मास्तरांवरील लेख

Back to List

भारताच्या स्वातंत्र्याची नांदी आणि मराठी संगीत रंगभूमीवरील नवयुगाची नांदी!

'भारताच्या स्वातंत्र्याची नांदी! : चले जाव-लढेंगे या मरेंगे-भारत छोडो आंदोलन''

१९४२ साली ब्रिटिशांविरुद्ध अखेरचा स्वातंत्र्य लढा देण्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी ठरविले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथील गोवालिया टँक मैदानावर (आताचे ऑगस्ट क्रांती मैदान) झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला 'चले जाव'चा इशारा दिला. 'लढेंगे या मरेंगे'ची घोषणा झाली. त्यातून एक तेजाची ज्योती उठून साऱ्या देशभर पसरली. त्याच रात्री गांधींजींसह सर्व बड्या नेत्यांना अटक झाली.

'वंदे मातरम् चे जाहीर गायन'

या काँग्रेसच्या ऐतिहासिक 'चले जाव' अधिवेशनात ८ ऑगस्ट रोजी गोवालिया टँक मैदानावर ' वंदे मातरम् ' हे प्रेरणादायी, वंदनीय गीत संपूर्ण कडव्यांसहीत संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णा यांनी झिंझोटी रागात तयार केलेल्या स्वकृत चालीत गाऊन सादर केले. यावेळी पेटून उठलेल्या भव्य जनसमुदयासमोर हे तेजस्वी गीत गाण्यासाठी प्रसिद्ध गायक व कट्टर देशभक्त असलेल्या मास्तरांचीच निवड करण्यात आली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात या गीतावर बंदी असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे गीत संपूर्ण कडव्यांसहित सर्वांसमोर गाऊन सादर करणे हे फार मोठे धाडस होते.

'ऑगस्ट क्रांती'

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीने (एआयसीसी) मुंबई अधिवेशनात 'भारत छोडो आंदोलन' सुरू केले. ऑगस्टमध्ये हे आंदोलन सुरू झाल्यामुळे ते 'ऑगस्ट क्रांती' म्हणून ओळखले जाते. ब्रिटिशांचे जुलमी राज्य संपवण्यासाठी हे देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले होते.

'मराठी संगीत रंगभूमीवरील नवयुगाची नांदी! : संगीत कुलवधू'

ऐतिहासिक 'चले जाव' चळवळ ही भारतीय स्वातंत्र्याची नांदी होती आणि त्या अधिवेशनात मास्तर कृष्णरावांना समस्त भारतीयांसमोर संपूर्ण वंदे मातरम् गीत गाऊन सादर करण्याचे भाग्य लाभले; तर ह्याच चले जाव अधिवेशनामुळे ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत ऑपेरा हाऊसमध्ये ठरलेला 'संगीत कुलवधू' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पंधरा दिवसांनी पुढे ढकलण्यात आला.

'प्रज्ञा नवनवोन्मेष शालिनी प्रतिभा मता'

