी सादर करण्याचे सुचवले व त्यासाठी शिफारस पत्र पण द्यायची तयारी दर्शवली. दुर्दैवाने या घटनेनंतर काहीच दिवसांत गुरुदेवांचे निर्वाण झाल्याने हा योग काही साधून आला नाही आणि पुढे १९४७ ते १९५० ह्या कालावधीत मास्तरांनी वन्दे मातरम् गीतासाठी संसदेत घटना समिती सदस्यां समोर केलेले अलौकिक कार्य देखील त्यांना बघता आले नाही. परंतु गुरुदेवांनी काढलेले उद्गार ही मास्तरांच्या संगीतकलेला मिळालेली अगदी मार्मिक दाद!
सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथे दिनांक २७ जुलै १९४१ रोजी मास्टर कृष्णरावांच्या गौरवार्थ म्युझिक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली त्याप्रसंगी काढलेले छायाचित्र. डावीकडून विलायत हुसेन खाँ, मास्टर कृष्णराव, सरोजिनीदेवी नायडू, अल्लादिया खाँसाहेब, आबासाहेब मुजुमदार, के.एफ.उर्फ वीर नरीमन आदी प्रभृती.
देशाभिमानी मास्तरांनी वन्दे मातरम् हे भारताचे राष्ट्रगीत होण्यासाठी प्रयत्नांचा हिमालय उभा केला. त्यांच्या त्या अथक प्रयत्नांबद्दल पुढीलप्रमाणे वन्दे मातरम् पटातून माहिती घेऊया : -
गंधर्व नाटक मंडळी बंद पडली तेव्हा १९३४ साली 'धर्मात्मा' चित्रपटाकरता संगीत दिग्दर्शक म्हणून पुणे येथील प्रभात फिल्म कंपनीत मास्तर कृष्णरावांनी प्रवेश केला. धर्मात्मा चित्रपट १९३५ साली प्रसिद्ध झाला. त्यावेळी प्रभातचे एक भागीदार आणि चित्रपट दिग्दर्शक असलेल्या व्ही.शांताराम यांची परवानगी घेऊन कट्टर देशभक्त असलेल्या मास्तरांनी प्रभातच्या म्युझिक स्टुडिओत प्रभातचा वाद्यवृंद वापरून 'वन्दे मातरम्' गीताला भूप, पहाडी अशा विविध रागांमध्ये चाली लावण्याचे प्रयोग करून पाहिले. त्या चाली प्रभातच्या गायकांकडून कोरसमध्ये बसवल्या आणि त्यांचे रेकॉर्डिंग केले.
अखेरीस त्यांनी वन्दे मातरम् गीताकरता 'झिंझोटी' हा मुख्यत्वे मंद्र व मध्य सप्तकात गायला जाणारा राग निश्चित केला. या रागात स्वकृत चालीतील वन्दे मातरम् चे त्यांनी स्वतः गायन करून त्याची ध्वनिमुद्रिका काढली.
बर्लिन ऑलिंम्पिकमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथील क्रीडापटूंकडून मास्तर कृष्णरावांनी स्वकृत चालीत गायलेल्या वन्दे मातरम् गीताची ध्वनिमुद्रिका स्वातंत्र्यपूर्व भारताचे राष्ट्रगीत म्हणून परदेशात सर्वप्रथम वाजवली गेली.
२६ ऑक्टोबर रोजी पुण्यामधील टिळक स्मारक मंदिरात सर्वांत 'पहिला वन्दे मातरम् दिन' साजरा झाला. त्यावेळी स्वा. सावरकर, सेनापती बापट, श्री.ल. ब.भोपटकर, श्री.ग.वि. केतकर यांच्या उपस्थितीत प्रचंड जनसमुदायासमोर झिंझोटी रागामध्ये स्वरबद्ध केलेल्या वन्दे मातरम् गीताचे संपूर्ण कडव्यांसहित गायन केले. गीतास कर्णमधुर व सोपी चाल लावल्याबद्दल श्री. भोपटकर यांनी मास्तरांचा सत्कार केला आणि स्वा.सावरकर यांनी कौतुक केले. यावेळी लोकमान्य टिळकांच्या सूनबाईंनी स्वतः भरतकाम केलेली वन्दे मातरम् अक्षरे लिहिलेली शाल मास्तरांना भेट देण्यात आली.
