इतर साहित्य

Back to List

'ये हो रंग भर दे' – श्री. कृ. द. दीक्षित

मास्तरांचे पहिले गाणे मी केव्हा ऐकले हे आज नक्की आठवत नाही. उष्टावण केल्यानंतर मधुर आंब्याची पहिली फोड केव्हा चाखली हे कसे सांगता येईल? आणि हा विस्मरणाचा किंवा वयातीत होण्याचा परिणाम नव्हे. कारण जसजसा मी अनेक मधुर स्मृतींचा मागोवा घेऊ लागतो तसतशी एकामागून एक अस्पष्ट पण आकलनीय अशी, मास्तरांच्या मधुमधुर गाण्यांच्या स्वरांची वलये निघू लागतात आणि त्या गोड आठवणींचा कालानुक्रम लावणे कठीणच होऊन बसते. पण लहानपणापासूनच मास्तरांच्या गाण्याची मोहिनी माझ्यावर पडली होती हे खास. गंधर्व नाटक मंडळीचे लांबट असे बोर्ड किर्लोस्कर थिएटरच्या बाहेरच्या बाजूस लटकू लागले की, संगीताच्या अजब गोडव्याचा सुगंध पुण्यावर पसरू लागला आहे असे स्पष्टपणे वाटू लागे. पावसाळा संपता संपता, अश्विनाच्या सुरुवातीला पहाटे उठून बाहेर पाहावे आणि आकाशातून कृष्णवर्ण मेघांची पुसट छायाही न दिसता पांढऱ्यापांढऱ्या मेघांचे पुंज दिसू लागावेत आणि एकदम प्रसन्नता यावी, तसे गंधर्व नाटक मंडळीच्या आगमनाने वाटू लागे. अशाच केव्हातरी आलेल्या पर्वकालात मी मास्तरांचे पहिले गाणे ऐकले असे वाटते. ते दिवस म्हणजे मराठी नाट्यसृष्टीच्या प्रौढावस्थेचे होते. गडकरी - खाडिलकरांच्या नाटकांनंतर त्यांची परंपरा निर्माण होण्याइतपत कालमर्यादा लोटली होती आणि त्यांच्या नाटकांतून अवतीर्ण होणाऱ्या संगीतगंगेने प्रचार न करता महाराष्ट्राला पावन केले होते. गायनकलेचा प्रसार आणि प्रचार या दोन गोष्टी अगदीच भिन्न आहेत. कलेचा प्रचार हा म्हणजे खरोखरीचाच विरोधाभास आहे. प्रचाराने जी साधते ती कलाच नव्हे. मग ती संगीतकला असो वा चित्रकला वा शिल्पकला असो. अभिजात संगीताच्या चाहत्यांना अभिजात संगीताचा प्रचार झाला पाहिजे असे वाटते, परंतु ही कल्पनाच खोटी आहे. महान संगीताचार्यांनी परंपरा उत्पन्न करून रसिकांना आणि श्रोत्यांना आपणांकडे आकर्षित करावे आणि श्रोत्यांनी त्या कलेची जोपासना करावी हे ठीक परंतु आसेतुहिमाचल हिंडून संगीताचा प्रचार केला या सांगण्यात फारसा तथ्यांश नाही. अशा या संगीताच्या आणि नाट्यकलेच्या संक्रमणकालात मी चांगल्या चांगल्या गवयांची गाणी ऐकली आणि मास्तरांच्या गाण्याची महती मला त्यामुळेच वाटू लागली. नाट्यसृष्टीत वावरणाऱ्या संगीत कलोपासकाची संगीताची साधना आणि आजन्म गायनाची तपस्या करणाऱ्या संगीतज्ञाची साधना यांत फरक आहेच. प्रेक्षकांच्या अभिरुचीला पटेल अशी नेपथ्यरचना करून अभिनयाचा झोक तसाच ठेवणे हे जसे यशस्वी नाट्याविष्काराचे लक्षण होते तसेच त्याबरोबर येत असलेल्या गायनालाही नीटनेटकेपणा आणून देणे हेही होते आणि म्हणून काही पढीक गवयांच्या बैठकी ऐकल्यानंतर जेव्हा मास्तरांच्या गाण्याची बैठक ऐकली तेव्हा गाण्यात रस म्हणून काहीतरी गोष्ट आहे याची कल्पना आली.

गणपती-उत्सवाचे दिवस होते आणि सालाबादप्रमाणे सरदार मुजुमदारांच्याकडे मास्तरांचे गाणे होणार म्हणून ऐकत होतो. परंतु चतुर्थीच्या आदल्याच दिवशी गाणे होईल याची काही कल्पना नव्हती. त्यामुळे हरितालिकेच्या घरातल्या जागरणाच्या घोळक्यात बसलो असतानाच जेव्हा मित्र सांगायला आला की, मास्तरांचे गाणे सुरू झाले आहे तेव्हा मी साशंकच होतो. मुजुमदारांच्या वाड्याच्या बाहेरच्या ओट्यावर लोकांची बरीच गर्दी होती आणि वरच्या दिवाणखान्यातून मास्तरांच्या गाण्याचा झोत खाली ऐकू येत होता. फुकट्या आणि निमंत्रित लोकांची झुंबड उडाल्यामुळे खाली ओट्यावर बसूनच ऐकणे प्राप्त होते. हल्लीच्या मास्तरांच्या आवाजाशी त्या वेळच्या स्वराची मनोमन तुलना केली, तर त्या बैठकीतला आवाज जास्त सुरेल, जास्त गोड आणि दमदार होता असे म्हणावेसे वाटते. आम्ही गेलो त्या वेळी भूपातलीच चीज चालू होती. 'फुलवन सेज' ही साधीसुधी वाटणारी चीज आणि भूपासारखा सीधासाधा पहिल्या इयत्तेतला राग मास्तर आळवीत होते. अवांतर चर्चेवरून शंकरभय्याच साथीला होते, पण ऑर्गनवर कोण होता त्याचा पत्ता लागत नाही, असे कळले. गाण्याच्या नादातच असल्यामुळे काही दिवसांपूर्वी एका गवयाचा भूप राग ऐकला होता तो कुणीकडे आणि आजचे हे गाणे कुणीकडे असे ऐकता ऐकता वाटू लागले. भूप राग ऐकता ऐकता गर्दीतून होणारा मंद कोलाहल माझ्या कानांपासून दूरदूर होत गेला; ओट्यावर बसल्या बसल्या हातापायाला आलेल्या मुंग्यांमुळे अवघडपणा किंवा अडचण ही भासेनाशी झाली; आणि केवळ गाण्याच्या एका झंकारापलिकडे मला संवेदनाच उरली नाही. भूप ऐकताना नेहमीच एक त-हेचा शांतपणा वाटत असतो. आकाशात पौर्णिमेचा चंद्र उगवला असावा, शीतल वारा वाहात असावा आणि जगातल्या सुखदुःखांच्या पलिकडे गेलेल्या महात्म्याप्रमाणे सर्वत्र निरुपाधिक आहे असे वाटावे असे काहीसे वातावरण भूप राग ऐकत असताना वाटत असते. मास्तरांचा किंचितसा व्याकूळ परंतु मधुर असा आवाज आणि भय्याचा शांत ठेका अशा साधनद्वयीत भूप रागाची खुलावट अतिमनोहर वाटू लागली. मास्तरांच्या गाण्यातले कल्पनाचातुर्य त्या वेळी मला फारसे उमगले नव्हते, परंतु ते गायन रंगदार आहे एवढे समजत होते. द्रुत चीज संपवून मास्तरांनी टाळ्यांच्या गजरातच चटदिशी दुसरी चीज सुरू केली. एकामागून एक मास्तरांनी चिजा म्हटल्या आणि चित्रपटात पौराणिक दृश्यात जसे देवगंधर्व आकाशात ढगावरून चालत असतात तसा मी त्या स्वरांच्या गोडव्यावरून चालत होतो. त्या दिवशीच्या जलशातली एक चीज मला अजूनही चांगली आठवते. 'आज रहो मोरे प्यारे रघुबीर' या चिजेवर तर श्रोत्यांनी नुसती वाहवाची खैरात केली. गाणे संपले तेव्हा पहाट झाली होती.

