इतर साहित्य

Back to List

आचार्य अत्रे आणि मास्टर कृष्णराव - नाते निरपेक्ष मैत्रीचे!

photo सासवड म्हटलं की डोळ्यांसमोर येते संत सोपान देव महाराज (सोपान काका) यांची समाधी, पराक्रमी सरदार पुरंदरे यांचा काळ्याशार दगडातील चिरेबंदी वाडा आणि कऱ्हा नदी! याबरोबरच सासवड म्हटलं की 'कऱ्हेचे पाणी' हे आत्मचरित्र लिहिणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची देखील हमखास आठवण होतेच.

सासवडशी संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव (नुसते मास्तर हे नाव अधिक प्रचलित) यांचा असलेला ऋणानुबंध म्हणजे जसे पुण्यातील सरदार मुजुमदार वाड्यात दरवर्षी गणेशोत्सवात मास्तरांचे गाणे ठरलेले असे तसेच दरवर्षी श्रीराम जन्म सोहळ्यात सासवडच्या सरदार पुरंदरे वाड्यातील राम मंदिरामध्ये मास्तरांचे गाणे ठरलेले असे. संगीतातील दर्दी असलेले सरदार बाळासाहेब पुरंदरे आणि मास्तर यांच्यामध्ये मित्रत्वाचे अतूट नाते होते. त्या राम जन्म सोहळ्यामधील मास्तरांच्या गायन मैफलीस वेळेची मर्यादा अजिबातच नसे. श्रोत्यांचे अगदी कान तृप्त होईपर्यंत आणि मन भरेपर्यंत मास्तर तासनतास बेफाम गायचे. त्या गाण्याला धार्मिकतेचे आगळे तेज चढायचे म्हणून त्यात भारदस्तपणा असायचा, गाण्यास वेगळीच रंगत यायची. सासवडच्या पुरंदरे वाड्यामधील या सोहळ्यातील मास्तरांची रंगतदार मैफल ऐकायला श्रोत्यांमध्ये आचार्य अत्रे हे देखील प्रामुख्याने आवर्जुन उपस्थिती लावत. आचार्य अत्र्यांना संगीताचा उत्तम 'कान' होता. मास्तरांच्या नवतेने नटलेल्या गाण्याचे ते अगदी चाहते होते. गंमत म्हणजे मास्तर हे मिश्कील आणि गोष्टीवेल्हाळ असल्याने ते उत्स्फूर्तपणे विनोद व प्रसंगी नकला सादर करून गप्पांची मैफल देखील गाण्याच्या मैफली इतकीच बहारदारपणे रंगवत असत. विनोद व वक्तृत्व या विषयांवर असलेली आचार्यांची हुकूमत तर सर्वश्रुतच आहे. त्यामुळे मास्तरांच्या अशा गप्पांच्या मैफलींमध्ये आचार्य अत्रे सहभागी झाले की विनोदाला उधाण येत असे आणि हास्याची कारंजी उडत असत. मास्तर आणि आचार्य या दोन प्रतिभावंतांना एकमेकांच्या कलेविषयी विलक्षण प्रेमादर वाटत असे. त्या दोहोंमध्ये निरपेक्ष मैत्रीचे अद्भुत नाते होते व ते नाते अखेरपर्यंत टिकले.

