अभिप्राय

मास्टर कृष्णरावांची लाईव्ह मैफल

वाह, वाह! मास्तर कृष्णरावांचा त्यांच्या ऐन बहरातील संगीत खजिना समोर आला आहे.

पं. भास्करबुवा बखले यांच्या संगीतत्वाची ग्वाल्हेर छापाची गायकी मास्तरांच्या गाण्यात पुरेपूर दिसून येते. या गायकीचा मास्तरप्रणीत विस्तार अतिशय आकर्षक आहे. हाच विस्तार रामभाऊ मराठे आणि त्या काळातील अनेकांनी अनुसरण केलेला दिसून येतो. ग्वाल्हेरी पल्लेदारपणाबरोबरच स्वरांचा नाट्यपूर्ण लडिवाळ प्रयोगही मास्तरांनी अतिशय कुशलतेने केला आणि संगीत नाटकांत याचा मनोहारी उपयोगही अतिशय सफल झाला.

मास्तर कृष्णराव आणि त्यांचे संगीत असे एक युग महाराष्ट्रात अवतरित झाले होते.

मास्तर कृष्णराव यांना श्रद्धापूर्वक नमन! 🙏

- पं. विद्याधर व्यास

ध्वनिमुद्रण मिळाल्याबद्दल अभिनंदन!

माझे वडील कै. श्री.जयंत साळगावकर मास्तरांचे भक्त होते. त्यांनी 'दैनिक मराठा' मध्ये मास्तरांवर 'तुम मत जावो मुरारी रे' हा अग्रलेख लिहिला होता.

- श्री.जयराज साळगावकर

पुन्हा पुन्हा ऐकावे इतकं सुंदर ध्वनिमुद्रण आणि 'मास्तर' गायकी. वंदन!!! मास्तरांच्या गायकीचा स्तर किती उच्च कोटीचा होता हे सहज जाणवते. शिवमत भैरव, बरवा, जौनपुरी, भैरवी, हिंदी भजन सर्वच अप्रतिम!तरल आवाज लावून मास्तर गायकी सुंदर मांडायचे. एकूणच गायकीतून हरवत चाललेलं ताकदीचे गमक अंग जरूर ऐकावे.

- पं. मुकुंद मराठे

खरंच ! आम्हाला चंद्रा पै यांनी हे रेकॉर्डिंग ऐकवल्यावर इतका आनंद झाला होता की काय सांगू !

तेव्हांपासून वाटत होतं की हे अनेकांना ऐकायला मिळालं पाहिजे.

अखेर ती इच्छा पूर्ण झाली.

खूप आनंद झाला.

- सौ. संजीवनी उल्हास कशाळकर

We are just happy that this recording could be restored. And I am sure this will be a treasure that music lovers will cherish forever !

- योगिनी गांधी

भारतीय रागसंगीताचे बादशहा, तसेच भारतीय संस्कारांतल्या इतरही जवळपास सर्वच संगीतप्रकारांवर प्रभुत्व मिळवून, आपल्या दीर्घकाळ टिकून राहिलेल्या भरीव कामगिरीने ज्यांनी लोकमान्यता व राजमान्यता मिळवली आणि कित्येक संगीत-अभ्यासकांसाठी आजही जे गुरुस्थानी आहेत, ते आम्हा सर्वांचे दैवत म्हणजे *'मास्तर कृष्णराव'!*

देवगंधर्व गायनाचार्य भास्करबुवा बखले यांचे शिष्योत्तम असलेले मास्तर शारीरिक दृष्ट्या सर्वाधिक सक्षम व लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच्या कालखंडातील त्यांच्या एका 'अद्भुत' अशा मैफलीचं ध्वनिमुद्रण ऐकण्याची संधी नुकतीच मिळाली.

मास्तरांच्या गाण्याबद्दल लिहायला तर माझ्याकडे शब्द नाहीतच, तसेच मला तो अधिकार नाही, योग्यताही नाही. परंतु इतर खूप थोर गवई होऊन गेले तरीही मास्तर हे नेहमी 'एकमेवाद्वितीयच' का समजले गेले, याची प्रचिती हे ध्वनिमुद्रण ऐकताना आली.

धन्यवाद!

मास्तरांच्या चरणी माझा अंतःकरणपूर्वक नमस्कार!!! 🙏 🙏 🙏

- अतुल खांडेकर

माझ्या दैवताचा उमेदीतला आवाज ऐकला. खरंचच सांगतो डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. आभार कसे मानू?

- श्रीराम सुखठणकर

मास्तरांची ही सकाळची बैठक अत्यंत शांतपणे व मनापासून ऐकली. खूप आनंद झाला. मन भरुन आले. हे गाणे सतत कानात गुंजन करीत आहे.

अनेक धन्यवाद!

- संजय संत

मास्तरांचे गाणे मी आजन्म ऐकत आलो... मागल्या जन्मी आणि या जन्मीसुद्धा ऐकतो आहे.🙏

मास्तरांचे गाणे म्हणजे जणू काही सुरांची कारंजी !

गुरुवर्य भास्करबुवांचे गाणे हे भास्करबुवांच्या निधनानंतर खरे तर मास्तरांनीच सर्व दिशांना पसरविले.🙏

- विक्रांत आजगावकर

सुंदर मैफल !

मास्तरांचा हा शिवमत भैरव तर केवळ अप्रतिम !!

- शैला दातार

संवाद व संपर्क

अनुसरण करा