गंधर्व नाटक मंडळीत नाट्यपदांना रागदारीवर आधारीत भारदस्त चाली देणारे मास्तर कृष्णराव उर्फ कृष्णा मास्तर हेच कुलवधूचे संगीतकार होते. त्यांनी बदललेल्या काळानुसार स्वतःच्या नाट्यसंगीतात बदल घडवून त्यास शास्त्रीय संगीताच्या चौकटीत बसवून कल्पकतेने भावगीताच्या वळणाने नटवले होते. मास्तर कृष्णराव हे गंधर्व नाटक मंडळीत गायक नट आणि संगीतकार म्हणून कार्यरत होते. गुरुवर्य पं.भास्करबुवा बखले यांच्या १९२२ साली झालेल्या निर्वाणानंतर त्यांचे बुद्धिवान पट्टशिष्य या नात्याने मास्तर या नाटक मंडळीतील सर्व संगीत विभाग सांभाळू लागले. त्यामुळे गुरुबंधू असलेले नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व गुरुवर्य पं.बखलेबुवांच्या निर्वाणानंतर मास्तरांना गुरुस्थानी मानू लागले. पुढे १९३३ साली कर्जाचा बोजा डोईजड झाल्यामुळे ही नाटक मंडळी बंद पडली. ही नाटक कंपनी बंद पडण्यास काही कारणे होती आणि त्यातील महत्त्वाचे एक कारण म्हणजे तंत्रज्ञानात लक्षणीय प्रगती झाल्यामुळे सिनेमा बोलू लागला होता. बोलपटांच्या झंझावातामुळे मराठी संगीत रंगभूमीला काहीशी मरगळ येऊन उतरती कळा आली होती. परंतु कुलवधू नाटकातील पदांच्या सर्वच्या सर्व चाली रसिकांच्या अगदी पसंतीस उतरल्या. या नाटकाच्या नवतेचा स्पर्श लाभलेल्या अभिजात संगीताने मराठी संगीत रंगभूमीला आलेली मरगळ झटकून टाकली. त्यामुळे ह्या नाटकाचे संगीत म्हणजे मराठी संगीत रंगभूमीवरील नवयुगाची नांदीच ठरली. शास्त्रीय संगीतावर आधारीत परंतु बदललेल्या काळाची पाऊले ओळखून नाट्यपदांना कालानुरूप दिलेल्या भावगीत वळणाच्या चाली हे कुलवधूच्या संगीतातील सर्वांत मोठं वैशिष्ट्य होतं.

'कुलवधूच्या संगीताची नाट्यमय कथा'