त्या गाण्यानंतर मला बऱ्याचशा मुरब्बी लोकांची जी नेहमी 'ढंगदार' गाण्याची चर्चा चाले तिचा थोडासा अर्थ कळू लागला. मास्तरांच्या नाट्यगायनाशिवाय इतर बऱ्याच रागदारीच्या रेकॉर्ड्स त्यावेळी ऐकायला मिळत असत. अभिजात संगीताची आवड पूर्वीपेक्षा हल्ली जास्त आहे असे सांगणाऱ्यांना पूर्वीच्या उत्तमोत्तम गवयांच्या उत्तमोत्तम रागदारीच्या रेकॉर्ड्स हल्ली ग्राहकाभावी मिळत नाहीत ही गोष्ट मुद्दाम सांगायला पाहिजे.

मास्तरांच्या पुऱ्या कलाविलासाची मला अजून ओळख व्हायचीच होती; कारण जेव्हा जेव्हा मी त्यांच्या जलशाला जाई तेव्हा तेव्हा लांबून तपश्चर्या करूनच गाणे ऐकावे लागे आणि सौंदर्यवतीच्या रूपाची बुरख्यातून जशी पुरेशी कल्पना येत नाही त्याप्रमाणेच गाणाऱ्यांच्या समोर बसून त्यांच्या हातवाऱ्यासह होणाऱ्या गाण्याची मजा चाखल्याशिवाय त्यांच्या कलेचा ठसा मनावर पुरेपूर उमटत नाही.

थंडीचे दिवस होते. प्रहराप्रहराला थंडीने रात्रीला अधिकाधिक घट्ट विळखा घालायला सुरुवात केली होती आणि सायकलवर बसून एकमेकांच्या आधाराने आम्ही फर्ग्युसन कॉलेजात मास्तरांचे गाणे ऐकत होतो. शारीरिक कष्टांची ठराविक मर्यादा ओलांडूनही गाणे सोडण्याचा निश्चय आमच्याने होईना, इतके आम्ही गुंगत चाललो होतो आणि या लांबूनलांबून गाणे ऐकण्याच्या तपश्चर्येला कधी सफलता येते इकडे माझे लक्ष लागत चालले होते. आणि काही दिवसांनी फर्ग्युसन कॉलेजातच तसा गाणे ऐकण्याचा योग आला. कॉलेजातल्या मुलांचे कौतुक मास्तरांनी आणि मास्तरांचे कौतुक मुलांनी करावे असा तो काळ होता. मास्तरांनी मुलांची गर्दी आणि उत्कंठा जाणून बागेश्रीतल्या सुप्रसिद्ध 'कोन गत भई' या चिजेने सुरुवात केली. गंधर्वांच्या 'प्रेम नच जाई' या पदाने ती चीज अजरामर झाली आहे असे मला वाटते. चिजेची बंदिश इतकी उत्कृष्ट आहे की जणू रेखीव शिल्पकलेची प्रतिमाच. मास्तरांच्या अनेक बैठकीतून अनेक राग मी ऐकले आहेत आणि त्यात त्यांचे काही राग विशेष लाडके आहेत असे वाटते. त्यापैकी बागेश्री हा एक आहे. जलद चीज 'बन बन आये' ही त्यांनी म्हटली. 'बन बन आये' ही ओळ मास्तर इतक्या ढंगदारपणे म्हणत की, मन मोहरून जाई. 'पियारे सखी' म्हणून आलापीच्या आवर्तनातच मास्तर 'बन बन' या शब्दावर बारीकबारीक मुरक्या घेत त्या तर विलक्षणच गोड. ही जलद चीज म्हणजे मास्तरांचा हुकमी एक्काच म्हणा ना. मैफल केव्हाही जिंकावी त्यामुळे ख्यालापेक्षा मास्तरांची प्रतिभा जलद चिजेतच जास्त स्फुरते.

गायकांच्याही प्रकृतीप्रमाणेच गायन फुलत राहणार. क्रिकेट खेळणारे कितीतरी पटाईत खेळाडू आपण पाहातो. खेळाचे नियम सारखे, हत्यारे सारखी, सर्व काही ठराविक आणि नियमबद्ध. पण प्रत्येकाची 'प्रकृती' ('स्टाइल') वेगळी. कुणी अती धीमा खेळाडू तर कुणी बाउंडरी चौफेर मारणारे. परंतु त्यांच्यामध्ये काही उच्चनीचत्व नाही. तसेच ख्यालगायक वरच्या दर्जाचे आणि द्रुत लयीत काम करणारे कमी दर्जाचे असे मानण्याचे काहीच कारण नाही. परंतु अजूनही अशा समीकरणावर गायकांचे तौलनिक गुणमापन करण्याचे प्रयत्न चालू असतातच. त्यांचे म्हणणे, ख्यालगायनाला तालाची, लयीची आणि स्वरांची बैठक फार जबाबदारीने सांभाळावी लागते; जणू काय लय वाढल्यानंतर गायकाला ती मर्यादा सांभाळण्याची जरुरी नाहीच. आगगाडी सावकाश चालली तर ती रुळावर असायलाच पाहिजे; आणि जोरांत निघाली तर रुळावरून घसरली तरी चालेल ? धृपदधमाराच्या गायनातून ख्याली गायनाकडे गायनकला वळल्यानंतर संगीतोपासकांनी तीच पद्धत जास्त आपुलकीने स्वीकारली आणि जी परंपरा निर्माण केली त्यामुळे ख्यालगायन जास्त वजनदार आणि कष्टसाध्य असे ठरले. ठुमरीसारखे गायनप्रकार शब्दनिविष्ट, रसीले आणि शृंगारप्रधान असल्यामुळे आणि कलावंतिणीच्या मनोरंजनाच्या साधनात त्यांची गणना झाल्यामुळे प्रदीक आणि पंडित गायकांनी आणि त्यांच्या शिष्यांनी केवळ ख्यालगायनालाच महत्त्व देऊन टाकले. त्यातही विलंबित लयीत ख्याल म्हणणे जास्त अंगीकारले; कारण त्यामुळे धृपदधमाराच्या गायनप्रकाराशी जरा जवळचे वाटावे. अशा परंपरागत कल्पनांतच ख्याल विरुद्ध इतर गायनप्रकार असा सामना सुरू झाला आहे आणि द्रुत अगर ठुमरी, गझल, कवाली या सर्व प्रकारांना दुय्यमपणा देण्यात आला आहे. संगीतानंदाची मीमांसा करताना संगीतजन्य आनंद हा बुद्धिजन्य आहे, भावनाजन्य नाही, नसावा, अशा भूमिकेवरूनही द्रुतलयीतील चिजेची लयीशी खेळकरपणाची धावाधाव ख्यालगायनाच्या धीमेपणापेक्षा कमी ठरू नये. परंतु संगीताच्या चाहत्यांची अशी एक खूणगाठ असते खरी आणि म्हणून मास्तरांचे गाणे 'उडते' असा एक जाताजाता शेरा मारून त्यांच्या किंवा तसल्याच गायनाला कमीपणा देणारे पुष्कळ असतात, आणि आहेतही.

