आज २७ फेब्रुवारी या 'मराठी राजभाषा दिना' च्या दिवशी चतुरस्त्र कलावंत संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव (उर्फ मास्तर कृष्णराव) यांनी संगीतबद्ध केलेल्या 'मराठी असे आमुची मायबोली' या गीताची मराठी माणसाला आठवण झाल्यावाचून राहवत नाही. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून कविवर्य माधव ज्युलियन यांनी हे काव्य रचले होते. या भावमधुर गीताचे गायन ज्योत्स्नाबाई भोळे यांनी केले तर कृष्णरावांनी या काव्याच्या अर्थानुरूप आर्त व सोज्वळ अशी भावगीत वळणाची चाल या गीतास दिली.
२० जानेवारी २०२२ ते २० जानेवारी २०२३ हे संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांचे १२५ वे जन्म वर्ष म्हणजेच शतकोत्तर रौप्य जयंती! कृष्णरावांनी मराठी संगीत रंगभूमीवर बाल गायक नट म्हणून सुरू केलेला सांगीतिक प्रवास आयुष्याच्या अखेरपर्यंत अखंडपणे चालू राहिला. उपजत प्रतिभेचं अलौकिक देणं अखंड स्वरांच्या यात्रेतून प्रवास करणाऱ्या या स्वरयात्रीला लाभलेलं होतं. या शतकोत्तर रौप्य जयंतीच्या औचित्याने त्यांचे चिरंजीव कै. माधव कृष्णराव तथा राजाभाऊ फुलंब्रीकर यांच्या परिवारातर्फे मास्तर कृष्णरावांचा जीवनपट व सांगीतिक कारकिर्द यांविषयी माहिती देणारी 'स्वरयात्री २०२२' ही दिनदर्शिका पं. वसंतराव गाडगीळ यांचे शुभहस्ते पुणे येथे प्रकाशित करण्यात आलेली आहे. अनाहत प्रकाशनाने मुद्रण व मांडणी केलेल्या आणि फुलंब्रीकर परिवारातर्फे निर्माण केलेल्या या माहितीपूर्ण दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ही दिनदर्शिका संपुर्णपणे मराठी भाषेत तयार केलेली आहे. विक्रीसाठी ही दिनदर्शिका महाराष्ट्रभर उपलब्ध केलेली असून विक्रेत्यांची विस्तृत माहिती www.masterkrishnarao.com
या संकेतस्थळावर 'दिनदर्शिका - स्वरयात्री २०२२' ह्या टॅबखाली दिलेली आहे. विशेष म्हणजे फुलंब्रीकर परिवाराने शतकोत्तर रौप्य जयंतीच्या औचित्याने कृष्णरावांच्याविषयी निर्माण केलेल्या ह्या संकेतस्थळाची प्रथम आवृत्तीदेखील मराठी भाषेमध्ये तयार केलेली आहे. या संकेतस्थळाचे उद्गघाटन मा.सौ. निर्मलाताई गोगटे यांचे शुभहस्ते पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात समारंभपूर्वक करण्यात आलेले आहे.
मराठी भाषेतील स्वरयात्री २०२२ ही दिनदर्शिका आणि मास्टर कृष्णरावांचे हे मराठी आवृत्तीमधील संकेतस्थळ म्हणजे मराठी मायबोलीचाच गौरव आहे. आजच्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने ही गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे.
मराठी असे आमुची मायबोली