शतकातून एखादा जन्मे ऐसा प्रतिभावान !
स्वरसाधक, स्वरपूजक ज्यांचे
कृष्णराव अभिधान
शतकातून एखादा जन्मे ऐसा
प्रतिभावान
भास्करजींचा हा शिष्योत्तम
तालस्वरांची सुजाण उत्तम
रसिका न कळे येते कधी सम
घेऊनी सुरेल तान
मैफलीमध्ये श्रवणानंदे
रसिक देती दादही मोदे
जो तो ऐके बहु आनंदे
करुनी जीवाचे कान
ख्याल असो वा असो तराणे
अथवा चित्रपटातील गाणे
भावगीतातही रंगुन जाणे
ऐसा गुणी महान
सेवेचे व्रत अंगिकारुनी
खरेपणाची कास धरूनी
मानवतेची सेवा करुनी
विसरे भूक तहान
संगीतास सर्वस्व वाहिले
गाण्यासाठी श्वास वेचले
जात भेद ना कधी मानिले
गणिले सर्व समान
मास्तर ते कृष्णराव ज्याला
महान हा सन्मान लाभला
जन्मजात या गुणवंताला
प्रतिभेचे वरदान
कवी - रमण रणदिवे