मास्तरांनी नंतर त्यांची नेहमीची खमाजातील ठुमरी 'ना मारो पिचकारी' म्हटली. मला तरी त्या ठुमरीची विशेष गोडी वाटली नाही. परंतु नंतर 'चल चालो गोकुल में' हे भजन मास्तरांनी इतके अप्रतिम म्हटले की, अजूनही माझ्या मनावरचा तो आनंदोद्रेक मला आठवतो. 'बाट दाट सम उलट पलट रे' या ओळी म्हणताना मास्तरांनी वनातल्या वाकड्यातिकड्या पाऊलवाटा आणि दाट जंगलाची आठवण स्वरांच्या नाना हेलकाव्यांनी करून दिली. पहाडी-मांडसारख्या रागांची बांधणी आणि व्यर्जाव्यर्ज स्वरांचे थोडेसेच बंधन या सवलतीमुळे मास्तरांच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव होता. एका स्वरपंक्तीला दुसरीचे साम्य नाही, एका तानेतले वैचित्र्य दुसरीत दुपटीने, अशा अनंत प्रकारांनी ते भजन मास्तरांनी जवळजवळ पाऊण तास तरी म्हटले आणि एरवी उच्छृंखल वाटणारा तरुण विद्यार्थीवर्ग ते गायन अगदी निःस्तब्ध असे ऐकत होता. मास्तरांच्या अप्रतिम गायनाची अगदी जवळून ऐकलेली ही बैठक अपूर्वच होती.

मास्तरांची नंतर आम्ही ओळख करून घेतली. रंगभूमीतून त्यांचे पाऊल बाहेर पडले आणि मास्तरांची पुण्यात नेहमी भेट होऊ लागली. मास्तरांच्या घरी कधीकाळी संध्याकाळी गेले म्हणजे त्यांचे शिष्य अवतीभवती असायचे, आमचे सहकारी मधुसूदन कानेटकरही त्यांच्याकडे शिकत होते. त्यांच्या बंगल्यातल्या वरच्या सुशोभित दिवाणखान्यात दोनतीन तरी शिष्य भिंतीला टेकून एक पाय आधाराला मितीला लावून गरुडासन करून उभे असत. संगीत शिकण्याची एका पायावर तयारी असली तरी मास्तरांची प्रतिभा घेऊन शिकणारे फार थोडे. मास्तर जेव्हा शिकवीत तेव्हा फार खुबीने आणि त्यांच्याच नेहमीच्या रंगतदार शैलीने शिकवीत. सकाळच्या एकदोन तालमींना मी मुद्दाम जाऊन बसलो होतो. मास्तर राग असा खुबीने उलगडून दाखवीत आणि शिकवता शिकवता असे कलापूर्ण गात की ऐकतच राहावे.

आमच्या एका मित्राच्या लग्नात मास्तरांचे गाणे करायचे म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. दुसरीकडे मोठ्या बिदागीच्या आमंत्रणालाही नकार देऊन त्यांनी आमची विनंती स्वीकारली. पुण्याच्या लक्ष्मणभुवन मंगल कार्यालयातले ते छत्तीस सालातले गाणे अजूनही लक्षात आहे. ऑर्गनच्या साथीला मुद्दाम हरी देशपांडेला बोलावून घेतले होते. आणि रात्री विवाहसमारंभातले लक्ष्मीपूजन लवकर उरकून गाण्याची बैठक मांडली. मास्तरांनी दहा वाजता गाण्याला सुरुवात केली आणि पहाटेचे साडेतीन वाजेपर्यंत मनमुराद गाणे ऐकवले. त्यावेळी मास्तरांची प्रकृती उत्तम होती. चित्रपटांचा सहवास घडलेला नव्हता आणि जलसे हाच एक त्यांच्या कलाविकासाला वाव होता. त्या बैठकीत मास्तरांनी प्रथमच 'लहरी अशा सुखाच्या' हे जयजयवंतीतले पद माझ्या खास विनंतीवरून आपल्या बासनातून बाहेर काढले. मला ते पद पाठ होते आणि विसरायला आलेल्या पद्यपंक्ती सांगायचीही संधी मिळाली. जयजयवंतीची घडी मास्तर फार हळुवारपणाने श्रोत्यांपुढे उलगडतात. बकुलमालेप्रमाणे त्या पदाला बागेश्रीचा सुगंध देतात. जयजयवंती ही फार नाजूक, फुलराणीसारखी रागिणी आहे. बिलावल थाटाने सजवा व बागेश्री थाटाने फुलवात्या रागिणीचा मंदमधुर गोडवा सुखदायकच. ते पद ऐकता ऐकता, पदातल्या ओळीप्रमाणे 'करिती तनू रोमांचिता' असे सर्वांना झाले. त्याच रात्री मास्तरांनी विवाहसमयानुकूल असे एक पद म्हटले--'शुभसावधान समयाला। कुणि चिडविलें खुडुनि मज गाला ॥' त्यानंतर हे पद मला पुन्हा ऐकायला मिळाले नाही. पण मिश्रपिलूत हे पद गाऊन त्यांनी बहार केली खरी. नाट्यसंगीताच्या अगदी बाल्यावस्थेपासून संगीतातली सजावट कशी कशी होत गेली याची मास्तरांना जी कल्पना आहे ती इतर फारच थोड्या गवई नटमंडळींना असेल. ती एकेकाची आवड असते; अभ्यास असतो. मास्तरांचा तसा अभ्यास होता आणि म्हणूनच कै. भास्करबुवांच्या गंधर्व नाटक मंडळीने सादर केलेल्या संगीत नाटकांना मास्तरांनी अगदी यथोचित अशा चाली दिल्या.

मास्तरांचा असाच एक जलसा आमच्याही घरी झाला, माझ्या भावाच्या लग्नात. आम्हांला फार धन्यता वाटली. सर्वजण मिळून श्रोते होते पाऊणशे. पण बहुतेक गाण्याचे नादी-गाण्याचे दर्दी. घरीच बैठक असल्यामुळे अगदी जवळ बसून ऐकण्याची सुवर्णसंधी फार दिवसांनी आलेली.

मास्तरांनी सुरुवात केली यमनातल्या पदाने 'हरवा मोरा' या ख्यालाने. श्री. बालगंधर्वांचे 'नाथ हा माझा' आमच्या परिचयाचे होतेच. कुठलाही राग असो-मास्तरांनी गाताना तो रंगला नाही असे होतच नाही. पुष्कळ वेळा पूरिया, मारवा हे राग रंग भरायला कठीण वाटतात. पण मास्तरांच्या पुढे ही मंडळी रागरंग ओळखून हात जोडून उभी असतात जणू काय. त्या दिवशी मास्तरांना मुद्दाम फर्माईश केली आमच्या गानलुब्ध मित्राने-श्री० तळाशीकरने-भंखार रागाची. 'अमृतसिद्धी' नाटकात या रागाची योजना केली आहे. त्या रागातले पद म्हणत असत श्री० हरी देशपांडे. मास्तरांनी त्या पदाची मूळची चीज 'गुलाब मोतीयन' ही इतकी रंगून, तन्मय होऊन म्हटली की अनोखा अवघड राग असूनही सारे श्रोते तल्लीन होऊन गेले. अनवट राग आणि चिजा ऐकायची सवय आणि सोय त्यानंतर ऐकलेल्या पुष्कळशा जलश्यांत झाली. पण पूर्वी साधेसिधे राग आणि प्रचलित नाटकातली पदे अशीच ऐकायला मिळत बैठकीत. पहाटेपर्यंत बैठक अशी क्रमाक्रमाने रंगत आली. बिदागी किती दिली मला माहिती आहे. खऱ्याखुऱ्या कलावंताला रसिक श्रोत्यांसमोर गाताना जो हुरूप असतो तो काही वेगळाच. तिथे बिदागीचे आमिष नसते. मास्तरांचे कॉलेजविद्यार्थ्यांच्या समोर झालेले कार्यक्रम तर नेहमीच रंगत. स०प० कॉलेजात त्यांचा एक कार्यक्रम झाला. त्यात त्यांनी त्यांची चढलेली चीज 'जोगी नहीं' ही म्हटली-बसंतबहार रागातली. ती ऐकताना, मास्तरांचे कसब अगदी अपूर्व असे दिसले. वसंतबहार, हिंडोलबहार, भैरवबहार, असे कितीतरी जोड राग आपण ऐकतो. पुष्कळ गवई ते राग जोडराग आहेत याची विचारपूर्वक जाणीव करून देतात-गंगाजमनी मांड्यासारखे. पण मास्तर मात्र अत्यंत चतुराईने जोड राग श्रोत्यापुढे मांडतात. एका रागाचे दुसऱ्या रागावर कलम बांधले आहे असे वाटू देत नाहीत. उपमाअलंकाराने हे सांगणे साधणार नाही, पण जांभळाच्या फुलावर गुंजारव करीत असलेल्या मधमाशांनी संचय केलेला मध, गुलाबाच्या पाकळ्यांवर स्वैर विहार करून जमविलेला मध, अशा मध मधुर जाती आपण पाहातो. त्या मधात गोडवा सारखाच. पण स्वाद कसा असतो? असे सांगता येत नाही की चवीला वा वासाला वेगळेपणा आहे आणि तरीही तो कळतो. हे जसे अनुभवाला येते तसेच मास्तरांनी रंगविलेल्या वसंतबहारात वसंताची नवपालवी आणि बहाराची उत्फुल्लता ही दोन्हीही आलापांत, तानेत, बोलतानेत बहारीने गुंफलेली. विशेषतः तानेतील मास्तरांची कल्पकता विलक्षण. अशा करामतीमुळेच महाराष्ट्रातले मोठमोठे विद्वान गवईसुद्धा मास्तरांच्या कल्पकतेला धन्यवाद देतात.