संगीत हा तर संगीत नाटकाचा आत्माच! मूकपटांचा जमाना होता तेव्हा मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. पण नंतर बोलपटांच्या झंझावतामुळे मराठी संगीत रंगभूमीला काहीशी मरगळ आली होती. तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे त्या आधुनिकतेचे वारे वाहू लागलेल्या काळात प्रेक्षकांची अभिरुचीदेखील बदलली होती. तासनतास चाललेले संगीत नाटक तल्लीन होऊन मनमोकळी दाद देत बघणारा व वन्समोअर देत नाट्यपदांचा मनसोक्त आस्वाद घेणारा मराठी रसिक दोन तासांच्या चित्रपटाकडे करमणुकीचे साधन म्हणून वळला होता. या सर्व बाबी विचारात घेऊन श्रीयुत मो. ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन संस्थेने कुलवधू हे संगीत नाटक निर्माण केले होते. परंतु नियोजित संगीत दिग्दर्शक डी. पी. कोरगावकर हे चाली देण्याचे काम पूर्ण न करता ऐनवेळी नाटक सोडून गेले होते. जाहीर केलेला नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग अगदी आठ-दहा दिवसांवर येऊन ठेपला होता. नटांच्या अभिनयाच्या तालमी तयार होत्या पण संगीतकार उपलब्ध नसल्याने नाटकाचे संगीतच तयार नव्हते. सगळीकडे आधीच या संगीत नाटकाच्या धुमधडाक्यात जाहिराती व बातम्या झळकल्या होत्या, तसेच शुभारंभाच्या प्रयोगासाठी थिएटरपण आरक्षित करून ठेवले होते. रांगणेकर आणि नट संचाच्या तोंडचे अगदी पाणी पळाले होते. योगायोगाने त्यावेळी मास्तर त्यांच्या मुंबईतल्या दादरमधील घरी काही दिवस वास्तव्यास होते. तेव्हा रांगणेकर मास्तरांकडे या नाटकास संगीत देण्याची विनंती करायला म्हणून गेले, त्यावेळी मास्तरांनी त्यांना विनम्रपणे नकार दिला. मग मास्तरांचे ज्येष्ठ संगीतकार मित्र श्रीयुत केशवराव भोळे यांनी या नाटकाला मास्तरांनी संगीत देण्याविषयी विनंती पत्र लिहून दिले कारण इतक्या कमी कालावधीत संगीत नाटकाला दर्जेदार चाली देण्याचे कार्य प्रतिभेचे वरदान लाभलेले शीघ्र संगीतकार मास्तर कृष्णरावच करू शकतील अशी केशवराव व इतर सर्वांनाच मनोमन खात्री होती. त्यांचे विनंती पत्र घेऊन रांगणेकर पुन्हा मास्तरांकडे आले. तेव्हा मात्र अजातशत्रू, भावनाप्रधान, कोमल व दयार्द्र अंतःकरणाच्या मास्तरांनी सर्वांची अडचण ओळखली आणि या नाटकास अत्यल्प कालावधीत त्वरित चाली देण्याचे कबूल केले. खरं म्हणजे एका आठवड्यात नाटकाला कालानुरूप चाली देऊन त्या नटांकडून बसवून घेणे हे कार्य शिवधनुष्य उचलण्यासारखे होते. पण आपण उपकार करत आहोत अशी मात्र भावना अजिबात न आणू देता जात्याच गोड स्वभावाचे मास्तर लाघवीपणे म्हणाले, "वाह, ज्योत्स्नाबाई गाणार आहेत. तर मग जरूर चाली देतो." ह्या घटनेनंतर शीघ्रतेने एका आठवड्याच्या आत ह्या प्रतिभासंपन्न कलावंताने या नाटकासाठी कोणत्याही आधीच्या प्रचलित शास्त्रीय चीजांच्या चाली न वापरता पूर्णपणे स्वतंत्र अशा सहजसुंदर संगीत रचना करून सर्व नाट्यपदे ज्योत्स्नाबाई भोळे व गणपतराव मोहिते उर्फ मास्टर अविनाश ह्या प्रमुख गायक कलाकारांकडून अत्यंत मेहेनतीने बसवून घेतली. यातील 'क्षण आला भाग्याचा' , 'मनरमणा मधुसूदना' आणि 'बोला अमृत बोला' या तीन पदांच्या चाली तर प्रतिभेचे वरदान लाभलेल्या मास्तरांनी एका दिवसांतच तयार केल्या. बोला अमृत बोला या भैरवीतील पदाची तालीम चालू असताना मास्तरांनी त्या पदातील अवघड तानपलटे कमी करून नाट्यपद म्हणायला आटोपशीर असे केले. (पुढे मास्तरांनी या नाट्यपदाच्या भैरवीतील चालीवर आधारित रागदारीतील बंदिश त्यातील सर्व अवघड तानपलट्यांसहित बांधली होती व ती बंदीश ते त्यांच्या गानमैफलीत सादर करत असत, अशी आठवण ती बंदीश गाऊन मास्तरांच्या ज्येष्ठ कन्या संगीतकार वीणा चिटको विशद करत असत.) तसेच मास्तरांनी बदललेल्या काळातील रसिकांची बदललेली आवड लक्षात घेऊन या नाटकामध्ये चित्रपटात असते तसे एखादे युगुल गीत घालावे म्हणून रांगणेकरांना आग्रह केला व त्याप्रमाणे 'भाग्यवती मी त्रिभुवनी झाले' हे युगुल गीत निर्माण केले गेले. युगुल गीताचा मराठी संगीत नाटकात केलेला हा पहिला प्रयोग मानला जातो. या पदांची तालीम सुरू असताना "मास्तर, मनरमणा मधुसूदना या पदाची चाल जरा बाळबोध वाटते," असे ज्योत्स्नाबाईंनी म्हटल्यावर मास्तरांनी त्यांना चॅलेंज दिले होते की या पदास वन्स मोअर मिळाला नाही तर मी संगीत दिग्दर्शन करण्याचे सोडून देईन. केवढा हा स्वतःच्या कलेविषयी आत्मविश्वास!

