संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव हे नाव मी लहानपणापासूनच आमच्या घरात ऐकत आले. माझा जन्म १९४० सालचा असून माझे बालपण पुणे येथे गेले. माझे वडील श्री. वसंत विष्णु लोणकर व आई सौ.आनंदीबाई हे दोघेही संगीतप्रेमी होते. बालगंधर्व, मास्तर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर अशी त्या पिढीची दैवतं होती. आई सतत बालगंधर्वांची नाट्यपदे गुणगुणत असे, तर वडील हे मास्तरांचे अगदी भक्तच म्हणा ना! मास्तरांची पुण्यात कुठेही मैफल असली तरी ते अगदी न चुकता तिथे हजेरी लावत असत. वडीलांचा कृ. द. दिक्षित, श्री. विद्वांस असा मास्तरप्रेमी मित्रांचा ग्रुप होता. मास्तरांच्या एखादया मैफलीची तिकिटे संपली असली तर ही मंडळी डोक्यावर तबला घेऊन, हातात तंबोरे धरून मैफलीत प्रवेश मिळवित. मास्तरांच्या अनेकानेक मैफली ऐकून वडीलांना मास्तरांचे गाणे तोंडपाठ झालेले होते. ते घरामध्ये स्वतः कधी पेटी तर कधी ऑर्गन वाजवत मास्तरांची गाणी गात असत. तसेच काही काळ श्री. बापूराव अष्टेकर (उर्फ भोपे मास्तर) हे वडीलांना मास्तरांचे गाणे शिकवायला आमच्या घरी येत असत. ते मास्तरांना ऑर्गनची साथसंगत करत असत. घरात वडीलांची संगीत तालीम व रियाज ऐकून ऐकून मलाही लहानपणीच मास्तरांच्या गायकीची पुष्कळशी ओळख झाली.
मास्तर कृष्णरावांचे प्रत्यक्ष दर्शन
मला मास्तरांचे प्रत्यक्ष दर्शन घडले ते १९५१ साली. पुणे येथील हिराबागेत सकाळी आयोजित केलेल्या मास्तरांच्या मैफलीला माझे वडील मला घेऊन गेले होते. त्या मैफलीची आठवण अविस्मरणीय आहे. मैफलीच्या सुरूवातीला मास्तरांनी कामोद रागातील 'कारे जाने न दूंगी', 'बंगरी मोरी मुरक गई रे' ह्या चिजा गायल्या. मग मध्यंतरात मास्तरांनी पुणे भारत गायन समाजाकरता लिहिलेल्या रागसंग्रहाच्या तिसऱ्या भागाचे प्रकाशन पुणे विद्यापीठाचे तत्कालिन उपकुलगुरू बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांचे शुभहस्ते झाले. या मैफलीत बॅ. जयकर, सरदार आबासाहेब मुजुमदार, प्रा. अरविंद मंगरूळकर यांसारखे मोठे गानरसिक उपस्थित होते. रागसंग्रहाच्या प्रकाशनानंतर मास्तरांनी कोमल रीषभ आसावरी हा राग सुरू केला. गात असताना मास्तर उपस्थित श्रोत्यांना उद्देशून म्हणाले, "काही लोक म्हणतात की मी जसे गातो तसे लिहित नाही. आता या पुस्तकात तपासून बघा बरं मी जे गातोय तेच लिहिले आहे की नाही." एवढे बोलून लगेच मास्तरांनी प्रसन्न मुद्रेने गाणे परत चालू केले. ती चीज होती 'आयो रे जीत राजा रामचंद्र' तेवढयात एक आश्चर्य घडले! बाजूच्या रानातून एक वानर हॉलमध्ये शिरले व थेट ऑर्गनवर श्री. अष्टेकरांच्यासमोर जाऊन बसले. अष्टेकर गुरुजी गडबडले तेव्हा मास्तर त्यांना म्हणाले, "बापू, भिऊ नकोस. साक्षात हनुमान आले आहेत श्रीरामचंद्राचे गाणं ऐकायला." मास्तर शांतपणे गात राहिले व अष्टेकर गुरूजी ऑर्गनवर साथ करीत राहिले. ती चीज संपेपर्यंत ते वानर कोणतीही मर्कटलीला न करता ऑर्गनवर स्तब्ध बसून होते व चीज संपल्यावर आले तसे परत झाडीत निघून गेले. मी प्रथमच प्रत्यक्ष अनुभवलेली मास्तरांची ती मैफल माझ्या मनात कायम घर करून राहिली.