मास्तरांनी भैरवीसुद्धा किती वेगवेळ्या चिजांतून नटविलेली ऐकलेली आहे. त्यांच्याजवळ भैरवीतल्या बहुरंगी, अनेकविध पैलू असलेल्या चिजा आहेत. 'कनक नहि माने कन्हैया', 'भाई वे तोरी', 'मानिवेले वसंत', हा टप्पा, 'अनाथनके नाथ', 'राजा मानिबे', 'अगा वैकुंठीच्या राया', आणि शब्दांची सुंदर पखरण असलेली, नृत्यानुकूल नटवी चीज 'देखो मोरी चुरिया करके गैय्या' कितीतरी भैरवीतल्या चिजा आम्ही पोटभरून ऐकल्या आहेत. बागेश्री, भीमपलास, काफी यांसारखे नितांत मधुर राग त्यांचे विशेष आवडीचे. अडाणा हा तर त्यांचा चढलेला राग, तडफेने गायचा. तिलंग, मारवा, सोहनी, जयतकल्याण, यमन, जयजयवंती, पूरिया, शामकल्याण, हिंडोलबहार, प्रभाती, सूरमल्हार हेही अगदी हमखास रंगणारे. तसाच दुर्गा. दुर्गा रागातली त्यांची प्रसिद्ध चीज 'ये हो रंग भर दे' ही बैठक हां हां म्हणता रंगविणारी. बालगंधर्व, गोविंदराव टेंबे आणि मास्तर कृष्णराव यांचा एक जलसा किर्लोस्कर थिएटरात झाला. बालगंधर्वांनी त्यांचे बहारीचे पद 'कृष्णमुरारी' म्हटले तर मास्तरांनी 'ये हो रंग भर दे' म्हणून भला रंग भरला. चंपक, कुसुम इत्यादी फुलांनी चिजेत जो सुवास आणला तो सारा मास्तरांनी रंगमंचावरून रसिकांना-श्रोत्यांना दिला.

मास्तरांचा भूप, शुद्धकल्याण इत्यादी रागांवरचा लोभ तर सर्वांना माहिती आहेच. श्री० बालगंधर्वांच्या बहुतेक सर्व नाटकांतून भूप रागातल्या शांतस्वरूपी चिजांवर आधारलेली पदे आहेत आणि रसिकांना सुखविणारी देसकारातली पदेही बहुतेक सगळ्या नाटकांत आहेत. आणि ती म्हणतातही मास्तरच. 'द्रौपदी'तली 'पुरुषास स्त्री ज्ञानमाला' ही तर सुप्रसिद्ध आहेच. पण 'नंदकुमार'मधली 'अवधि न भाग्यबलाते' ही ध्वनिमुद्रिका ज्यांनी ऐकली असेल त्यांना माझे म्हणणे अगदी पूर्णतया पटेल. ते पद म्हणताना 'भाग्यबलाते' हे शब्द मास्तर अशा विविध रंगाने, रूपाने नटवितात—काय सांगावे. तसेच एक पद आहे, 'सुखी विलोका येथ नरांना । नेत नाशा विचारांना' संगीत 'मेनका' नाटकात. त्यात 'विलोका' या शब्दावर एक सर्रकन तान घेतात मास्तर. हे पद तिसऱ्या अंकातल्या पहिल्या प्रवेशाच्या शेवटी आहे. आणि मास्तरांना पद रंगवायलाही वेळ मिळतो. शिवाय मला वाटते, विश्वामित्राच्या गुहेचा देखावा उभारायला थोडासा वेळही हवा असतो. मास्तर या पदाला हमखास टाळी घेत असत. 'कान्होपात्रे'त आणखी एक देसकार आहे-'विचारा न पळ आता'-आणि मास्तरच ते पद म्हणत असत, प्रवेशाच्या शेवटी आणि अगदी शांत, धिम्या, आणि संकटग्रस्त अशा स्वरालापात तो प्रवेश संपे. कै० गोविंदराव टेंबे यांनी लिहिले आहे की, संगीतसम्राट अल्लादियाखांनी प्रथम जेव्हा देसकार जलशात गायिला तेव्हा श्रोते-जाणते आणि अजाणते-बुचकळ्यात पडले होते. नंतर नंतर, नाटकामुळेच म्हणा हवे तर, देसकार जलशात सकाळचा म्हणून पुष्कळ गवई गाऊ लागले. मास्तरांचा 'देसकार' खूप वेळा ऐकला आहे अगदी तयारीने. आणखी एक मास्तरांची हमखास रंगणारी चीज म्हणजे 'पिया कर धर देखो' ही 'मधुकर वनवन' या पदाइतकीच सर्वमान्य झालेली. मास्तरांच्या गायनकलेतल्या सर्व प्रकारच्या अलंकारांनी ही चीज नटते. तान, बोलतान, गमक, आलाप, आलापचारी ताना, आणि एकतालाची जलद लयीची लडिवाळ दुडदूड-सारी संगीतसभा 'कैसोऽऽही रतिया' या शब्दावर तरंगत असे. मधूनमधून ऑर्गनवर सहीसही साथ करणाऱ्या हरिभाऊ देशपांडेची कल्पकता मास्तरांना गुदगुल्या करीत असे. आणि मग मास्तर, हरिभाऊ आणि श्रोते यांची अन्योन्यभक्ती शिगेला पोहोचत असे.

मास्तरांचे गाण म्हणजे हल्लीच्या भाषेत बॉक्स-ऑफिसचा कार्यक्रम! दर वर्षी गणपति-उत्सवात मास्तरांचे मुंबईला ब्राह्मणसभेत गाणे असे आणि तात्पुरते सभासद इतके जमत की कित्येक वर्षे त्यांची दोन-दोन गाणी करावी लागत. माझ्या मुंबईच्या मुक्कामात मी दोनही गाणी ऐकायची चुकवीत नसे. रस्त्यावरती इतकी गर्दी होई की ट्रामची वाहतूकसुद्धा बंद पडते का काय असे व्हावे. श्री० पु० ल. देशपांडे यांनी एकदा व्याख्यानात सांगितले की आपण तंबोरा हातात धरून तंबोरेवाला म्हणून सभागृहात प्रवेश मिळविला. एका वर्षी आम्हांलाही तसाच आणि जरासा अवघडच प्रयोग करावा लागला. उशिरा जागे झाल्यामुळे सभासदपत्रिका मिळाल्या नाहीत. मास्तरांच्याकडे वशिला लावायला गेलो तर एंप्लॉयमेंट एक्स्चेंजमधल्या कचेरीप्रमाणे आमच्यासारखेच शेपन्नास जण तिथे मास्तरांच्या खनपटीला बसलेले. आता त्यांनी तरी काय करावे ! असे प्रसंग आणतो आपणच आणि पुन्हा नावही ठेवतो आम्हीच.