'कुलवधूचा शुभारंभ'

अखेरीस २३ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत सकाळी संगीत कुलवधूचा ऑपेरा हाऊसला शुभारंभाचा प्रयोग झाला आणि त्याच दिवशी दुपारी परळच्या दामोदर हॉलमध्ये या नाटकाचा दुसरा प्रयोग झाला. एका सुंदर व अत्यंत सुश्राव्य नाटकाचा मराठी संगीत रंगभूमीवर जन्म झाला. 'बोला अमृत बोला' च्या अमृतस्वरांनी रंगदेवता प्रसन्न झाली. रसिकांनी या नाटकातील प्रत्येक पदास वन्स मोअर देऊन पसंतीची पावती दिली. मास्तरांच्या अपेक्षेप्रमाणे मनरमणा या पदालादेखील वन्स मोअर मिळाले. तेव्हा विंगेत बसलेल्या मास्तरांनी विजयी मुद्रेने हासत ज्योत्स्नाबाईंकडे पाहिले. ज्योत्स्नाबाईंनी प्रवेश संपल्यावर आत येऊन मास्तरांना खाली वाकून नमस्कार केला. या नाटकातील हिरोच्या तोंडची दोन पदेदेखील अत्यंत दर्जेदार व श्रवणीय आहेत; परंतु हे संगीत नाटक मुळातच हिरॉईन केंद्रित असल्याने हिरॉईनची भूमिका व पदे कांकणभर अधिक भाव खाऊन जातात.

या नवीन वळणाच्या दर्जेदार नाट्यसंगीतामुळे उतरती कळा आलेल्या मराठी संगीत रंगभूमीला नवसंजीवनी प्राप्त झाली. संगीत रंगभूमीकडे काहीशी पाठ फिरवलेला रसिक प्रेक्षक परत रंगभूमीकडे वळला. पुन्हा संगीत रंगभूमीला 'सोनियाचे दिन' आले. आजच्या अत्याधुनिक काळातदेखील जेव्हा रंगभूमीवर नव्या संचात हे संगीत नाटक सादर केले जाते तेव्हादेखील या नाटकातील दर्जेदार व सदाबहार संगीताला रसिकांची वाहवा मिळते. 'बोला अमृत बोला' ही भैरवी ऐकताना तर 'अमृताचे कलश होती रिते कानी, तरीही तृप्तीचा विराम नसे मनी!' अशी रसिक प्रेक्षकांची अवस्था होते.

'रंगमूर्ती व आनंदमूर्ती!'

रंगदेवता प्रसन्न असलेल्या मास्तर कृष्णरावांना नाट्यकर्मी व रसिक 'रंगमूर्ती' म्हणत असत. तसेच मिश्किल व विनोदी स्वभावाचे मास्तर त्यांच्या बोलण्या व गाण्यातून आनंदाची मुक्त उधळण करत असल्यामुळे ते जिथे जातील तिथे निर्व्याज हास्याचा खळखळाट आणि आनंदाचे साम्राज्य पसरलेले असे, म्हणून बालगंधर्व त्यांना प्रेमादराने 'आनंदमूर्ती' असे संबोधत.

