अखेर भारतवर्षातील 'लतापर्व' आज संपले असले तरी अवकाशातील अगणित तारकांप्रमाणे लतादिदींचे स्वरचांदणे सर्वदूर पसरलेले आहे आणि दिव्यत्वाचा स्पर्श लाभलेल्या अलौकिक स्वरांतून त्या अजरामर झालेल्या आहेत.
ही गोष्ट आहे अनेक वर्षांपूर्वीची जेव्हा लता मंगेशकर यांच्याविषयी गौरवार्थ ग्रंथ काढण्याचे योजिले होते तेव्हाची! त्यावेळी मास्तर कृष्णराव यांना लतादिदींच्या गायनाबद्दल अभिप्राय देण्याची विनंती करण्यात आली आणि त्वरित मास्तरांनी पुढील गौरवपर परिच्छेद लिहून दिला.
“मा. दीनानाथांची कन्या या नात्याने मी कित्येक वर्ष लताबाईंना दुरून ओळखत असलो तरी त्यांच्या प्रत्यक्ष परिचयाचा योग फार उशिरा म्हणजे 'कीचकवध' या चित्रपटाच्या गाण्याच्या वेळीच आला. गाण्यांचे ध्वनिमुद्रण पुण्याला होणार होते. तरीही "मास्टर कृष्णराव संगीत दिग्दर्शन करीत असतील तर मी अवश्य येईन" असे लताबाईंचे उत्तर आले व त्याप्रमाणे त्या स्वत: पुण्याला आल्या. 'उपवर झाली लेक लाडकी', 'सांगु कुणा श्रीकृष्णा' इत्यादी गाणी त्यांनी अत्यंत चापल्याने आत्मसात केली. आणि एकेका 'टेक' मध्ये त्याचे ध्वनीमुद्रणही करुन टाकले. याच चित्रपटातले 'धुंद मधुमती रात रे' हे गीत मात्र मुंबईला ध्वनिमुद्रित केले गेले. लताबाई दोन तीन दिवस या गाण्याची तालीम करीत होत्या. त्यातील गंधाराची तान त्यांनी चटकन आत्मसात केली. या गीताचे ध्वनिमुद्रण झाल्यावर "आज आपण प्रभातची आठवण करून देणारे संगीत मला दिले आणि मी ते गाईले" असे तृप्त मनाने त्या म्हणाल्या. लताबाईंचे ते गुणग्राहक उद्गार ऐकून मलाही मोठा आनंद झाला. हातामध्ये गीताचा कागद घेतलेला, त्या कागदावर स्वत:च्या खास अशा खुणांनी स्वराचे बारकावे टिपलेले, यापेक्षा आणखी कसलेही साह्य न घेता सारे स्वर गळ्यातून बिनचूक काढणाऱ्या लताबाईंच्या बुद्धिमत्तेबद्दल मला विलक्षण कौतुक वाटले. तसेच चाली आत्मसात करताना त्यांचा जो निरलसपणा आणि परिश्रमशीलता मला दिसून आली त्यानेही मी चकित होऊन गेलो या गुणी मुलीला ईश्वर दीर्घायुष्य देवो.”
लतादिदी यांनी मास्तरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली एकाच चित्रपटासाठी गाणी गायली ज्याची मराठी आणि हिंदी चित्रपट आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. तो चित्रपट म्हणजे माणिक चित्र संस्थेचा 'कीचकवध'. हा चित्रपट पुणे येथे प्रभात स्टुडियोमध्ये चित्रित झाला. या १९५९ साली प्रकाशित झालेल्या व भारतात सर्वत्र प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटाचे दिगदर्शक होते पुणे येथील श्री. यशवंत पेटकर. मराठी चित्रपटाचे गीतकार होते कविवर्य ग. दि. माडगूळकर तर पार्श्वगायक होते लता मंगेशकर आणि सुधीर फडके. याच्या हिंदी चित्रपट आवृत्तीचे गीतकार होते भरत व्यास तर पार्श्वगायक होते लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी. म्हणजे मराठी व हिंदी आवृत्तीत एकच पार्श्वगायिका होती अन् ती म्हणजे लता मंगेशकर! आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी व हिंदी अशा दोन्ही आवृत्तींमधील गीतांवर एकाच संगीतकाराने स्वरसाज चढवला होता अन् ते होते प्रतिभाशाली शास्त्रीय गायक व संगीतकार मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर ( उर्फ मास्टर कृष्णराव )!
या चित्रपटामधील सर्वच गाणी कमालीची लोकप्रिय झाली. यातील 'धुंद मधुमती रात रे' या गीताने तर कहरच केला आणि कालातीत गीतांच्या पंक्तीत या गीतास अढळ स्थान मिळाले. या चित्रपटातील सर्व गीतांचे पुणे येथे ध्वनिमुद्रण करण्यात आले मात्र धुंद मधुमती या एकाच गीताचे ध्वनिमुद्रण मुंबई येथे झाले.
मास्तर कृष्णराव हे कल्पक व प्रयोगशील संगीतकार असल्यामुळे त्यांची ही सर्व गुणवैशिष्ट्ये कीचकवध या चित्रपटाच्या संगीतातदेखील दिसून येतात. उदाहरणार्थ, मास्तरांनी 'धुंद मधुमती' आणि त्याची हिंदी आवृत्ती असलेल्या 'आज मिलन की रात' या गाण्यांकरता चित्रपटसृष्टीत सर्वप्रथम 'हवाईयन गिटार' या सुरेल व कर्णमधुर अशा पाश्चात्य वाद्याचा प्रयोग केला. मास्तरांच्या संगीतातील इतर सर्वच प्रयोगांप्रमाणे हा प्रयोगदेखील अतिशय प्रभावी व यशस्वी झाला. मास्तरांना गुरू मानणाऱ्या सी. रामचंद्र यांनी हवाईयन गिटार याच वाद्याचा लगेचच 'आधा हैं चंद्रमा रात आधी' या 'नवरंग' चित्रपटातील गाण्याच्या संगीतात सुंदर वापर केला आणि मग पुढे इतर संगीतकारदेखील या गोड वाद्याचा त्यांच्या संगीतात वापर करू लागले.
लतादिदींनी धुंद मधुमती या गाण्याच्या ध्वनिमुद्रणानंतर “आज आपण प्रभातची आठवण करून देणारे संगीत मला दिले आणि मी ते गायले,” असे तृप्त मनाने भावपूर्ण उद्गार काढून मास्तरांच्या संगीताला दाद दिली.
आज लतादिदी यांचे निर्वाण झाले आणि या गतस्मृतींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. मनास एकच रुखरुख वाटत आहे ती म्हणजे कीचकवध या चित्रपटाच्या वेळी मास्तर कृष्णराव, लतादिदी आणि ग. दि. मा. या प्रतिभाशाली त्रयींचे एकत्र छायाचित्र काढले गेले होते त्याचा मात्र अजूनही तपास सुरू आहे.
धुंद मधुमती रात रे