आमच्या मित्राने शेवटी एक डाव रचला. मास्तरांना पुढल्या दरवाजाने नेणे म्हणजे व्यवस्थापकांना संकटच हे त्याला माहिती होते. त्यालाही हेरगिरी साधावी लागते ! मास्तरांना ब्राह्मणसभेच्या मागच्या बोळातून वर जाण्यासाठी व्यवस्था ठेवली होती. तिथेही शेपन्नास लोक मास्तरांची वाट पाहात होतेच त्यांच्याबरोबर वर जायला मिळावे म्हणून ! मास्तर आले नि स्वयंसेवकांच्या साखळीतून तीरासारखे वर निघून गेले. कुणाला होय-नाही म्हणायची सोयच नव्हती. गांधिलमाशांसारखी मंडळी तुटून पडली असती. आमचा मित्र या पहिल्या सलामीने मुळीच गांगरला नाही. मास्तर वर जातात तोच दुसरी मोटार आली त्यांची वाद्ये घेऊन. आमच्या मित्राने झट्दिशी मुसंडी मारून मोटारीतून ऑर्गन उतरवून घेतला स्वयंसेवकांनासुद्धा अंगमेहनत करणारा हमाल मिळाला तर नको थोडाच होता. त्यातून ब्राह्मणसभेतला कार्यक्रम तो! माझ्या दंडाला धरून आमच्या दोस्ताने मला पुढे ढकलले आणि तो हमाल आणि मी पेटीवाले असे मानाचे मुजरे घेत आम्ही वर जाऊन पोहोचलो. रंगमंचावर जाऊन ऑर्गन पेटीतून काढला आणि सराईतपणाने उघडून, खुर्ची वगैरे मांडून ठेवून दोघांनीही उड्या मारल्या आणि खालच्या प्रेक्षकांच्या समुद्रातले दोन थेंब बनलो.

इकडे खाली हरिभाऊंना स्वयंसेवकांनी अडवून ठेवले होते आणि “साथीवाले केव्हाच वर गेले. काय सांगून आम्हास बनविता हो ?” असे म्हणून दटावीत होते. मास्तर बैठकीवर येऊन बसले, पण हरीचा पत्ता नाही. फारच शब्दाशब्दी झाल्यामुळे शेवटी एका स्वयंसेवकाने कुणालातरी बोलावून ओळख पटवून घेतली आणि हरिभाऊंना वर सोडले. वर आल्यावर आम्ही दोघांनीही साळसूदपणाने हरिभाऊंना आणि मास्तरांना विनम्रपणाने नमस्कार केला. तंबोरे जुळले, तबला लागला आणि ऑर्गनच्या साथीसह मास्तरांनी शामकल्याण सुरू केला. आम्हांला काय हवे होते ? गाणे ऐकण्याचे भाग्य; दुसरे काही नाही.

मास्तरांच्या गाण्याबरोबरच मी इतर गवयांचीही गाणी ऐकत होतोच आणि हलकेहलके बहुतेक साऱ्याच गवयांच्या गायनकलेत हळूहळू बदल होत चाललेला लक्षात येत होता. बहुजनसमाजाला आवडणारे गाणे म्हणता म्हणता बहुजनसमाजाच्या मर्यादाही अनंत आणि अपार अशा संगीतकलेला चारी बाजूने आवळू लागलेल्या होत्या. भूशास्त्रज्ञ सांगतात की एके काळची विशाल सरोवरे वाळवंटाच्या सूक्ष्म पण सतत होणाऱ्या आक्रमणांनी ओसाड, उजाड करून टाकली. तसेच अभिजात संगीताच्या गायकांच्या कलात्मतेवर हलकेहलके नाट्यसंगीताची लोकप्रियता आक्रमण करू लागली आणि भावगीतांच्या शाब्दिक लाडिकपणामुळे संगीताची मूळची स्वरप्रधान कणखर प्रकृती लेचीपेची बनू लागली. कोणाही खासाहेबांची बैठक वगळली तर त्या वेळच्या बैठकीत सुरुवातीचे रागदारीचे गाणे हे गळा तापविण्याकरिता आणि वेळ मारून नेण्याकरिता, असाही रसिकांचा समज होऊ लागला. नवनवीन नाटकांची आयात थांबली आणि जुन्याच नाटकांना आणि जुन्याच नटांना प्रेक्षकांना गुंग करून टाकण्यासाठी वारेमाप गाण्याच्या तंत्राचाच जास्त उपयोग करून घ्यावा लागला. 'सोन्याचा कळस' यासारख्या उत्कृष्ट नाट्यगुणांनी भरलेल्या नाटकामध्येही मामांनी संगीतात आमूलाग्र बदल केला असे सांगून बदल केला फक्त रागवैचित्र्याचा. वेगळे आणि अनवट राग नाट्यात आणणे यासारख्या युक्त्या जास्तजास्त प्रमाणावर योजिल्या जाऊ लागल्या आणि या साऱ्या गोष्टींचा अटळ परिणाम म्हणजे रामभाऊ कुंदगोळकर घ्या, हिराबाई म्हणा, मास्तर म्हणा किंवा खांसाहेब अब्दुल करीमखां घ्या संगीताच्या जलाशात पदांची किंवा भावगीतांची ये-जा सुरू झाली आणि केवळ त्याच सवयीच्या आहारी गेलेल्या गवयांना अभिजात संगीताची प्रकृती सांभाळणे कठीण होऊन गेले.

मास्तरांच्या गाण्यातही हा बदल झालाच. मास्तरांची अतितरल कल्पकता या असल्या गाण्याला पोषकच झाली; पण त्यांच्या अंगी असलेल्या खानदानी संगीताच्या पेहेरावाला ती मारक ठरू लागली. मास्तरांची एक बैठक मी अशी ऐकली की, त्यात पहिल्या शुद्धकल्याणाच्या ख्यालानंतर एकापाठोपाठ एक पदांच्या आळवणीने शेवटच्या भैरवीपर्यंत पुन्हा काहीही ऐकायला मिळाले नाही. अर्थात श्रोतृसमुदायही तसाच आणि त्याच गाण्याला आसुसलेला होता. अभिजात संगीताचे त्यांना जरी फारसे वावडे नव्हते तरी ते फारसे पचेनासेही झाले होते. आणि श्रोत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन मैफल रंगविण्यात मास्तरांची हातोटी आणि समयज्ञता इतर गवयांच्यापेक्षा जास्तच. त्यामुळे मास्तरांच्या तोंडून नवीन राग, नवीन चीज ऐकणे दुर्मिळ होऊ लागले. अर्थात या समयज्ञतेचा काही काही वेळा अतिशय इष्ट असाच परिणाम होई.