यानंतरची आठवण म्हणजे मी १९५६ साली कॉलेजला जाऊ लागले त्या सुमारासच कॉलेजमध्ये युवक महोत्सवाची प्रथा सुरू झाली. त्याकरता आमच्या स. प. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे समूहगीत प्रा. अरविंद मंगरूळकरांच्या विनंतीवरून मास्तरांनी बसवून दिले. 'उठोनिया प्रात:काळी। वदनी वदा चंद्रमौळी। श्री बिंदूमाधवा जवळी। स्नान करा गंगेचे।।' ही भूपाळी मास्तरांनी निवडली होती. मास्तरांच्या गोड व रंजक गायकीचे सगळे विशेष त्या भूपाळीत समाविष्ट झालेले होते. या निमित्ताने त्या समूहगीतात भाग घेतलेले आम्ही सर्व विद्यार्थी मास्तरांच्या घरी गेलो होतो. मास्तरांच्या घरातील दिवाणखान्यात बसून मास्तरांकडून प्रत्यक्ष तालीम घेतानाचा तो प्रसंग अजूनही मनात रुंजी घालत आहे.
एकदा अष्टेकर गुरुजींच्या मध्यस्थीने माझ्या वडीलांनी मास्तरांना आमच्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले होते. मास्तरांना गोड पदार्थ अतिशय आवडतात अशी अष्टेकर गुरुजींनी माहिती दिली. त्यावरून आईने साजूक तुपातील शिरा केला होता. जेवणानंतर मास्तरांना गाण्याचा आग्रह केल्यावर कोणतेही आढेवेढे न घेता मास्तर सहजसुंदर गायले व आमचे कान तृप्त केले. हास्यविनोदात गप्पाष्टके झाल्यावर मास्तर घरी जायला निघाले. त्यावेळी वडीलांच्या मागून आईपण निरोप द्यायला पुढे आली तेव्हा "वहिनी साहेब, या आमच्या घरी एकदा!" असे मास्तरांनी आईला आमंत्रण दिले आणि मग वडीलांना उद्देशून म्हणाले, "अस्ताई पाठोपाठ अंतरा आलाच!"
१९५८ साली मास्तरांच्या षष्ठयब्दीपूर्तीनिमित्त पुणे येथील नू. म. वि. शाळेच्या पटांगणात नऊ दिवसांचा एक भव्य संगीत सोहळा झाला होता. वडीलांबरोबर मी देखील त्या सोहळ्यास गेले होते. पटांगण रसिकांच्या गर्दीने फुलले होते. बालगंधर्वांनी त्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवले होते. प्रारंभी मास्तरांच्या कन्येचे सतारवादन झाले. ही मास्तरांची कन्या म्हणजे पूर्वाश्रमीच्या प्रभा उर्फ बेबी फुलंब्रीकर आणि विवाहानंतरच्या संगीतकार वीणा चिटको. सत्कार समारंभ आटोपल्यावर बालगंधर्व आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, "मास्तरांनी माझ्या गाण्यांना चाली दिलेल्या आहेत. मास्तर हे माझे गुरुच आहेत". त्या संगीत सोहळ्यात बालगंधर्व, मास्तर, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, माणिक वर्मा, भीमसेन जोशी इत्यादी प्रभृतींचे असामान्य गायन झाल्याचे स्मरते.
