कृष्णामास्तरांच्या लाईव्ह मैफलीचे अभ्यासपूर्ण विवेचन

संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांची प्रात:कालीन मैफल – एक सुखद अनुभव

- डॉ. चैतन्य कुंटे

संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांच्या १९५० च्या सुमारच्या प्रात:कालीन मैफलीचे ध्वनिमुद्रण अलीकडेच ऐकायला मिळाले, आणि आता ते वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. कृष्णामास्तरांच्या ७८ गतीच्या, ३ मिनिटांच्या अवधीच्या अनेक ध्वनिमुद्रिका आहेत. १९२० ते १९४०च्या दशकांतील ह्या ध्वनिमुद्रिकांत त्यांच्या तरुणपणीचे, कसदार गायन ऐकायला मिळत असले तरी त्यातील ३ मिनिटांच्या कालमर्यादेमुळे विस्तृत गायन ऐकण्याचा आनंद त्यातून मिळत नसे. प्रत्यक्ष मैफलीतील काही ध्वनिमुद्रणे उपलब्ध आहेत – पण ती बव्हंशी कृष्णामास्तरांच्या उतार वयातील, गायनातील जोश उणावलेल्या अवस्थेतली आहेत. त्यामुळे त्यांचे ऐन उमेदीतील, मैफलीतले विस्तृत, जोरकस आणि रंगतदार असे गायन उपलब्ध नसण्याची मोठीच उणीव होती – ही उणीव ह्या प्रत्यक्ष मैफलीच्या ध्वनिमुद्रणामुळे दूर झाली आहे. कृष्णामास्तर हे ‘रंगदेवता प्रसन्न असलेला गवैया’म्हणून सर्वमान्य होते, आणि त्यांच्या रंगतदार मैफलींची वर्णने केशवराव भोळे, कृ. द. दीक्षित अशांच्या लेखनात आहेत, तसेच कृष्णामास्तरांच्या ऐन बहराच्या काळात त्यांचा सहवास लाभलेल्या पं. मधुसूदन कानेटकर, पं. मोहन कर्वे ह्या शिष्यांच्या, तसेच मास्तरांना अत्यंत मानणाऱ्या पं. गजाननबुवा जोशी, पं. भीमसेन जोशी, डॉ. अशोक दा. रानडे यांच्या बोलण्यातही त्यांच्या मैफलीचा 'अद्भुत करिष्मा’ काय असे याचा उल्लेख मी अनेकदा ऐकला होता. अशा लेखन आणि संस्मरणांतले मास्तरांचे गाणे माझ्या पिढीने अनुभवले नव्हते. ह्या जुन्याजाणत्यांनी मास्तरांचा जो करिष्मा प्रत्यक्ष अनुभवला होता, त्याची झलक मला ह्या ध्वनिमुद्रणातून मिळाली – आणि माझे कान अक्षरश: धन्य झाले!

प्रात:कालीन मैफलीच्या ह्या ध्वनिमुद्रणात प्रथम राग शिवमत भैरव आहे – त्यात ‘आज मौजूद भए’ हा आग्रा परंपरेतील ख्याल मध्यविलंबित एकतालात आहे. ह्याचा अवधी रागाच्या एकंदर मांडणीतल्या शेवटच्या १८:१० मिनिटांचा आहे – अर्थातच रागमांडणीचा आरंभीचा भाग, आलापचारी इथे ऐकायला मिळत नाही – थेट बहलावा, तनैयत, बोलांची कामगत असा रागप्रस्तुतीतील पुढच्या टप्प्यातील भाग ऐकायला मिळतो. ह्यात मास्तरांनी अत्यंत जोरकस गमक घेतली आहे, तसेच लडिवाळ बहलावे देखील आहेत. नाना प्रकारच्या ताना आहेत आणि त्यांत खास करून अवरोही सपाट ताना वेधक आहेत. शिवमत भैरव रागातल्या दोन्ही गांधारांचा स्वरोच्चार केवळ चमत्कृती पुरता नाही – त्यात रागाचे भावात्म दर्शनही घडते. (जाता जाता एक आठवण नमूद करतो – तपोवृद्ध कृष्णामास्तरांना पं. कुमार गंधर्व भेटायला आले होते, तेव्हा मास्तरांनी फार प्रेमानी कुमारजींना राग शिवमत भैरवचा ‘आज मौजूद भए’हा ख्याल शिकवला होता अशी आठवण वसुंधरा कोमकली यांनी मला सांगितली होती.)