photoअष्टपैलू आचार्य अत्रे यांच्या अत्रे पिक्चर्सच्या 'वसंतसेना' या मास्तरांनी संगीत दिलेल्या मराठी व हिंदी भाषांमधील १९४२ सालच्या चित्रपटासंदर्भातील ह्या काही आठवणी! या चित्रपटाची निर्मिती, कथा, पटकथा, संवाद, गीतकार असे सबकुछ असलेले आचार्य अत्रे चित्रपटात गाणे कुठे घालायचे आहे तो प्रसंग पुढ्यात कागद व हातामध्ये लेखणी घेऊन समोर बसलेल्या संगीतकार मास्तरांना कथन करत होते. मग मास्तर नेमका भाव ओळखून त्या प्रसंगाला साजेशा विविध चाली गाऊन अनेक चालींचा पर्याय आचार्यां समोर मांडून ठेवत होते. कारण मास्तर चाल देत असताना त्यांना कधीच पद्याची वा वाद्याची आवश्यकता भासायची नाही. गाण्याचा नुसता प्रसंग कथन केल्यावर त्या प्रसंगातील नेमका भाव शोधून ते तिथल्या तिथे शीघ्रतेने चाली तयार करायचे. म्हणजे मास्तर संगीत देत असताना स्वरांची गुंफण करून त्यांची चाल आधी तयार होई व मग त्यात गीतकार योग्य शब्द भरत असे. शिवाय मास्तरांना आयुष्यात फक्त दोनच गोष्टींचे व्यसन होते - एक गाण्याचे आणि दुसरे बोलण्याचे! ते मैफलीत गात असताना गाण्यास श्रोत्यांची मनसोक्त दाद मिळाली की मास्तरांचे गाणे अधिक रंगत जायचे, तसं गप्पांच्या मैफलीत मास्तर बोलत असताना श्रोत्याची दाद घेण्यासाठी टाळीसाठी ते हात पुढे करायचे. टाळी मिळाली की खुशीत येऊन पुढच्या गप्पा सुरु होत. त्याप्रमाणे गाण्यास चाल लावत असताना देखील चित्रपट दिग्दर्शकाला एखादी चाल आवडली की मास्तर खुश होऊन टाळीसाठी हात पुढे करत. याबद्दल 'आचार्य अत्रे यांची चित्रपट गीते' या पुस्तकात लेखक श्री. गंगाधर महाम्बरे यांनी 'वसंतसेना' या चित्रपटाविषयी लिहिलं आहे. एकदा गाण्यास चाल देते वेळी "मी चांगल्या ’चाली’चा संगीत दिग्दर्शक आहे." (मास्तर निर्व्यसनी होते), अशी खेळकरपणे कोटी करून मास्तरांनी सवयीप्रमाणे टाळी घेण्यासाठी आचार्य अत्र्यांच्या पुढे हात नेला, तेव्हा अत्रे म्हणाले, "आता तुम्हाला 'चाळी' नाहीत तर महाल सजवायचे आहेत." या चित्रपटासाठी आचार्य अत्र्यांनी मास्तरांना 'प्रभात फिल्म कंपनी'च्या सहाशे रुपये पगारावरून 'अत्रे पिक्चर्स'मध्ये थेट बाराशे रुपये पगारावर आणले. शब्द, सूर, नृत्य, चित्र यांचा मनोहर संगम साधणारी ’कमलनृत्य’ ही या चित्रपटातील एक अभिजात कलाकृती होती. याच पुस्तकातील लेखात श्री.गंगाधर महांबरे पुढे लिहितात : - मास्टर कृष्णराव, या आपल्या संगीतातील गुरूबद्दल एकदा वसंत देसाई यांच्याशी मास्तरांची कन्या संगीतकार वीणा चिटको आणि मी गप्पा मारत असताना देसायांनी सांगितले की संपूर्ण भारतात केवळ आलापांनी आणि नोटेशनने कोणतेही वाद्य न वाजवता आपल्या सहाय्यकांना चाल 'सांगणारा' एकच संगीत दिग्दर्शक होऊन गेला आणि तो दिग्दर्शक म्हणजे मास्टर कृष्णराव!

photo असेच एकदा वसंतसेना चित्रपटाला चाल लावतेवेळी संगीतकार मास्तरांच्या समोर कथाकार व गीतकार आचार्य अत्रे बसले होते. त्यांनी मास्तरांच्या चाली व बोलण्याला दाद म्हणून अनेकदा त्यांच्या हातावर टाळी दिल्यावर मात्र शेवटी ते म्हणाले की मास्तर डावा हात या टेबलावर पसरून ठेवला आहे खुशाल हव्या तितक्या टाळ्या द्या. उजव्या हाताने अत्रे यांचे मास्तरांची स्वरांची गुंफण ऐकून त्यानुसार गीतातील चपखल शब्द तयार करून ते कागदावर उतरवण्याचे काम सुरू होते त्या क्रियेत खंड नको म्हणून असे ते म्हणाले. म्हणजे मास्तरांच्या 'टाळी'मधून आचार्य अत्रे देखील सुटले नाहीत.

दर्जेदार निर्मिती, दिग्दर्शन, कथा, अभिनय आणि अत्यंत सुश्राव्य संगीत असले तरी वसंतसेना हा मराठी व हिंदी चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला नाही. त्यातील सुमधुर गाणी मात्र त्याकाळी अत्यंत लोकप्रिय झाली. मास्तर या चित्रपटातील 'हा उदयाला नभी चंद्रमा आला' यांसारखी गाजलेली गाणी श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव त्यांच्या मैफलीत विस्तार करून अर्धा अर्धा तास सादर करत असत. स्वतः संगीत दिलेली चित्रपटातील प्रसिद्ध गाणी शास्त्रीय अंगाने विस्तार करत मैफलीमध्ये सादर करण्याची ही मास्तरांची पद्धत पं. राम मराठे, रवींद्र जोशी यांच्या सारख्या त्यांच्या शिष्यांनी पुढे समर्थपणे चालू ठेवली. वसंतसेना हा महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणावा तसा चालला नाही; त्यामुळे आचार्यांना भरपूर कर्ज होऊन त्या चित्रपटातील कलावंतांना मानधन देणे देखील शक्य झाले नाही. संगीतकार मास्तरांना एक पैसाही मानधन मिळू शकले नाही, तरी आचार्यांप्रति आत्यंतिक आदर व जिव्हाळा असल्याने मास्तरांनी समजुतदारपणा दाखवत मानधनावर पाणी सोडले. या मास्तरांच्या सौहार्दपूर्ण वर्तणुकीमुळे आचार्य आणि मास्तर यांच्यामध्ये कटुता न येता मैत्री अबाधित राहिली.

आदरणीय आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रजत जयंतीपूर्ती निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करत या निर्व्याज मैत्रीच्या नात्याचे केलेले हे संस्मरण!

- प्रिया फुलंब्रीकर

(सौजन्य : लोकसत्ता उत्तुंग विशेषांक २०२४)

संवाद व संपर्क

अनुसरण करा