बेलापूरच्या जवळच्या महाराष्ट्र शुगर फॅक्टरीत मास्तरांचे गाणे गणपतिउत्सवात ठरले. मास्तरांच्याच मोटारीतून आम्ही पुण्याहून बेलापूरला गेलो आणि मास्तर आगगाडीने पुढे गेले. गणपति-उत्सवाचे आणि पुण्याच्या मास्तरांचे गाणे म्हणून 'पाव्हणे' लोकांची ही गर्दी जमली होती. एका भल्यामोठ्या गोडाउनमधील साखरेची पोती काढून तिथे माणसे भरली होती. निदान तीनचार हजारांवर मुंडासेवाले पाव्हणे गाणे ऐकायला उकिडवे बसून राहिले होते. मास्तरांनी बागेश्रीतल्या 'मोहे मना' या चिजेने सुरुवात केली. ती चीज आणि तो राग मास्तरांचा हातखंडा, पण 'पाव्हणे' मंडळीला ते मानवेना. दहापंधरा मिनिटे गेल्यावर वाफ्याचा बांध फोडून पाणी वाहू लागावे तसे पाचपन्नास पाव्हणे लोक उठून एक दरवाजा उघडून निघाले आणि त्यांच्या मागोमाग एक माणसांचा लोंढाही निघाला. त्या कोलाहलाकडे पाहून मास्तरांनी चीज लगेच संपविली, तंबोरे मध्यमात लावायला सांगितले आणि ते मोठ्याने त्या लोकांना म्हणाले, "मंडळी, जरा थांबा. इतके लांबून आल्यासारखे एक अभंग ऐकून मग जा." आणि 'पतितपावना' हा अभंग त्यांनी सुरू केला. मास्तरांच्या गाण्याची आणखी एक मौज अशी आहे की ते सुरुवातच अशी ढंगदारपणाने करतात की, ऐकतच राहावे. पाव्हणे मंडळी दारातच थबकली आणि हलके हलके हॉल पुन्हा गच्च भरला. एक अभंग झाला की, दुसरा असे मास्तरांनी मध्यंतरापर्यंत चालू ठेवले. मी विचारले, "मास्तर काही रागदारी ” त्यांनी त्यांच्या नेहमीच्या हजरजबाबी विनोदी पद्धतीने उत्तर दिले, “रागदारी! अहो, या मंडळीचा राग होईल ना!" आणि शेवटपर्यंत मध्यमाचा स्वर कायम ठेवून अभंग, पद, असे करत पहाटे चार वाजेपर्यंत साऱ्या तीनचार हजारांच्या जमावाला जागच्या जागी खिळवून ठेवले. मास्तरांची ती त्या दिवशीची करामत खरी. कारण प्रकृती बरी नव्हती आणि हॉलमध्ये विलक्षण गारठा होता. पण लोक माझे गाणे सोडून जातात कसे ? या हट्टावर त्यांनी जलसा अप्रतिम रंगविला! शेवटी त्यांनी तासभर विश्रांती घेतली; पण गळ्याला आणि छातीला इतके विलक्षण श्रम झाले होते की, त्यांना चैनच पडेना. पहाटेलाच मोटार घेऊन ते पुण्याला निघून गेले आणि पुढचा सबंध आठवडा त्यांना इतर गाणी रद्द करून पुण्याला डॉक्टरांच्या मदतीने घालवावा लागला. पण त्या साखरकारखान्यातल्या मजुरांना उसाच्या रसाइतकेच गोड गाणे ऐकवून मुग्ध करून टाकले हे काय कमी झाले !

या अशा हिरिरीशिवाय मास्तरांच्या गाण्यातली अपूर्वाई मिळेनाशी झाली होती. 'वंदे मातरम्'च्या निमित्ताने महाराष्ट्रात गवयागवयांनी तट करून विनाकारण भांडाभांडी केली आणि लेखी, तोंडी एकमेकांच्या संगीतसाधनेची कुचेष्टा आरंभली. भारतीय संगीतकला ही काय एका गवयाची, एका घराण्याची, एका पठडीची ? आणि राष्ट्रगीतासारख्या वादातीत कवनावर चालीसाठी गवयांनी एकमेकांच्या कलात्मतेची टवाळी करावी ? परंतु संगीतसाधकांची ही एक अजबच विकृती आहे. आपल्याच कलेचा अहंकार हा एका गवयाखेरीज दुसऱ्या कोठल्याही कलावंताच्या अंगी इतक्या प्रकर्षाने आदळणार नाही. आणि मौज अशी की, ज्या काही अनेक संगीतोपासकांशी मी बोललो आहे त्या प्रत्येकात हा अहंकार मला पाहायला हरकती सहज येतात. त्यातून चीजच अशी की अशा हरकतींशिवाय ती सुनीसुनीच वाटावी. बळवंतरावांनीही त्यांच्याजवळच्या ठेवणीतल्या नटव्या बोलांनी ठेका सजवायला सुरुवात केली. आणि प्रत्येक समेला श्रोते 'हा!' 'वाहवा!' करून मैफल रंगवू लागले. मास्तरांनी हा टप्या सुमारे वीसएक मिनिटेच म्हटला; पण तेवढ्यात सभागृहाच्या कोनाकोपऱ्यातला श्रोतासुद्धा त्यांनी त्या चातुरीने वश केला. चीज संपली आणि बळवंतरावांनी तबला बाजूला उचलून ठेवून मास्तरांना आनंदातिशयाने मिठी मारली. कलेची आणि कलावंताची पारख कलावंतच करू जाणे. “परमेश्वर तुम्हांला उदंड आयुष्य देवो!" असे म्हणून बळवंतरावांनी आपले ओले डोळे टिपले. मास्तरांच्या मागेच बसलेल्या रामकृष्ण पर्वतकरांनीही मास्तरांना जणू काय गोंजारलेच. मास्तरांनी मैफल जिंकली होती, पण त्यांनी अजूनही आपला संयम सोडला नव्हता. नेहमीप्रमाणे मास्तरांना चिठ्याचपाट्यांतून सूचना येऊ लागल्या. एरवी मास्तर चिठी वाचून त्यावर मिस्किलपणाने काहीतरी कोटी केल्याशिवाय राहात नसत. पण आज त्यांनी चिठ्या मांडीखाली दडपून टाकल्या. श्रोत्यांनीही त्यांचा आविर्भाव जाणला आणि पुन्हा विनंती किंवा फर्माईश झालीच नाही. आज मराठी पद किंवा गीत गाणारच नाही असा इशारा त्यांनी आम्हांला दिला. मध्यंतरानंतर त्यांनी अभोगी कानडा म्हटला, अडाणा म्हटला, आणखी कितीतरी राग गाइले. लोकांच्या मनांतले किंवा चिरपरिचयातले एकही पद त्या दिवशी त्यांनी म्हटले नाही. “पदाशिवाय मला गाता येतच नाही ना ? मग ऐका तर!" अशा आत्मविश्वासाने त्यांनी तीन-साडेतीन वाजेपर्यंत एकामागून एक रागदारीच आळविली.

मास्तरांच्या अशा बैठकी ऐकल्या की मग त्यांच्यावर त्यांचे शत्रुसुद्धा खूष होऊन जातात.