राग 'बरवा' मधील प्रसिद्ध अशी, मनरंग रचित ‘एरी मैको नाही परत चैन’ ही बंदिश मध्यलय त्रितालात कृष्णामास्तर गायले आहेत. विशेष म्हणजे ह्या रागात एरवी न केला जाणारा शुद्ध गांधाराचा वापर त्यांनी फार सहजसुंदर रीतीने केला आहे. ह्यातील बोलबांट आणि विविध गतीभेदांतील बोलांची लयकारी तर स्तिमित करते!

ह्या नंतर ‘रैन गई भई भोर श्यामसलोने’ ही मध्यलय झूमरा तालातील स्वरचित बंदिश मास्तरांनी गायली आहे. मास्तरांच्या ‘राग संग्रह’ च्या सहाव्या भागात ही बंदिश राग भटियारमध्ये दिली आहे, मात्र ह्या बंदिशीच्या त्यांच्या गायनात सध्याच्या प्रचलित भटियारपेक्षा खूपच निराळे रूप दिसते. मास्तरांनी ह्या बंदिशीत प्रचलित भटियार रागात लावतात तसा- तार षड्जाकडे जाताना, मारवा अंगाने आरोही तीव्र मध्यम लावला नसून केवळ तार सप्तकात मगरेसा ह्या स्वरसंगतीत अवरोही तीव्र मध्यम वापरला आहे. त्यात उत्तरांगात मांडची किंचित झांकही आहे, कणरूपात शुद्ध ऋषभाचा वापरही आहे. शुद्ध भटियार ह्या रागात शुद्ध ऋषभाचा वापर होतो आणि मांड अंगही असते, मात्र त्यात कोमल ऋषभ लावला जात नाही – मास्तरांनी पूर्वांगात केवळ कोमल रे आणि उत्तरांगात कणाने शुद्ध रे आणि ठळकपणे कोमल रे लावला आहे – त्यामुळे हा राग शुद्ध भटियार देखील नाही. मास्तरांनी गायनात जे रागरूप ठेवले आहे ते राग भटियारपेक्षा भंखार ह्या अनवट रागाशी अधिक मिळतेजुळते आहे. भंखार रागाचे विविध घराण्यांत, परंपरात वेगवेगळे रागरूप आहे (दोन्ही मध्यमांचा, दोन्ही धैवतांचा, ललित अंग असलेला आणि नसलेला, इ.) आणि त्यापैकी भास्करबुवा बखले यांच्या परंपरेतील हे रागरूप मास्तरांनी त्यांच्या ‘रागसंग्रह’ पुस्तकाच्या सातव्या भागात (पृष्ठ ३५) स्पष्ट केले आहे. त्यांनी ह्या भंखारच्या ह्या प्रकारातील, मनरंग परंपरेतील ‘ए रुठ मा हे कारी कतली दावर नैनी’ही बंदिशही पुस्तकात दिली आहे. ह्या बंदिशीच्या रागरूपाशी सुसंगत असे रागरूप ‘रैन गई भई भोर’ह्या कृष्णामास्तरांच्या स्वरचित बंदिशीत सापडते. तर ह्या बंदिशीचा राग कोणता याची चर्चा कोणत्याही ठोस उत्तरापर्यंत न नेता, मास्तरांनी जे गायन केले आहे त्याचा आस्वाद घेणे अधिक उचित ठरेल. मास्तरांनी २० मिनिटांच्या मांडणीत ‘रैन गई भई भोर’ हया बंदिशीत पूर्वांगात गंभीर आणि उत्तरांगात खेळकर असे स्वभाव इतक्या बेमालूमपणे एकत्र केले आहेत की त्याचा एकसंध, सुंदर असर होतो! ह्या बंदिशीच्याही गायनात मध्य षड्ज ते तार पंचम ह्या स्वरपल्ल्यात कृष्णामास्तरांनी सहजसुंदर विहार केला आहे.

