मी लहानपणापासून माझे आजोबा मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव आणि कुमार गंधर्व या दोन प्रतिभासंपन्न कलावंतांचा सदाशिव पेठेतील गणेश भुवन ह्या आमच्या घराच्या व्हरांड्यात उभा असलेला प्रसन्न मुद्रेतील कृष्णधवल फोटो कायम पाहात आले. मोठी झाल्यावर जरा कळत्या वयात मला समजले की कुमारजी जेव्हा ' मला उमजलेले बालगंधर्व ' या कार्यक्रमाची तयारी करत होते, तेव्हा बालगंधर्वांच्या गायकी व गाण्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि विशेषतः गंधर्व नाटक मंडळीच्या संगीत द्रौपदी नाटकातील मास्तरांनी संगीतबद्ध केलेल्या 'विराट ज्ञानी व पांडवा सम्राट पदाला' ह्या दोन नाट्यपदांमधील बारकावे, हरकतींबद्दल जाणून घेण्यासाठी ते मास्तरांना भेटायला पुण्याला आमच्या घरी यायचे तेव्हा त्यातील एका भेटीत माझ्या वडिलांनी म्हणजे राजाभाऊ फुलंब्रीकर यांनी काढलेला तो फोटो होता. मग बालगंधर्वांची गायकी व गाणे याविषयी सखोल संशोधन, अविरत मनन व चिंतन आणि अलौकिक प्रतिभाविलास याआधारे कुमारजींनी १९६८ साली मला उमजलेले बालगंधर्व हा कार्यक्रम पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे जाहीर सादर केला, तेव्हा मास्तरांनी त्या सर्वांत पहिल्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.
थोर गायनाचार्य गुरुवर्य पं.भास्करबुवा बखले यांच्या ८ एप्रिल १९२२ रोजी झालेल्या निर्वाणानंतर बुवांचे पुत्रवत पट्टशिष्य असलेल्या मास्तरांनी गंधर्व नाटक मंडळीतील सर्व संगीत विभाग निगुतीने सांभाळण्यास सुरुवात केली. म्हणजे मास्तर एक गायक नट म्हणून गंधर्व नाटक मंडळीत १९१५-१६ सालापासून कार्यरत होतेच; शिवाय गुरुवर्य भास्करबुवांच्या निर्वाणानंतर संगीतकार व गुरू म्हणून त्या नाटक मंडळीतील बुवांची गादी आपसूकच त्यांच्याकडे चालत आली आणि गुरुवर्यांना स्मरून ती गादी त्यांनी समर्थपणे पुढे चालवली. अशाप्रकारे मास्तर आणि बालगंधर्व यांच्यात गुरुबंधू शिवाय पुढील काळात गुरू-शिष्य असा अतूट नातेसंबंध निर्माण झाला. त्यामुळे मास्तरांनी मला उमजलेले बालगंधर्व या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणे साहजिकच होते. मास्तरांनी त्या कार्यक्रमामध्ये मार्मिकपणे केलेल्या भाषणात बालगंधर्वांच्या गायकीचा मागोवा घेऊन त्यांच्या गाण्याविषयी अतिशय बुद्धिमत्तेने व नेटाने केलेल्या वैचारिक सांगीतिक सादरीकरणाबद्दल कुमारजींचे मनापासून कौतुक केले.
अर्थात वरील कुमार भेटीची व बालगंधर्वांवरील त्या कार्यक्रमाची आठवण माझे वडील राजाभाऊ व आत्या संगीतकार वीणा चिटको यांच्याकडून आम्ही ऐकली होती. पण पुढे मी कॉलेजमध्ये असताना आमच्या घरी प्रत्यक्ष कुमार भेटीचा सुवर्णयोग साधून आला. १९८९च्या सुमारास बाबांनी कुमारजींच्या पुण्यातील वास्तव्यात एके दिवशी त्यांना आमच्या घरी रात्री भोजनाचे आमंत्रण दिले. त्या आमंत्रणाचा कुमारजींनी लगेच स्वीकार केला. या कुमार भेटीची मात्र मला साक्ष होता आले याचा अपूर्व आनंद होतोय. त्यादिवशी संध्याकाळी कुमारजी गाडीतून सुहास्य वदनाने खाली उतरून अंगणात आले. अंगणातच काही क्षण स्तब्ध उभे राहून बाहेरून त्यांनी घराचे निरीक्षण केले. ते पूर्वी बालगंधर्वांवरील अभ्यासासंदर्भात मास्तरांना भेटायला घरी यायचे त्यानंतर साधारण वीस वर्षांनी ते आमच्या घरी आलेले होते. त्यांच्या आठवणीत होते तसेच घर पाहून त्यांना मनस्वी आनंद झाला. घरात शिरल्यावर उत्सुकतेने त्यांनी घर आतून न्याहाळले. माझ्या बहिणीने दिवाणखान्यातील बुक शेल्फमध्ये ठेवलेले त्यांचे अनूपरागविलास पुस्तक तिथून काढून त्यांच्यासमोर स्वाक्षरीकरता ठेवले; तेव्हा कुमारजींनी त्यांच्या शबनम पिशवीतून लहानशा सोनेरी पेटीत ठेवलेला सोनेरी काडीचा चष्मा काढला आणि त्या पुस्तकावर अत्यंत सुवाच्य अक्षरांत स्वाक्षरी केली. त्यावेळी मनसोक्तपणे कुमारजींनी सर्वांबरोबर गप्पागोष्टी केल्या. भोजन करते वेळी त्यांनी आईच्या रुचकर स्वयंपाकाला मनापासून दाद दिली. कुमारजी घरी आलेत याचा खरोखर विलक्षण आनंद झाल्यामुळे आम्ही सर्वजण भारावलेल्या अवस्थेत होतो. कुमारांच्या सान्निध्यात हास्यविनोदात तीन तास सहजपणे कसे निघून गेले हे कळलं देखील नाही.