१९६० साली पुन्हा मास्तरांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला. त्यावेळी पुणे आकाशवाणी केंद्राने 'संगीत गोष्टी' नावाचा एक कार्यक्रम सुरू केला होता. त्यात तीन नवोदित कलाकार व एक मोठा कलावंत अध्यक्ष म्हणून असे. या कार्यक्रमाकरता नवोदित कलाकार म्हणून माझी निवड केली होती आणि अध्यक्ष म्हणून मास्तरांना निमंत्रित केले होते. ह्या आधी झालेल्या काही संगीत गोष्टी कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष नवोदितास 'तुमचे नाव काय ? तुम्ही काय गाणार आहात ?' असे प्रश्न विचारत त्यामुळे नवोदित कलाकार गांगरून जाई. मास्तरांना याची जाणीव झाली व त्यांनी ही पध्दत मोडून स्वत:च कलाकाराचे नाव, त्याचे गाणे याबद्दल श्रोत्यांना परिचय करून दिला. त्यावेळी माझे हिराबाई बडोदेकरांकडे तीन-चार वर्षे शिक्षण झालेले होते. संगीत गोष्टी कार्यक्रमात मी राग 'देसी' मधील 'म्हारे डेरे आवो' ही चीज गायली. मास्तरांना माझे गाणे पसंत पडले. त्यांनी दादही दिली आणि कौतुकही केले.
कला आणि कार्य !
मास्तरांचे रेडियोवरही अनेक वेळा गाणे ऐकायला मिळायचे. तसेच त्यांच्या गाण्याच्या ग्रामोफोन रेकॉर्ड्सही निघाल्या होत्या. मास्तरांच्या मैफलीबद्दल कृ. द. दिक्षितांनी म्हटले आहे की, "मास्तरांची मैफल कधीही कंटाळवाणी होत नसे. मैफलीतील वातावरण हलके - फुलके, आनंदी व प्रसन्न असे." मास्तरांच्या स्वभावात एक मिश्कील खेळकरपणा होताच. ते गात असताना मधून मधून श्रोत्यांशी संवाद साधत असत. त्यांचे शास्त्रीय गायन बोजड नव्हते. त्यात कसलाही आटापीटा, आक्रस्ताळेपणा नव्हता. लांबच लांब स्वर लावणे, जोरकस अशा तीन-चार आवर्तनाच्या ताना घेणे व त्याकरता सर्वांग घुसळून काढणे असे प्रकार नव्हते तर अगदी सहजसुंदर, सुरेल आणि कानाला गोड वाटणारे असे त्यांचे गाणे होते. ख्यालामध्ये सुध्दा त्यांची लय फार ठाय किंवा विलंबित नसे. साधारण मध्यलयीतच तिलवाडा, एकताल, झपताल, झुमरा प्रामुख्याने या तालामधील ख्याल असत. देस रागातील 'पिया कर धर देखो धरकत है मोरी छतिया', बहार रागातील 'करसो ले जाई गडवा' कामोद मधील 'हू तो जनम न छांडूंगी' जयजयवंती मधील 'अचल रहो राजे', जयत मधील 'झकोरा न वे', कौसी कानडातील 'ए मदार' आणि 'लालन तुम बिन कौन करें', नायकी कानडा मधील 'रतिया मैं जागी', सुहा कानडातील 'तू है महंमदसा', दरबारी कानडामधील 'हजरत तूरकमान', 'जानकीराम राजा रे' आणि 'कित गयो उधो का भइलो' अशा कित्येक चीजा मास्तरांनी मैफलीत गाऊन गाजवल्या.