ह्यानंतर राग गांधारीमध्ये ‘आवो रे कन्हैया तुझबिन कल ना परे’ ही द्रुत त्रितालातील चीज कृष्णामास्तरांनी गायली आहे. गांधारी किंवा गांधारी तोडी हा राग केवळ शुद्ध ऋषभ घेऊन किंवा दोन्ही ऋषभ घेऊन गायला जातो – ह्या रागरुपांनुसार वेगळ्या बंदिशी गायल्या जातात. परंतु मास्तरांनी ह्या दोन्हीपेक्षा निराळे असे गांधारीचे रागरूप ठेवले आहे – दोन्ही ऋषभ आणि दोन्ही धैवतांचा वापर असलेले हे गांधारी रागाचे अप्रचलित रूप आहे. ही बंदिशही मास्तरांनीच रचलेली आहे. ह्यात मास्तरांनी विस्तारात सरगम गायली आहे – हे एक वेगळेपण. त्या काळात सरगम गाण्याचे फारसे प्रचलन नव्हते आणि मास्तरांनी ह्याही बाबतीत नाविन्य आणले होते, हे इथे लक्षात येते.

गांधारीच्या पुढे जौनपुरी रागातील तराना गाताना मास्तरांनी तंतकारीचे, बीन वा सतारीच्या ‘झाल्या’ची आठवण करून देणारी कामगत अत्यंत विलाक्षण केली आहे. ग्वाल्हेर परंपरेत गायला जाणारा, प्रचलित असा हा तराना मास्तरांनी अतिद्रुत लयीत गायला आहे आणि त्यात जुन्या काळातली खास तरान्याची गायकी ऐकायला मिळते. त्या काळी उस्ताद निसार हुसेन खां, विनायकबुवा पटवर्धन असे गायक तरान्याच्या गायकीसाठी नावाजलेले होते. त्याच प्रकारचे, अतिद्रुत लयीतले चपळ आणि प्रभावी गायन कृष्णामास्तरांकडून ऐकताना आपण स्तिमित होऊन जातो!

ख्यालाखेरीज ठुमरी-दादरे, नाट्यपदे, भक्तिगीते आणि एवढेच काय स्वरचित चित्रपटगीतेही तितक्याच्या दर्जेदार प्रकारे, रंगतीने आणि कल्पकतेने गाणारे अजोड गायक म्हणून त्या काळात मास्टर कृष्णरावांची ख्याती होती. लहान-लहान स्वरलडींतून, दोन-तीनच स्वरांच्या उलटसुलट वापरांतून, कधी रागमिश्रण करत, तर कधी वेगळ्याच स्वराला षड्ज कल्पून मूर्च्छना तत्त्वाने एखाद्या रागाचा तिरोभाव करत कृष्णामास्तर ही पदे रंगवत असत. सिनेमातले साध्या चालीचे गीतही मग मास्तरांच्या गळ्यातून एक विलक्षण निराळा अनुभव देणारे ठरत असे. ह्याचाच अनुभव इथे ‘मुरलीवाले तुम जवाब दो’ ह्या गीतातून येतो. प्रभात फिल्म कंपनीच्या ‘लाखारानी’ ह्या चित्रपटासाठी कमर जलालाबादी यांनी लिहिलेले हे गीत मास्तरांनी मिश्र पहाडी रागात स्वरबद्ध केले होते. कृष्णामास्तर मैफलीत अशी पदे विस्तारपूर्वक गात असत आणि त्यात त्यांच्या प्रतिभेचा चकित करणारा आविष्कार दिसतो. सिनेमातले हे जेमतेम ३ मिनिटांचे गाणे कृष्णामास्तरांनी तब्बल १७ मिनिटे गायले आहे – आणि विशेष म्हणजे त्यातले एकही मिनिट कंटाळवाणे होत नाही. सतत नाविन्यपूर्ण हरकती आणि पुढे काही तरी निराळे घडण्याची चाहुल देणारी कामगत केल्याने मास्तरांचे ह्या गीताचे गायन अक्षरश: खिळवून ठेवतेच, शिवाय एका निराळ्याच भावावस्थेत नेऊन पोचवते.