गुरुवर्य बखलेबुवांनी मास्तरांना लहानपणापासून ख्यालिये गवई म्हणून बैठकीतील शास्त्रीय गायनाची तालीम दिली होती. त्यामुळे मास्तरांनी कायम शास्त्रीय गायन सादरीकरणास प्राधान्य दिले. यास अजून एक महत्त्वपूर्ण घटना कारणीभूत होती. ८ एप्रिल १९२२ रोजी गुरुवर्य बखलेबुवांचे अकाली दुःखद निर्वाण झाले तेव्हा काही केल्या पिंडास कावळा शिवत नव्हता. त्यावेळी सर्वांनी "कृष्णा, आता तूच काहीतरी बोल," म्हणून मास्तरांना आग्रह केला. तेव्हा बुवांचे अत्यंत लाडके पुत्रवत पट्टशिष्य असलेल्या मास्तरांनी जड अंतःकरणाने आणि साश्रू नयनांनी चितेची राख भाळी लावून "तुमचे गाणे मी अखेरपर्यंत गात राहीन," असे गुरुवर्य बुवांच्या आत्म्यास वचन दिले तेव्हा कुठे पिंडास कावळा शिवला! मास्तर दिल्या वचनास अखेरपर्यंत जागले. बखलेबुवा जिथे जिथे शास्त्रीय गायन सादर करत असत तिथून मास्तरांना गाण्याची निमंत्रणे येऊ लागली. तिथे ठिकठिकाणी जाऊन मास्तरांनी शास्त्रीय गायन सादर केले. तसेच अखिल भारतातील इतर अनेक ठिकाणांहून नव्याने त्यांना शास्त्रीय गायनाची निमंत्रणे येऊ लागली तिथेदेखील जाऊन ते गायन सादर करू लागले. अशाप्रकारे पं.बखलेबुवांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा भारतभर प्रचार व प्रसार करण्याचे कार्य मास्तरांनी समर्थपणे पुढे नेले. या त्यांच्या महत्त्वपूर्ण उपक्रमास "मास्तर माझ्या गुरुंचे गाणे गातात" या विचाराने गुरुबंधू असलेल्या बालगंधर्वांनी देखील सदैव साथ देऊन मनापासून सहकार्य केले व गंधर्व नाटक मंडळीच्या नाट्यप्रयोगाच्या दिवशी जरी मास्तरांच्या शास्त्रीय बैठकीचे आयोजन असले तरी त्यांनी दरवेळी मास्तरांची त्या नाट्यप्रयोगातून बिनशर्त रजा मंजूर केली आणि त्यांना ठरल्या ठिकाणी जाऊन मनसोक्त गाऊ दिले. मास्तर गंधर्व नाटक मंडळीत गायक नट व संगीतकार म्हणून अखेरपर्यंत म्हणजे १९३३ साली ती कंपनी बंद पडेपर्यंत कार्यरत होते. गंधर्व नाटक मंडळीतील नंदकुमार, मेनका, विधीलिखित, कान्होपात्रा, सावित्री, आशा-निराशा, अमृतसिद्धी (यावरील चित्रपट साध्वी मीराबाई) या पूर्ण नाटकांना व स्वयंवर, विद्याहरण, संशयकल्लोळ, द्रौपदी, एकच प्याला, सौभद्र यांसारख्या इतर अनेक नाटकांतील काही नाट्यपदांना तसेच राजाराम संगीत मंडळीच्या प्रेमसंन्यास नाटकाला, नाट्यनिकेतनच्या कुलवधू, एक होता म्हातारा, कोणे एके काळी आणि भाग्योदय या नाटकांना तसेच सुमतीबाई धनवटे यांनी लिहिलेल्या धुळीचे कण या नाटकाला मास्तरांनी स्वतंत्र स्वररचनेतील अवीट गोडीच्या चाली देऊन नाट्यसंगीत क्षेत्रात स्वतःचा वेगळा, वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला आहे. तशीच अतुल्य कामगिरी त्यांनी देश संगीत, चित्रपट संगीत आणि इतर संगीत क्षेत्रांत केलेली दिसून येते.

'राष्ट्रगीताकरिता सांगीतिक लढा'