मास्तरांनी गंधर्व नाटक मंडळीच्या संगीत द्रौपदी, नंदकुमार, मेनका, आशा-निराशा , कान्होपात्रा, अमृतसिध्दि इत्यादी नाटकांना संगीत दिले. कान्होपात्रामधील 'नुरले मानस उदास', 'देवा धरिले चरण' या गाण्याची स्वररचना ही मास्तरांनीच तयार केली होती. 'नुरले मानस उदास' ह्या पदाच्या चालीवर मास्तरांनी 'मन में मोहन बिराजे' ही बंदीश निर्माण केली. हे नाट्यपद व त्यावर बांधलेली बंदीश हे दोन्ही आम्हाला शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकवले होते. मास्तरांच्या आधीचे संगीत नाटकांचे संगीतकार परंपरागत बंदिशी, ठुमऱ्या यांच्या चाली नाट्यपदांकरता वापरत असत. मास्तर मात्र नाट्यपदांकरता स्वतंत्र स्वररचना करीत होते. त्यांना कवित्व शक्तीचे निसर्गदत्त वरदान लाभले असल्यामुळे त्यांनी अनेक बंदीशी उत्साहीपणे बांधल्या. कल्पकतेने नवीन राग निर्माण केले. मास्तरांनी मो. ग. रांगणेकरांच्या नाटकांनाही सुरेल व नाविन्यपूर्ण चाली दिल्या. ती सर्वच्या सर्व नाट्यपदे अतिशय लोकप्रिय झाली. 'बोला अमृत बोला' ही भैरवी म्हणजे तर 'कुलवधू' नाटकाचा कळसच! 'बोला अमृत बोला' हे भैरवी रागातील नाट्यगीत मास्तर त्यांच्या मैफलीतही गात असत. षष्ठयब्दीपूर्ती सोहळ्यात लोकाग्रहास्तव मास्तरांनी हे नाट्यगीत व या नाट्यगीताच्या चालीवर त्यांनी बांधलेली हिंदी चीज गायली होती. मास्तरांच्या भैरवीमधील अनेक चीजा लोकप्रिय झालेल्या होत्या. मास्तरांनी अनेक मैफलींमध्ये गाजवलेली भैरवी ठुमरी म्हणजे 'देखो मोरी चुरिया'. मास्तरांची ठुमरी निराळीच होती. बनारसी किंवा पूरब अंगाची ठुमरी, पंजाबी ठुमरी या ठुमरीच्या ठराविक प्रकारांहून स्वतंत्र अशी त्यांची ठुमरी होती. 'बंदिश की ठुमरी' या प्रकारात मास्तरांची ठुमरी मोडत असावी. त्यांची पिलूमधील एक गाजलेली ठुमरी म्हणजे 'भंवरा नारिक मोलन दें'.
मास्तर स्वतः गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकांत गायक नटाची भूमिकाही करत असत. 'एकच प्याला' नाटकातील शरदच्या भूमिकेतील 'ललना मना नच अघलवशंका' हे पद, 'स्वयंवर' मधील महाराणीच्या भूमिकेतील 'लपविला लाल गगनमणी' हे पद तसेच 'आता राग देई मना', 'तेजा नभी ज्या साहवेना' अशी मास्तरांची काही खास नाट्यपदे व भूमिका गाजल्या होत्या. पुढे त्यांनी 'मेरी अमानत', 'भक्तीचा मळा' अशा काही चित्रपटांना संगीत देऊन त्यात उत्तम अभिनयदेखील केला. प्रभात फिल्म कंपनीचे ते आघाडीचे संगीत दिग्दर्शक होते. मास्तरांनी भक्तिसंगीताला शास्त्रीय संगीताच्या चौकटीत बसवून 'धर्मात्मा' चित्रपटातील गीतांना दर्जेदार चाली दिल्या. तोपर्यंत भक्तिसंगीत हे वारकरी संप्रदायातील पारंपारिक चालीनुसार गायले जायचे. मास्तरांनी चित्रपटसंगीतातदेखील असे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले व ते सर्व यशस्वी झाले. 'शेजारी' मधील 'लख लख चंदेरी', 'माणूस' मधील 'कशाला उद्याची बात', 'लाखारानी' मधील 'शाम बजाये तोरे घरमें मुरलिया', 'किचकवध' मधील 'धुंद मधुमती रात रे' ही मास्तरांनी संगीतबद्ध केलेली काही चित्रपटगीते म्हणजे मास्तरांच्या उत्तुंग स्वरप्रतिभेचा उत्कृष्ट आविष्कारच !