नाट्यकलेतून सेवानिवृत्त होऊन मास्तर चित्रपटाच्या मोहमयी नगरीत शिरले होते. कल्पनाप्रधान संगीतज्ञाला चित्रपटासारखे कलाविलासाला दुसरे क्षेत्रच नाही. आणि व्ही. शांतारामसारखे उत्स्फूर्त दिग्दर्शक मास्तरांना भेटल्यावर मास्तरांची कला न फुलेल तर काय ? परंतु हे सर्व खरे असले, तरी मास्तर हे आपादमस्तक गवईच. गुणी गुरुजनापासून कष्ट करून, मेहनत करून विद्या संपादन केली, गळा तयार केला, तो काय दुसऱ्याच्या तोंडून गाणी वदवून घेण्यासाठी ? कलेच्या या देवाणघेवाणीत देवाणच फार. मास्तर चित्रपटसंगीतातून काय शिकले ? त्यात ते काय विसरले हेच महत्त्वाचे! मास्तरांच्या बैठकीतून 'प्रियकर वसंत हा मनी' अशी पदे घुमू लागली. संगीताच्या बैठकी म्हणजे उच्च दर्जाच्या मेळ्यांच्या कार्यक्रमाप्रमाणे होऊ लागल्या. त्यात एकच चूक होत होती. बैठकीत अशी पदे म्हणूच नये असे नव्हे. परंतु तात्काल डोळ्यांपुढे असणाऱ्या चित्रपटांच्या गाण्याची मोहिनी प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच नसते. गाणी चांगली म्हणून ती आवडतात की ती म्हणणाऱ्या नटनटींच्या लौकिकामुळे ती लोकप्रिय होतात, हा एक संशोधनाचा प्रश्न आहे. पण प्रेक्षकांना तीच ती गाणी मास्तरांच्यासारखा अधिकारी गवई म्हणून दाखवीत असता अभिजात संगीताच्या कलाविलासाची मर्यादा कमी कमी होत होती. मास्तरांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत जरी अभिजात संगीताची बैठक पूर्णपणे होती, तरी चित्रपटसंगीत आणि अभिजात संगीत यांतील मूलतः होत असलेला फरक लक्षात घेतला म्हणजे कर्तृत्ववान गवयाच्या अंतःस्फूर्तीला तिथे आवाहन कमी होते हे सहज ध्यानात येते. चित्रपटसंगीतात विदेशीय बँडसारखे, नृत्यप्रधान संगीताचे मिश्रण होते, अशी आपण नेहमी तक्रार करतो. परंतु साध्य महत्त्वाचे की साधन यासारखा हा वाद आहे. चित्रपटातून संगीत, अभिजात संगीत, लोकप्रिय करणे आणि त्या उच्च संगीताला त्याचा खराखुरा उच्च दर्जा प्राप्त करून देणे हा चित्रपटाचा उद्देश आहे का ? असेल तर मग विदेशीय संगीताचे अनुकरण करणे अनुचित आहे. पण चित्रपट यशस्वी करणे हेच जर ध्येय आहे, तर मग अमकेच संगीतप्रकार वापरावे या म्हणण्यात काय स्वारस्य ? अभिजात संगीताचीच कास धरून चित्रपटमूल्ये जरी सांभाळता येत असली, तरीही आपापल्या कल्पनेप्रमाणे संगीताची सजावट करणे यात काय चूक आहे ? मास्तरांनी स्वतःच्या कल्पनेप्रमाणे चित्रपटसंगीतात खानदानी संगीताचा मुक्त हस्ताने वापर केला, परंतु त्याचा त्या संगीताच्या वाढीला काही फारसा उपयोग झाला नाही. जलाशांतूनही असल्या गाण्यांचा उपयोग करून भागणार नव्हते. कारण जनमतच त्या संगीताच्या रुचीला पारखे होत चालले होते. चित्रपटसंगीताच्या सान्निध्याने मास्तरांच्या गाण्यावर आणखी एक प्रतिकूल परिणाम झाला. आणि तो म्हणजे गाण्यात अनाठायी कल्पनायोजकता. येथे त्या कल्पनाचातुर्याचा अतिरेकही मारकच ठरतो कसा, असा प्रश्न पडेल. परंतु ज्यांनी ज्यांनी अशा बैठकी ऐकल्या असतील त्यांना मास्तरांच्या जलशांतून गाइल्या जाणाऱ्या भजनांवरून माझ्या विधानाची सत्यता पटेल. 'परब्रह्म निष्काम' हे भजन जेव्हा मास्तरांनी पहिल्यांदा म्हटले त्या वेळी श्रोते अक्षरशः वेडे होऊन गेले. त्यांच्या त्या भजनानंतर कशाचीही गोडी वाटेना, इतके ते गोड लागे. परंतु अनेक भजनांना तीच तीच स्वरावट मिळू लागली. पण यात मास्तरांचा दोष नाही. 'वहाँ' चित्रपटातील संगीताची योजना करीत असतानाची गोष्ट आहे. मी सहज मास्तरांच्या घरी गेलो आणि मास्तर आपल्याच तंद्रीत गुणगुणत बसलेले होते. चित्रपटसंगीताच्या अमक्यातमक्या चाली आणि खानदानी संगीत असे बोलत ते म्हणाले, आता हेच पाहा ना," आणि भोपे जवळच बसले होते त्यांना हाक मारून ऑर्गनचा स्वर धरायला सांगून मास्तर 'हर गलीमे है बगीचे' हे गीत आणि त्याची चीज म्हणून दाखवू लागले. चित्रपटाची योजना, पार्श्वदेखावा, गायिका, दिग्दर्शकांचे मत या सा-या गोष्टी जमेला धरूनच गीताची चाल शेवटी कायम होणार. तरी पण त्यांच्या मनात असलेल्या अनेक रागदारीतल्या चिजा आणि चित्रपटसंगीताची मर्यादा अशी त्यांनी गात गात स्पष्ट करून दाखविली. संध्याकाळी चार वाजल्यापासून तो रात्री साडेनऊ-दहा वाजेपर्यंत ही संगीतचर्चा चालली होती आणि शेवटी मी बेपत्ता झालो असेन या समजुतीने शोधायला आलेल्या माणसांच्या निरोपामुळेच आम्हाला तिथेच थांबावे लागले.

मास्तरांना जेव्हा आचार्य अत्रे यांचे 'वसंतसेना' चित्रपटाचे संगीतदिग्दर्शन करण्याची संधी आली तेव्हा अशीच एकदा आमची चर्चा झाली. 'मृच्छकटिक' नाटकातली पदे आणि संगीत त्यांना उत्तम परिचयाचे होते. चित्रपटातली गाणी त्या किंवा तत्सम संगीताने नटवून भागले नसते. 'नभी चंद्रमा आला' इत्यादी पदांना त्यांनी अन्वर्थक संगीत दिले आहे. वसंतसेनेच्या वसंतोत्सवातल्या नृत्याचे पार्श्वसंगीत तर अत्यंत परिणामकारक आणि सारेच्या सारे अभिजात संगीताच्या ऐश्वर्यांने भरलेले आहे. मास्तरांना या साऱ्या कसबीपणाची यथार्थ कल्पना होती. पण चित्रपट हे केवळ संगीतावर उभे राहिलेले रोपटे नव्हे. दिग्दर्शक आणि इतरही तांत्रिक सल्लागार यांच्याकडे शेवटचा किंवा अखेरचा हुकूम असतो. चित्रपटसंगीताच्या इतिहासात-विशेषतः मराठी चित्रपटसंगीताच्या इतिहासात-मास्तर कृष्णराव यांच्या कामगिरीचा आढावा अभिमानपूर्वक असाच मांडावा लागेल. मास्तरांच्या बरोबर गप्पा मारायला बसले तर वेळ कसा निघून जातो लक्षात राहात नाही. ते नकला उत्तम करतात. नाटकातले अनेक प्रसंग मोठ्या चातुर्याने सांगतात. त्यांना गाण्याबरोबरच गप्पांतही रंग भरण्याची दुर्मिळ खुबी साधलेली आहे. श्री० बालगंधर्व त्यांना रंगमूर्ती म्हणत असत. रोज संध्याकाळी वेळ सापडला की श्री० बालगंधर्व विचारीत, “रंगमूर्ती, आजची काय ताजी बातमी ?” आणि मग मास्तर कधी खट्याळपणाने, कधी तळमळीने नटवर्गाच्या अनेक हकिकती वार्ताहराप्रमाणे इत्थंभूत सांगत असत.