प्रभात फिल्म कंपनीच्या सर्व चित्रपटांच्या शेवटी मास्तर कृष्णरावांच्या वन्दे मातरम् ची ध्वनिमुद्रिका वाजवली जात असे. ही प्रथा या वर्षीपासून सुरू झाली.
मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांच्या शेवटी नटवर्गातर्फे मास्तरांच्या चालीतील वन्दे मातरम् म्हणण्याची प्रथा सुरू झाली. छोटा गंधर्व, पं. राम मराठे, डॉ.वसंतराव देशपांडे यांनी मास्तरांच्या स्वकृत चालीत म्हटलेल्या वन्दे मातरम् चे ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे.
भारत देश गुलामगिरीत असताना वन्दे मातरम् हे गीत जाहीरपणे गाण्यास बंदी होती. पण देशभक्त मा.कृष्णराव त्यांच्या संगीत मैफलीचा शेवट कायम वन्दे मातरम् गाऊन करायचे. ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली असलेल्या रेडिओवर शास्त्रीय गायन मैफल सादर करताना त्यात त्यांना अखेरीस वन्दे मातरम् गाऊ दिलं नाही म्हणून बाणेदारपणे त्यांनी रेडिओवर गाण्यास बहिष्कार टाकला. पुढे स्वातंत्र्य मिळेपर्यंत सलग नऊ वर्षे हा बहिष्कार कायम राहिला.
हिंदुमहासभेच्या अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर पुढाऱ्यांच्या उपस्थितीत मास्तरांनी स्वकृत चालीत संपूर्ण 'वन्दे मातरम्' म्हटले.
२७ जुलै या दिवशी मास्तर कृष्णरावांची रौप्यमहोत्सवी संगीत कारकीर्द आणि 'वन्दे मातरम्' चे कार्य या औचित्याने नागरिकांतर्फे मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या सभागृहात मास्तरांचा श्रीमती सरोजिनीदेवी नायडूंच्या अध्यक्षतेखाली भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी 'गायकांचा नेता' म्हणून त्यांचा गौरव झाला.
त्या सोहळ्यात विलायत हुसेन खाँ, मास्तर कृष्णराव अशा काही कलावंतांनी शास्त्रीय गायन पेश केले. मास्तरांनी आपल्या मैफलीत 'सदा चिरंजीव हो' ही स्वतः रचलेली सोहोनी भटियार रागातील चीज सादर करून रंगतदार गायन केले. हा सर्वधर्मीय-पंथीय गायक कलावंत आणि रसिकांना एकत्र आणणारा स्वातंत्र्यपूर्व काळातील अभूतपूर्व सांगीतिक सोहळा होता.
याप्रसंगी स्वागताध्यक्ष के.एफ. नरीमन उर्फ वीर नरीमन यांनी 'वन्दे मातरम्'ची घोषणा करून आपल्या भाषणास सुरुवात केली. त्यांनी मास्तरांच्या कार्याचे कौतुक करून मास्तरांना मादाम भिकाजी कामा यांनी तयार केलेला राष्ट्रध्वज (आद्य वन्दे मातरम् ध्वज) भेट दिला.
काव्यपूर्ण अध्यक्षीय भाषणात सरोजिनीदेवींनी मास्तरांचा उल्लेख 'वन्दे मातरम् वाले मास्टर कृष्णराव' असा करून त्या म्हणाल्या, “मास्टर कृष्णरावांनी संगीताच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याबरोबर त्यांच्या राष्ट्रीय कार्याचीही दखल आपणाला घ्यावी लागावी इतके ते मोलाचे आहे!''