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत कोणते असावे? हे काही ठरले नव्हते. वंदे मातरम् व जन गण मन या दोन्ही गीतांमध्ये राष्ट्रगीताकरता चुरस होती. कट्टर देशभक्त असलेल्या मास्तरांना वंदे मातरम् ही मातृभूमीची वंदना असल्याने हेच भारताचे राष्ट्रगीत असावे असे वाटत होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक वर्षे त्यांनी हाच ध्यास घेतला होता व त्यासाठी संगीताच्या माध्यमातून त्यांनी अथक प्रयत्न केले होते. तेव्हा आकाशवाणीवर वंदे मातरम् गाऊ न दिल्याने त्यांनी निर्भिडपणे आकाशवाणीवर गाण्यास बहिष्कार टाकला होता. पुढे १९४७ साली स्वातंत्र्य दृष्टीपथात असताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे मास्तरांनी आकाशवाणीवर घातलेला बहिष्कार मागे घेतला व चैत्री पाडव्याला वंदे मातरम् हे गीत रेडियोवर गाऊन आपल्या आकाशवाणीवरील सांगीतिक कारकिर्दीचा सन्मानाने पुनः आरंभ केला. तसेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वंदे मातरम् हे राष्ट्रगीत व्हावे म्हणून त्यांनी दिल्लीला जाऊन संसदेत पंतप्रधान पंडित नेहरू व इतर घटना समिती सदस्यांसमोर १९४७ ते १९५० या कालावधीत ह्या गीताची प्रात्यक्षिके दिली. या प्रतिभाशाली संगीतकलानिधींनी सखोल विचार करून मुख्यत्वे मंद्र व मध्य सप्तकात गायला जाणारा झिंझोटी हा राग निवडून त्या रागात सांघिकरीत्या सर्वांना सुलभपणे गाता येईल अशाप्रकारे संपूर्ण कडव्यांसहित वंदे मातरम् गीत संगीतबद्ध केले. ते स्वतः उत्तम शास्त्रीय गायक असले तरी ते या गीताकडे राष्ट्रगीत या दृष्टिकोनातून बघत असल्यामुळे त्यांनी कधीच शास्त्रीय अंगाने विस्तार करत या गीताचे गायन केले नाही तर त्यांनी सदैव राष्ट्रगीतासारखेच या गीताचे गायन केले. शेवटी २६ जानेवारी १९५० रोजी या गीतास तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून घोषित केले व या गीतास जन गण मन या राष्ट्रगीता (National Anthem) इतकाच समान बहुमान देण्यात येईल असे जाहीर केले. म्हणजे वंदे मातरम् हे गीत जरी राष्ट्रगीत होऊ शकले नाही तरी या गीतास पूर्णपणे न वगळता निदान राष्ट्रीय गीताचा बहुमान सरकारतर्फे देण्यात आला होता. या भारत सरकारच्या अंतिम निर्णयात मास्तर कृष्णरावांनी वंदे मातरम् साठी दिलेल्या तेजस्वी सांगीतिक लढ्याचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

'अवघे सव्वाशे वयमान!'

२० जानेवारी २०२३ या दिवशी कै. कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर उर्फ संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव / मास्तर कृष्णराव (जन्म २० जानेवारी १८९८ आळंदी - मृत्यु २० ऑक्टोबर १९७४ पुणे) यांची १२५ वी जयंती पूर्ण होत आहे. संगीतकलानिधी मास्तर कृष्णरावांनी शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, चित्रपट संगीत, भक्तिसंगीत, सुगम संगीत, भावसंगीत आणि देश संगीत अशा सर्व संगीत क्षेत्रांमध्ये एखाद्या गरुडाप्रमाणे ऐटदार भराऱ्या घेत मनमुराद विहार केलेला दिसून येतो. आजदेखील ते आपल्याला त्यांच्या विविध सांगीतिक शिल्पांमधून कुठे ना कुठे भेटत असतातच! त्यामुळे खरंतर २० जानेवारी २०२३ या दिवशी त्यांनी 'अवघे सव्वाशे वयमान' पूर्ण केलंय असं म्हणता येईल. तसेच २६ जानेवारी २०२३ या दिवशी भारताचा चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन संपन्न झाला आहे. यानिमित्ताने २४ जानेवारी १९५० रोजी वंदे मातरम् ची दखल घेऊन भारत सरकारतर्फे त्या गीतास राष्ट्रीय गीत म्हणून घोषित केले गेले या घटनेचे स्मरण झाले.

संगीतकलानिधी मास्तर कृष्णराव यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती वर्षाच्या पूर्ततेच्या औचित्याने भारतीय स्वातंत्र्याची नांदी आणि मराठी संगीत रंगभूमीवरील नवयुगाची नांदी ह्या दोन अविस्मरणीय व स्तुत्य घटनांमधील मास्टर कृष्णरावांच्या भरीव योगदानाचे हे प्रेमपूर्वक संस्मरण!

लेखिका: प्रिया फुलंब्रीकर

संवाद व संपर्क

अनुसरण करा