मैफलीच्या अखेरीस कृष्णामास्तरांनी ‘भाई वे तोरी सावरो’ ही भैरवीतील, दीपचंदी ठेक्यातली ठुमरी सुमारे १७ मिनिटे गायली आहे. ठुमरी गायक आणि नर्तक चांदपियांच्या परंपरेतील ही ठुमरी त्या काळात खूप प्रचलित होती. भास्करबुवा, सवाई गंधर्व असे गवई ही ठुमरी गात असत. (भास्करबुवांनी ह्या ठुमरीवरून एक नाट्यगीतही बांधले होते.) ठुमरीचा जो खास ढंग भास्करबुवा आणि समकालीन पुरुष गायकांच्या प्रस्तुतीतून सिद्ध झाला होता, आणि ज्याला त्या काळी ‘ख्याली ठुमरी’ अथवा ‘महाराष्ट्री ठुमरी’ म्हणून ओळखले जायचे, तो कृष्णामास्तरांच्या गायनातून लक्षात येतो. (पूरब बाजापेक्षा निराळे असे स्वरूप असणारा हा ‘महाराष्ट्र बाज’ डॉ. शत्रुघ्न शुक्ल यांसारख्या तज्ज्ञाने नमूद केला आहे.) ठुमरीतील चैनदार बोलबनावापेक्षा स्वरसमूहांच्या मोहक आणि कल्पक गुंफणीतून, ख्यालाच्या अंगाने ही ठुमरी गायली जायची – आज ह्या ढंगाची ठुमरी लुप्तप्राय झाली आहे. कृष्णामास्तरांनी भैरवीतील नाना रसरंग दाखवत ही ठुमरी इतकी सुंदर नटवली आहे, की मैफलीचा समारोप ह्याहून अधिक समर्पक असणारच नाही असे वाटते!

कृष्णामास्तरांच्या ह्या ध्वनिमुद्रणातील गायन आणि नंतरच्या वयातील उपलब्ध ध्वनिमुद्रणांचा तौलनिक विचार करता काही निरीक्षणे नोंदवता येतात –

  1. १. मास्तरांच्या नंतरच्या गायनात सप्तकपल्ला मंद्र धैवत ते तार गांधार इतपतच मर्यादित आहे, मात्र इथे तो तार पंचमापर्यंत सुस्पष्टपणे व्यापलेला दिसतो.
  2. २. पुढच्या काळात त्यांच्या तानेची गती मंदावली होती. इथे तनैयत अत्यंत गतिमान, दाणेदार आणि वैविध्यपूर्ण आहे.
  3. ३. इथले गायन अधिक जोरकस, ताकदवान गमकयुक्त आहे – नंतरच्या काळात जोरकसपणा कमी झाला, गमकेतली ताकद कमी होऊन ती गमक हलकी झाली होती. इथले गायन त्यामुळे अधिक बोजदार, कसदारपणाचा प्रत्यय देते.
  4. ४. इथे त्यांनी आवर्तने भरगच्च भरली आहेत – पुढच्या काळात आवर्तनांत मजकूर विरळ झाला होता. प्रत्येक आवर्तन अत्यंत कल्पकपणे गुंफलेले असल्याने एकंदर आविष्कार हा भरदार वाटतो.
  5. ५. त्यांच्या गायनात मुख्यत्वे मध्यविलंबित आणि मध्यद्रुत लय सतत खेळती ठेवली आहे. हा गुण शेवटपर्यंत राहिला.
  6. ६. अनवट, काहीसे गुंतागुंतीचे राग गातानाही मास्तरांच्या गाण्यातून अवजडपणा नसे – हे रागही सामान्य श्रोत्यालाही आपलेसे वाटावेत असे पेश करण्याची खुबी मास्तरांच्या कल्पक मांडणीत होती. हा गुणही अखेरपर्यंत त्यांच्या गाण्यातले एक सामर्थ्यस्थळ राहिले होते.
  7. ७. प्रसन्नता आणि प्रासादिकता हे गुण मास्तरांच्या गायनात सदैव अबाधित राहिले. म्हणूनच त्यांची ‘रंगमूर्ती’ ही उपाधी सार्थ ठरते.
  8. ८. मास्टर कृष्णरावांचे शिष्योत्तम असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या अनेक ध्वनिमुद्रणांत जी जोरकस, कल्पक गायकी आढळते, अगदी तीच गायकी इथे त्यांच्या गुरूंच्या गायनात आहे – परंतु अधिक लालित्यपूर्ण आणि तलम! भास्करबुवा कसे गात असत याचा काही अंशी अंदाज कृष्णामास्तरांच्या ह्या गायनातून येतो. त्याचप्रमाणे असे म्हणता येईल की कृष्णामास्तर तरुणपणी जे जोरकस आणि एकामागून एक येणाऱ्या वैविध्यपूर्ण कल्पनांच्या अनावर लाटा असणारी गायकी गात, तिचा अंदाज पुढल्या काळातील पं. राम मराठे यांच्या गायकीतून येतो. फरक एवढाच की रामभाऊंच्या गायनात मर्दानी बोजदारपणा अधिक होता, तर कृष्णामास्तरांच्या गाण्यात तरलता, मार्दव अधिक होते.