या सोहळ्यास मास्तरांचे परात्पर गुरुवर्य असलेले जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अल्लादिया खाँसाहेब, सरदार आबासाहेब मुजुमदार असे मान्यवर आणि इतर गान रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
मुंबईच्या गोवालिया टॅंकवर (आताचे ऑगस्ट क्रांती मैदान) ८ ऑगस्ट रोजी भरलेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक 'चले जाव' अधिवेशनामध्ये भव्य जनसमुदायासमोर देशभक्त मास्तर कृष्णरावांनी अटकेची पर्वा न करता निर्भीडपणे संपूर्ण वन्दे मातरम् गीताचे गायन केले.
भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य दृष्टिपथात असताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी आकाशवाणी केंद्राला दूरध्वनी करून मा.कृष्णराव यांना मुंबई आकाशवाणी केंद्रावर वन्दे मातरम् गाण्यास सन्मानाने आमंत्रित करण्यास सांगितले. तेव्हा सरदार पटेलांच्या या मध्यस्थीमुळे मा. कृष्णराव यांनी आकाशवाणीवर गाण्यास टाकलेला बहिष्कार मागे घेतला आणि गुढीपाडव्याच्या शुभदिनी रेडिओवर वन्दे मातरम् चे गायन करून रेडिओवरील सांगीतिक कारकीर्दीस पुनश्च आरंभ केला.
वन्दे मातरम् हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून संसदेत मास्तरांनी ह्या कालावधीत घटना समितीच्या सदस्यांसमोर या गीताची वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर केली. मास्तरांनी स्त्री-पुरुष समूहाकडून झिंझोटी रागातील स्वरचित चालीत हे गीत गाऊन घेतले व त्याची ध्वनिमुद्रिका संसदेत ऐकवली. तसेच मास्तरांनी पोलीस ग्राउंडवर जाऊन या गीतावर पोलिसांबरोबर स्वतः मार्च करून या गीताचे मार्च सॉंग करून घेऊन त्याचे घटना समिती समोर प्रात्यक्षिक दिले. यावर कळस म्हणजे मास्तरांनी या गीताचे सी.आर.गार्डनर या ब्रिटिश संगीत तज्ञाच्या मदतीने पाश्चात्य पद्धतीनुसार नोटेशन देखील करून घेतले व त्याचे संसदेत प्रात्यक्षिक दिले. म्हणजे पं. नेहरूंनी या गीताबाबत घेतलेले वेगवेगळे आक्षेप मास्तरांनी आपल्या प्रात्यक्षिकांमधून साफ खोडून टाकले.
अखेर घटना समिती सदस्यांचे मतदान न घेता राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसादांनी भारत सरकारतर्फे या गीताला २४ जानेवारी १९५० रोजी 'राष्ट्रीय गीत' असे घोषित केले आणि जन गण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून घोषित केले. वन्दे मातरम् गीताला राष्ट्रगीताइतकाच समान बहुमान देण्यात आला. म्हणजे सरकारतर्फे हे गीत पूर्णपणे अव्हेरले गेले नाही. तत्कालीन सरकारच्या या निर्णयात मास्तर कृष्णराव यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. मास्तर कृष्णराव यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत वन्दे मातरम् गीताचा निष्ठेने प्रचार व प्रसार केला.
१९४७ ते १९५० या कालावधीत मास्तरांनी संसदेमध्ये घटना समिती सदस्यांसमोर सादर केलेली ह्या गीताची विविध प्रात्यक्षिके पाहून मास्तरांबद्दल इतर सदस्यांसारखाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना देखील प्रेमादर वाटला.