बाल वयात कुमार गंधर्वांनी अत्यंत माधुर्याने व लोभसपणे गायलेल्या ' तुमबिन मेरी कौन खबर ले, गोवर्धन गिरिधारी रे ' या पदाची रेकॉर्ड सध्या सोशल मिडियावर अनेकदा पोस्ट होताना दिसत आहे. कुमारजींनी हिराबाई बडोदेकरांच्या ध्वनिमुद्रिकेवरून हे पद म्हटलं असलं तरी मुळात ते अमृतसिद्धी नाटकातील मास्तरांनी संगीतबद्ध केलेलं गंधर्व गीतच आहे. बाल वयात अत्यंत नजाकतीने हे गंधर्व गीत गाणाऱ्या या चाईल्ड प्रोडिजीचा अफाट बुद्धिमत्ता व प्रतिभेचे अलौकिक आविष्कार दर्शवणारा सांगीतिक प्रवास थक्क करणारा आहे. मास्तरांची नात म्हणून कुमार गंधर्व या असामान्य कलावंताचा अत्यल्प का होईना पण सहवास मला लाभला व त्यांचे प्रत्यक्ष गाणे ऐकावयास मिळाले हे मी माझे भाग्य समजते. १९८७ साली नामांकित चार्टर्ड अकाऊंटंट व संगीततज्ज्ञ असलेल्या पं. वामनराव देशपांडे यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करायचा असे गानवर्धनसारख्या काही संस्था, पं.वामनरावांचा शिष्यवर्ग, त्यांच्या निकटच्या सान्निध्यातील संगीत समीक्षक आणि त्यांचे गानरसिक असलेले स्नेही या सर्वांनी मिळून ठरवले. हे ठरवणाऱ्या निकटवर्तीयांमध्ये माझे वडील ती.राजाभाऊ अग्रणी होते. या सोहळ्याच्या पूर्वतयारीची प्रत्येक बैठक आमच्या घरी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दर वेळी बैठकीला किमान दहा-पंधरा जण आवर्जुन उपस्थित असायचे. मग पं. वामनरावांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा सगळ्यांनी मिळून टिळक स्मारक मंदिरात अतिशय आत्मीयतेने व थाटाने साजरा केला. तो समारंभ झाल्यानंतर कुमार गंधर्वांनी वामनरावांच्या छंदोवती या बंगल्यामध्ये फाल्गुन व चैत्र मासांतील रंग-गंध-नादाची अनुभूती देणारी रितुराज महफ़िल सादर केली. ती अद्भुत श्रवणानंद देणारी मैफल इतकी अप्रतिम होती की कुमारजींनी गाण्यातून होळी व वसंतोत्सव साजरा करून आम्हा श्रोत्यांना देखील त्या उत्सवात सामील करून घेतले. ती मैफल म्हणजे कुमारजींचा अलौकिक प्रतिभाविष्कार होता. त्यानंतर पुण्यात कुमारजींच्या काही अविस्मरणीय बैठका प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला. तसेच माझे वडील ती.राजाभाऊ यांनी पं. मुकुल शिवपुत्र यांच्या आमच्या निवासस्थानी घरगुती मैफिली आयोजित केल्या होत्या तेव्हा त्यांच्या भावविभोर गाण्यामधून देखील कुमारजींच्या गायकीचे ओझरते दर्शन घडले.
रितुराज महफ़िल व कुमार भेटीच्या मखमली आठवणी मी स्मृतिकप्प्यात मोरपीसासारख्या जतन करून ठेवल्यात. ८ एप्रिल २०२३ रोजी पं. कुमार गंधर्वांच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ झालेला आहे. त्यानिमित्त इतकी वर्ष जपून ठेवलेलं हे अलवार मोरपीस मी येथे अलगद बाहेर काढून ठेवलंय. कुमारजींना विनम्र आदरांजली!
- प्रिया फुलंब्रीकर