चिजा बांधणे, गोळा करणे, नीटनेटक्या करणे मास्तरांना याचा फार मोठा छंद आहे. त्यांनी हजारोवर चिजा बांधल्या आहेत. एकदा लोकगीतांवर गप्पा मारत असताना एक बाड दाखविले त्यांनी. त्यात कितीतरी जुन्या आणि अस्सल लावण्या एकत्रित केलेल्या होत्या. त्यांनी संगीतशिक्षणासाठी पुस्तके लिहिली आहेत; अगदी प्रशालेपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत गायनवादनाचा अभ्यास कसा असावा याचे लेखन केले आहे. त्यांची अपूर्व कल्पनाशक्ती आणि रंगदार, ढंगदार व्यक्तिमत्त्वापोटी आलेली रसिकता या दोन्हीही त्या लिखाणात आणि अभ्यासक्रमात दिसून येतात. इतर अनेक नटांप्रमाणे त्यांनी जर आत्मचरित्र लिहिले तर ते रसाळ आणि उद्बोधक नक्कीच होईल. पं० भास्करबुवांच्याकडून मिळालेल्या चिजांबरोबर त्यांच्याकडे दौलतखां या प्रसिद्ध गवय्यांच्याकडून ऐकलेल्या आणि घेतलेल्याही कितीतरी चिजा आहेत. हल्लीच्या नवीन पिढीतील गायनप्रेमी मंडळींनी मला कितीकदा तरी विचारले आहे की, मास्तरांच्या गाण्याचे तुम्ही एवढे गोडवे गाता, पण आम्हांला तसा प्रत्यय येत नाही. दुर्दैव तुमचे, एवढेच मी म्हणतो झाले! मागे एकदा श्री० पु. ल. देशपांडे म्हणाले होते की मराठी चित्रपटासाठी कुठलीही तर्ज मनात आणावी-मग त्या चालीचे गणगोत मास्तरांच्या कुठल्यातरी गाण्याशी, चालीशी मिळते आहे हे लक्षात येते. एका देदीप्यमान काळात मास्तर कृष्णराव, सौ० हिराबाई बडोदेकर, सवाई गंधर्व, आणि अर्थातच श्री. बालगंधर्व या चार श्रेष्ठ कलावंतांनी महाराष्ट्राला आणि रसिकांना फार अमोल संगीतानंद दिला आहे.

आकाशवाणीतर्फे जुनी नाटके ध्वनिःक्षेपणासाठी निवडली आणि मास्तरांना संगीत देण्यासाठी म्हणून आमंत्रण केले. त्यांनी 'विधिलिखित' आणि 'नंदकुमार' यातली पदे म्हणून दाखविली तेव्हा निमंत्रित केलेला गाणारा वर्गसुद्धा आनंदाने भरून गेला. मास्तरांना पंजाबी, झुमरा यासारख्या ठेक्यांच्या वजनाची एक विशिष्ट लकब साधली आहे. तेच पद दुसऱ्यांनी आणि मास्तरांनी म्हणण्यात केवढा फरक वाटे तसे ऐकताना. मध्येच मग मास्तर त्या पदाची मूळची हिंदुस्तानी चीज म्हणून दाखवत तेव्हा तर एकदम जलसाच रंगायला लागायचा. 'कुसुमाविधि चारुकान्त', 'तिमिरपटल भार विपुल,' 'वरित अहा देवांच्या' या पदांच्या मूळच्या हिंदुस्तानी चिजा जेव्हा मास्तर म्हणून दाखवत तेव्हा साऱ्या कलावंतांना अपार कौतुक वाटे.

भारतीय संगीताची वाट मास्तरांच्या पदाप्रमाणे 'बाट दाटसम उलट पलटमे' झाली आहे. कुठून कुठे चालले आहोत हेही नीट उमगेनासे झाले आहे. आपल्या संगीताची एकरेषात्मक (linear) प्रगती एका अर्थाने खुंटल्यासारखी वाटते आहे. मास्तरांनी आपल्या कुवतीप्रमाणे ही कोंडी फोडली आहे. अगदी अलिकडच्या काळात 'कीचकवधा'च्या चित्रपटातले संगीत मास्तरांच्या कल्पकतेची आणि नवीन वळण घेण्याला तयार असलेल्या त्याच्या प्रतिभेची साक्ष देते. 'कुलवधू'तले नाट्यसंगीत मास्तरांनी सौ. ज्योस्नाबाईंच्या फिरत्या गळ्याला साजेलसे दिले. हे मास्तरांचे पराक्रम अलिकडच्या काळातलेच आहेत. नवीन मंडळींनी त्या यशाच्या मागचे रहस्य शोधले पाहिजे. बहुजनसमाजाच्या धाकाने समाजाच्या समजाच्या मर्यादेमुळे भारतीय संगीताने थोडी हाय खाल्ली आहे असा माझा समज आहे. पण त्या धाकालाही वाकुल्या दाखवून भारतीय संगीताची परंपरा राखून हजारो श्रोत्यांना आपलेसे करण्याची चतुराई दाखविणारे ते मास्तर, पाहाता पाहाता गाण्यात रंग भरुन श्रोत्यांना गुंगविण्याची किमया करणारे ते मास्तर आणि महाराष्ट्र-रसिकांच्या पसंतीला शंभर टक्के उतरलेले आणि रसिकांना सुखविणारे तेही मास्तरच.

संगीतशिक्षणात काय किंवा इतरही कलासंपादनात काय, गुरूचा प्रेमळ आशीर्वाद हा अत्यंत शुभदायी असावा लागतो. संगीताच्या क्षेत्रात अशा अनेक गोष्टी प्रचलित आहेत. पूर्णाशीर्वादाशिवाय उस्तादांनी किंवा गुरूंनी दिलेली विद्या असत्पुरुषसेवेत निष्फळ झाल्याचीही उदाहरणे आहेत. मास्तर कृष्णरावांना त्यांच्या गुरूंनी पं० भास्करबुवांनी अत्यंत प्रेमाने विद्यादान केले. तसा गुरुशिष्यांचा सहवास तीन-चार वर्षापेक्षा जास्त झाला नाही पण त्यांनी जी संगीतविद्या दिली ती मनापासून. नुसते संगीताचे व्याकरण नाही शिकविले. मास्तरांना शास्त्र शिकविले आणि कलाही दिली. संगीतात जी 'नजर' असावी लागते म्हणतात ती दिली.

मास्तर स्वतः एकदा सांगत होते, त्यांना लहानपणी 'लाल पाणी' -रॉसबेरी--पिण्याची फार आवड. पण तो आनंद त्यांना रोज देणार कोण ? मास्तर सांगतात, जलसा असला म्हणजे भास्करबुवा म्हणत, 'पाहारे-आज उत्तम गायलास तर एक बाटली देईन.” आणि मास्तर त्या एका बाटलीच्या लाल पाण्याच्या लालुचीने रंगत आणून सोडीत. एकदा त्यांनी कमालच करून सोडली. भास्करबुवांच्या बरोबरीने प्रत्येक चिजेबरोबर त्यांनी गुरूचे पक्के शिष्य आहोत हे दाखवून दिले. सारा श्रोतृवर्ग तर खूष झालाच, पण भास्करबुवा इतके खूष झाले की त्यांनी मास्तरांना हव्या तितक्या रॉसबेरीच्या बाटल्या पिण्याची मुभा दिली. एकापाठोपाठ एक तीन बाटल्या मास्तरांनी हाणल्या आणि शेवटी ओकून टाकल्या. पुन्हा रंगत वाढवायला जणू काय मास्तर मोकळेच. मास्तर नेहमी सांगतात की गुरुजी म्हणायचे " अरे, तुला मी ही हरळीची मुळी दिली आहे. जितकी खुडशील तितकी वाढेल आणि जन्मभर पुरेल." स्वतः मास्तरांना तर हा आशीर्वाद मिळालाच पण आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना आणि श्रोत्यांनाही त्या आशीर्वादाचे फळ जन्मभर पुरेल असे मिळाले आहे. मास्तरांच्या गाण्यातून मिळालेला आनंद आणि प्रसन्नपणा हा आमच्या श्वासोच्छ्वासाइतकाच अखंड जीवनानंद देत आला आहे. आणि म्हणूनच आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

श्री. कृ. द. दीक्षित
सौजन्य: षड्ज गंधार (लेखक : कृ.द.दीक्षित) मौज प्रकाशन


राग : भूप
चीज : फुल वन सेज
गायक : मास्टर कृष्णराव

संवाद व संपर्क

अनुसरण करा