मास्तर देवभक्त होते तसेच देशभक्तही होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रगीत कोणते ठरवावे असा भारत सरकारपुढे पेच निर्माण झाला. मास्तरांनी 'वंदे मातरम्' हे गीत राष्ट्रगीत व्हावे म्हणून अथक प्रयत्न केले. राष्ट्रगीताची चाल ही लहानांना आणि मोठ्यांना, स्त्रियांना आणि पुरुषांना सामुहिकरित्या गाता यावी शिवाय वंदे मातरम् ही मातृभूमीची वंदना आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन मास्तरांनी वंदेमातरम् गीताला 'झिंझोटी' रागात सोपी व सुमधुर चाल लावली. पं. नेहरूंच्या आमंत्रणावरून मास्तरांनी संसदेत 'वंदेमातरम्' ची प्रात्यक्षिके देऊन या गीताला राष्ट्रगीताइतकाच बहुमान प्राप्त करून दिला. त्याकाळी महाराष्ट्रात सर्व शाळांमधून मास्तरांनी संगीतबध्द केलेल्या वंतेमातरम् गीताची रेकॉर्ड दररोज वाजवली जायची. अशा सर्व गोष्टींमुळे मास्तर अतिशय लोकप्रिय व आदरणीय झाले होते. असे म्हटले जायचे की मास्तरांनी सुगम संगीत फार सोपं करून टाकलंय. परंतु मला कायम असे वाटते की वरकरणी मास्तरांनी स्वरबध्द केलेले सुगम संगीत सोपं वाटलं तरी प्रत्यक्षात सहजतेने भावपूर्ण गाणे तितके सोपे नव्हते. मास्तरांनी त्यांच्या चालीमध्ये एक दर्जा कायम राखला होता. लोकप्रियतेकरता तडजोड केली की दर्जा घसरण्याचा प्रकार नेहमीच असतो. मास्तरांनी शास्त्रीय संगीताच्या मैफलींबाबतही सहजसुंदरता साधून दर्जा राखण्याचे तंत्र यशस्वी केले होते. दीर्घ आलापी न करता मास्तर चटकन बोलतानेत शिरत. बोलतानांचे असंख्य प्रकार त्यांच्या उपजेतून निघत. त्याशिवाय मुलभूत गुण म्हणजे सुरेलपणा व आवाजातील माधुर्य. याचे उदाहरण द्यायचे झाले तर हिंडोलमधील रूपक तालातील ‘ए मा पी‘ ही चीज. खालच्या षड्जापासून वरपर्यंत जाऊन वरच्या षड्जाला झटका देऊन एकदम सोडून देणे ही क्रिया मास्तरांच्या गाण्यात अनेकवेळा येई. यामध्ये वरचा षड्ज नेमका व सुरेल लागणे याला फार महत्त्व आहे. मास्तरांचे सगळेच स्वर त्या त्या स्वराच्या श्रुतीदर्जानुसारच असत. हाच सुरेलपणा होय. हा सुरेलपणा व आवाजातील माधुर्य याबाबतीत मास्तरांचे संगीत क्षेत्रातील पहिले मार्गदर्शक सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर यांची आठवण करावी लागेल. मास्तरांचे गुरू पं. भास्करबुवा बखले यांजकडून तर मास्तरांना आग्रा, जयपूर आणि ग्वाल्हेर अशा तिन्ही घराण्यांचे मिश्रण असलेली अद्भूत गायकी मिळाली. पुष्कळ पुरूष गवयांचे आवाज जाड, भरदार व घोगरे असतात. मास्तरांचा आवाज मात्र पातळ व घुमारदार होता. माझ्या वडीलांचा आवाजही पातळ व मुलायम असल्यामुळे त्यांच्या आवाजातून मला मास्तरांचे गाणे पुष्कळसे मुळाप्रमाणे ऐकावयास मिळाले.