मास्तरांच्या प्रगल्भ सांगीतिक ज्ञानाची खात्री पटल्यामुळे १९५६ साली डॉ.आंबेडकर यांनी त्यांना बुद्धवंदना संगीतबद्ध करण्याची विनंती केली. मग डॉ.आंबेडकर यांच्या खास विनंतीवरून मास्तरांनी भारतात प्रथमच बुद्धवंदना संगीतबद्ध करून त्याचे स्वतःच्या मुख्य आवाजात कोरसच्या साथीत गायन सादर केले. त्या बुद्धवंदनेचे डॉ. बाबासाहेबांनी ध्वनिमुद्रण करून दोन ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्या ध्वनिमुद्रिका १४ ऑक्टोबर १९५६ रोजी सम्राट अशोक विजयादशमी या शुभदिनी नागपूरमधील धर्मांतर सोहळ्यात वाजवल्या गेल्या.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९५२ मध्ये पुणे येथे भव्य समारंभ आयोजित करून 'अभिनव भारत' ही स्वस्थापित सशस्त्र क्रांती संघटना विसर्जित केली. तेव्हा स्वातंत्र्य युद्धातील सर्व हुतात्म्यांच्या स्मरणार्थ एक क्रांतीस्तंभ उभारून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हा ‘अभिनव भारत’ सांगता समारंभ पुण्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांच्या रूपाने हा समारंभ संपन्न झाला. अभिनव भारत संघटनेच्या तीन दिवसीय सांगता सोहळ्याच्या दि. १० मे १९५२ या अखेरच्या दिवशी मास्तर कृष्णरावांनी व्यासपीठावरून स्वकृत चालीतील संपूर्ण वन्दे मातरम् म्हटले. हे गीत गाण्यासाठी त्यांना स्वतः स्वा.सावरकरांनी आमंत्रित केले होते.
मास्तर हे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचे शपथबद्ध सदस्य होते. परंतु मास्तरांनी त्यांची हुकूमत असलेल्या संगीताच्या माध्यमातूनच क्रांती केली. वन्दे मातरम् गीत हे राष्ट्रगीत होण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीविरुद्ध तसेच स्वातंत्र्योत्तर काळात सत्ताधाऱ्यांविरुद्ध निर्भयपणे लढा दिला.
भारत सरकारतर्फे भारतीय कलावंतांच्या सांस्कृतिक शिष्टमंडळाच्या नेतृत्वाकरता मास्तरांची निवड होऊन चीनला प्रयाण. या शिष्टमंडळात मास्तरांबरोबर हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्ना भोळे, मधुकर गोळविलकर, दमयंती जोशी आदी कलावंतांचा समावेश होता.
पेकिंग (आताचे नाव बीजिंग) मध्ये हे कलावंत पथक प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करते वेळी कार्यक्रमाचा आरंभ मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेले वन्दे मातरम् मास्तरांच्याच नेतृत्वाखाली गाऊन करत असत.
रेडिओवरील मैफलीत वन्दे मातरम् गाऊ न दिल्यामुळे मास्तरांनी सुमारे दहा वर्षे रेडिओवर गायला बहिष्कार टाकला. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 'ऑल इंडिया रेडिओ'च्या आकाशवाणीतील ‘मुख्य सल्लागार मंडळा'त मास्तर कृष्णरावांना मानाचे स्थान देण्यात आले. १९५३ साली आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली. तेव्हा पुणे केंद्रात संगीतनिर्माता म्हणून त्यांची सन्मानाने नेमणूक करण्यात आली.
मास्तरांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मास्तरांच्या गाण्याचे निस्सीम चाहते असलेल्या पु. ल. देशपांडे यांचे जाहिर भाषण झाले. त्या भाषणात पु. ल. देशपांडे म्हणाले, "मास्तरांनी वन्दे मातरम् करता केलेले अथक परिश्रम पाहून आता त्यांनाच 'वन्दे मास्तरम्" म्हणावेसे वाटते.
मास्तरांनी स्वातंत्र्योत्तर काळात वन्दे मातरम् गीताचा व्रतस्थपणे सर्वत्र प्रचार व प्रसार केला. त्यांनी अनेक संस्था, सभा, महाविद्यालये, शाळा, इत्यादी ठिकाणी जाऊन विशेष प्रसंगी स्वकृत चालीत संपूर्ण वन्दे मातरम् गायले. ठिकठिकाणी जाऊन इतरांना या गीताचे समूह गायन शिकवले. १९७० साली पुणे येथे टिळक विद्यापीठाच्या नवीन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी त्यांनी अखेरचे वन्दे मातरम् चे जाहीर गायन केले.