गेल्या शतकाच्या काळात ख्यालाच्या प्रस्तुतीकरणाचा ठराविक असा मार्गक्रम ठरला – स्थायीचे आलाप, अंतऱ्याचे आलाप, मग लय वाढवून बेहलावा, बोलआलाप, बोलतान, सरगम, तान इ. साच्यात ख्यालगायन काहीसे साचेबद्ध झाले, अडकले. मग उपज अंगापेक्षा क्रमवार बढत करण्याकडे गायक प्रवृत्त झाले. (कदाचित ख्याल गायकीचे शिक्षणही विद्यालयीन पद्धतीत साचेबद्ध झाल्याने असे झाले असावे.) प्रत्येक राग, बंदिश, ठेका यांच्यानुसार उपज करत, मौज घेत गाणे हा प्रकार जवळपास नामशेष झाला. म्हणून तर ह्या पूर्वीच्या पद्धतीने ख्यालाची पेशकश करणारे कुमार गंधर्व लोकांना काही तरी निराळे गात आहेत असे वाटू लागले! मात्र हे लक्षात घ्यायला हवे १९३०-४०च्या आधी बव्हंशी गायक (विशेषत: ग्वाल्हेर परंपरेतले, भास्करबुवा व वझेबुवांच्या पठडीतले) अशाच प्रकारे उपजेचे, ठराविक मार्गक्रम नसलेले, आणि प्रत्येक बंदिशीच्या अंगाने वेगळे असे गाणे गात असत. ख्याल गायकीची ही पूर्वीची रीत मास्टर कृष्णरावांच्या ह्या मैफलीच्या गाण्यात स्पष्टपणे दिसते – प्रत्येक रागात ते काही आलाप करत बसत नाहीत, की क्रमवार मांडणी करत नाहीत. प्रत्येक बंदिशीतून काय, कसे आणि केवढे मांडायचे, त्यातले ‘गाणेपण’ कसे समोर आणायचे याचा सुंदर अंदाज मास्तरांच्या ह्या मैफलीच्या गाण्यात दिसतो. तेव्हाचे मास्तरांचे गाणे अत्यंत तयार गळ्याचे, हुकुमत असलेले आहे – परंतु ‘आता पहा मी कशी तान फिरवतो’ असा बेगडी आविर्भाव त्यात नाही. प्रत्येक क्षणी प्रत्येक आवर्तनात, प्रत्येक बंदिशीत ते गाण्याची मौज घेतात – आणि देतातही... मैफलीत सदैव प्रसन्नतेचा माहोल आहे, ‘वाहवा’ची खैरात होत आहे, कधी श्रोते आपण काही अद्भुत, अलौकिक असे अनुभवत आहोत ह्या जाणीवेने मूकस्तब्ध होत आहेत... ही सर्व प्रत्यक्ष मैफल ऐकतानाची प्रचीती हे ध्वनिमुद्रण ऐकून येते!

भास्करबुवांचे गाणे ऐकून आनंदाने, अलौकिकतेच्या जाणीवेने लोकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत असत... असाच अनुभव कारकीर्दीच्या आधीच्या काळात मास्तरही देत असत असे जुन्याजाणत्यांनी नमूद केले आहे. त्याचा प्रत्यय मास्टर कृष्णरावांना प्रत्यक्ष न पाहिलेल्या-ऐकलेल्या माझ्यासारख्या आजच्या काळातल्या कलाकारांना, अभ्यासकांनाही ह्या ध्वनिमुद्रणातून नक्कीच येत आहे. संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांची ‘ख्यालिया’ म्हणून असणारी विलक्षण उंची इथे अधोरेखित होते.

मास्टर कृष्णरावांची लाईव्ह मैफल १९५०

संवाद व संपर्क

अनुसरण करा