सवाई गंधर्व व मास्तर यांच्या संदर्भातला एक किस्सा माझे वडील अगदी रंगवून सांगत असत. सवाई गंधर्वांचा नातू म्हणजे कन्या सौ. प्रमिला व जामात डॉ. वसंतराव ऊर्फ नानासाहेब देशपांडे यांचा मुलगा चि. प्रभाकर याचे व्रतबंधन होते. यानिमित्त सवाई गंधर्वांनी रात्री मास्तरांचे गाणे ठेवले होते. या गाण्याला माझे वडील गेले होते. वडील सांगत की आधी गाण्याला मास्तरांच्यासमोर श्रोते म्हणून घरातली बायका - मुले, मुंजीकरता आलेले पाहुणे वगैरे होते. मास्तरांनी मजेत गप्पा मारत गायला सुरूवात केली. इतक्यात तिथे हिराबाईंच्या भगिनी कमलाबाई बडोदेकर आल्या. मास्तरांनी त्यांच्याकडे पाहिले व परत गप्पागोष्टी करत हलकं - फुलकं गायला सुरूवात केली. थोड्यावेळाने सरस्वतीबाई राणे तिथे आल्या. मास्तरांनी दखल घेतल्याचे दाखवले. मग हिराबाई बडोदेकर आल्या. त्यांना पाहिल्यावर मास्तर कोट वगैरे सावरून बसले आणि शेवटी नातवाला घेऊन सवाई गंधर्व आले. ते आलेले पाहून मास्तरांनी गप्पा पूर्णपणे थांबवत गाण्यास सुरुवात केली. मग मास्तर तुफान गायले व अप्रतिम मैफल झाली. सवाई गंधर्वांनी मास्तरांचे तोंड भरून कौतुक केले. गाणे झाल्यावर वडील मास्तरांना भेटायला गेले तेव्हा मास्तर वडीलांना म्हणाले, “लोणकर, गाणं आमच्या खिशात असतं ते केव्हा बाहेर काढायचं हे आम्हाला माहीत असतं. “ समोर श्रोतृगण ज्या प्रकारचा असेल ते ओळखूनच त्यांना रुचेल, भावेल असेच कलावंताला गावे लागते. मास्तरांच्या चतुर बुध्दीने हे ओळखले होते. म्हणूनच मास्तर समाजाच्या सर्व थरांत प्रिय होते.
मास्तरांचे एक महत्कार्य म्हणजे त्यांची संगीतविषयक लेखनसेवा. बखलेबुवांनी स्थापन केलेल्या पुणे भारत गायन समाजाकरता 'रागसंग्रहमाला' या नावाचे एकूण सात भाग त्यांनी लिहिले आहेत. त्यांमध्ये त्यांनी स्वरचित चीजा, राग याबरोबरच गुरुवर्य बखलेबुवांकडून मिळालेल्या परंपरागत बंदिशींचे जणू भांडारच खुले केले आहे! पूर्वीच्या काळातील गवयांचे आपल्याजवळील विद्या कुणाला लिखित स्वरूपात देण्याची वृत्ती नव्हती. या पार्श्वभूमीवर मास्तरांची ही दानत व दिलखुलासपणा हृदयाला भिडतो. शिवाय त्यांनी गुरुसेवा या हेतूने हे कार्य केल्याचे प्रस्तावनेत विनम्रपणे नमूद केले आहे. या रागसंग्रहांमधून त्यांनी प्रभाती, देवसाख, कुकुभ बिलावल, लंका दहन सारंग यांसारखे अनेक प्रचलित अप्रचलित, दुष्प्राप्य, दुर्लभ असे राग दिलेले आहेत. तसेच या सर्व रागांतून सरगम, ध्रुपद , धमार, ख्याल, विलंबित तसेच मध्यलयीतील वा द्रुत त्रिताल एकतालातील चीजा, ठुमऱ्या , भजन, अष्टपदी अशी सर्व प्रकारची गीते दिलेली आहेत. त्याकरता मास्तरांनी पं. भातखंडे यांच्या स्वरलिपीहून वेगळी अशी स्वतःची स्वतंत्र स्वरलिपि वापरलेली आहे. विशेष म्हणजे ते कोमल 'म' अशी संज्ञा वापरतात. सर्वसाधारपणे प्रचारात जे शुद्ध स्वरसप्तक म्हणून वापरले जाते त्यातील शुध्द मध्यमास ते कोमल 'म' असे संबोधतात. पण ते शुध्द ही संज्ञा वापरत नाहीत तर तीव्र व कोमल हीच परिभाषा वापरतात. तसेच ताल दाखवण्याची पध्दत व खुणादेखील वेगळ्या पध्दतीने वापरल्या आहेत. वरच्या ओळीत चीजांची शब्दाक्षरे, त्याखाली स्वर व सर्वांत वरती तालाचे बोल अशी सर्व नावीन्यपूर्ण पध्दत आहे. या त्यांनी घालून दिलेल्या पध्दतीनुसार व अभ्यासक्रमानुसार भारत गायन समाज ह्या संस्थेत कार्य चालते. ह्या संपूर्ण संगीत अभ्यासक्रमास भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे. मास्तरांचे समग्र संगीतकार्य विचारात घेतल्यास शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, सुगम संगीत, भक्तिसंगीत , चित्रपट संगीत, देश संगीत आणि सांगीतिक अभ्यासक्रम असे पैलू सहज लक्षात येतात.
जातीवंत कलावंताला माननीय वंदना!
मास्तरांनी शिष्य तयार केले नाहीत असा प्रवाद निर्माण केला गेला होता. यावर मास्तर म्हणत, "माझ्याकडून चिकाटीने संगीत शिक्षण घेणारे शिष्य कोठे आहेत ?" पण मास्तरांचे मधुसूदन कानेटकर, मोहन कर्वे, सरस्वतीबाई राणे, राम मराठे, योगिनी जोगळेकर, आर. एन. करकरे, बखलेबुवांचे नातू सुहास दातार असे काही गुणवान प्रत्यक्ष शिष्य आहेत. तर मी त्यांची एकलव्यासारखी अप्रत्यक्ष शिष्य आहे कारण माझे वडील हे मास्तरांचे अप्रत्यक्ष शिष्य होते. साधारण १९८५ सालच्या आसपास मास्तरांचे चिरंजीव श्री. राजाभाऊ फुलंब्रीकर यांनी माझे गाणे भारत गायन समाजात आयोजित केले होते. त्यावेळी मास्तरांची पवित्र स्मृती माझ्या मनात जागृत झालेली होती व मी मास्तरांना मनोमन वंदन करून गाण्यास प्रारंभ केला होता.
शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी मास्तरांना समारंभपूर्वक बहाल केलेली 'संगीतकलानिधि' ही गौरवाची पदवी अगदी सार्थच आहे. मास्तरांनी समाजाची सर्व अंगांनी सेवा केली आणि समाजाला भरभरून दिले. आपल्याजवळचा अलौकिक संगीतकलेचा निधी त्यांनी मुक्तहस्ताने खुला केला. मास्तरांचे अनेक घटनांनी नटलेलं जीवन आणि त्यांचे व्यापक सांगीतिक कार्य ह्यांचा विचार केला तर एक दंतकथाच वाटावी इतके ते रमणीय आहे. खरोखर मास्तर हे मास्तरच होत ! असा दुसरा कलावंत पुन्हा होणे नाही.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेने २०१७ सालचा संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या नावाचा स्मृति पुरस्कार संगीतविषयक लेखनाकरता मला प्रदान केला. मी धन्य झाले. या पुरस्काराचा मला अभिमान वाटतो. २० ऑक्टोबर हा मास्तरांचा पुण्यदिन ! त्यानिमित्ताने सादर केलेले मास्तरांचे हे स्मरणचित्र !
लेखिका: डॉ. सौ. सुलभा ठकार (पूर्वाश्रमीच्या कु. सुलभा लोणकर)
सौजन्य : संगीतकलाविहार ऑक्टोबर, २०१८