संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव (मास्टर कृष्णा/मास्तर) यांचा गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश कधी व कसा झाला? पुढे प्रभात फिल्म कंपनीत त्यांचा कसा प्रवेश झाला? याची ही सुरम्य कथा...
१९१५ सालची ही घटना. गुरुवर्य भास्करबुवा बखले अमृतसरला ठरलेल्या जलशासाठी मास्टर कृष्णा या आपल्या पट्टशिष्याला घेऊन पुण्याहून निघाले. रेल्वेच्या लांबच्या प्रवासात मध्ये त्यांनी बडोदा येथे गंधर्व नाटक मंडळीचा मुक्काम असल्याने बडोद्यात थोडा वेळ वास्तव्य करण्याचे ठरवले. बुवा व शिष्योत्तम कृष्णा बडोद्यात पोहोचल्यावर बालगंधर्व हे तापाने आजारी असल्याचे समजून आले. बडोद्यात श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांकरता संगीत शारदा नाटकाचा खास खेळ आयोजित करण्यात आला होता. सयाजीराव गायकवाड महाराज हे गंधर्व नाटक मंडळीचे मोठे आश्रयदाते होते. दरवर्षी या नाटक मंडळीचा एखादा खेळ पाहूनच महाराज युरोपला सुट्टीकरता जात असत. यावेळी महाराजांसमोर संगीत शारदा नाटकाचा प्रयोग सादर करण्याची जय्यत तयारी गंधर्व नाटक मंडळीने केली होती. परंतु शारदेची प्रमुख भूमिका करणाऱ्या नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्वांनी फणफणून ताप भरल्याने अगदी अंथरूणच धरले होते. महाराजांसमोर कसा प्रयोग सादर करायचा? हा मोठा प्रश्न कंपनीतील सगळ्यांना पडला होता. त्याचवेळी बुवा मास्टर कृष्णाला घेऊन तिथे पोहोचले. सर्वानुमते गोड गळ्याच्या चुणचुणीत कृष्णाने शारदेची भूमिका करावी असे ठरले. त्यावेळी खुद्द नाटककार देवल मास्तर तिथेच बडोद्यात या कंपनीबरोबर होते. देवल मास्तरांनी सतरा वर्षांच्या तरुण वयातील मास्टर कृष्णाला त्या बडोद्यातील वास्तव्यात शारदेची भूमिका शिकवून त्याच्याकडून अल्पावधीत ती भूमिका उत्तम बसवून घेतली. बुवा जलशासाठी अमृतसरच्या प्रवासास पुढे निघून गेले व कृष्णा तेवढा मागे बडोद्यातच थांबला. बडोद्यात ठरल्याप्रमाणे या शारदेचा गंधर्व नाटक मंडळीचे आश्रयदाते श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या समोर विशेष प्रयोग सादर करण्यात आला. महाराजांच्या पसंतीस तो प्रयोग उतरला. मास्टर कृष्णाने साकारलेली शारदेची भूमिका सर्वांना अतिशय आवडली. मग या संगीत शारदा नाटकाचा अजून एक प्रयोग बडोद्यातील जनतेसमोर सादर करण्यात आला. सर्वांनी मास्टर कृष्णाच्या अभिनयाला व पदांना मनसोक्त दाद दिली. त्यावेळी कृष्णाचे वय त्या शारदेच्या भूमिकेकरता अगदी साजेसे होते; तसेच त्याचा आवाज तयारीचा व जात्याच मधुर होता. नाट्यकलाप्रवर्तकच्या संगीत नाटकांमधूनच एक बालगायक नट म्हणून त्याचा रंगभूमीवर प्रवेश झालेला असल्याने रंगमंचावर आत्मविश्वासाने वावरायची त्याला बालपणापासूनच सवय होती. या सर्व गोष्टी त्याला शारदेची भूमिका करताना उपयोगी ठरल्या.
गोविंदराव टेंबे यांनी तेव्हाच त्यांनी स्थापन केलेल्या शिवराज नाटक कंपनीत मास्टर कृष्णाला शंभर रुपये पगारावर प्रमुख नटीची ऑफर दिली होती. त्याकाळी शंभर रुपये ही फार मोठी रक्कम होती. परंतु गुरुवर्य भास्करबुवांना हा करार अमान्य होता. मास्तर कधीही बुवांच्या आज्ञेबाहेर गेले नाहीत. ते बुवांना भीत होते म्हणून नाही तर बुवा त्यांचे परम श्रद्धास्थान व पितृतुल्य गुरू होते. त्यामुळे त्यांचा शब्द मास्तरांनी कधी खाली पडू दिला नाही, त्यांचे मन दुखावेल असे मास्तरांनी कधी वर्तन केले नाही. तसेच त्यांना कायमच मनोमन खात्री असायची की बुवा जे करतील, म्हणतील ते योग्यच व हिताचे असणार. केवढी ही गुरूनिष्ठा व गुरुं प्रति श्रद्धा आणि आदरभाव!
संगीत शारदेचा बडोद्याला यशस्वी प्रयोग झाल्यानंतर लगेच पं.भास्करबुवांच्या संमतीने गंधर्व कंपनीचे मॅनेजर श्री. पंडित यांनी गंधर्व नाटक मंडळीचा मास्टर कृष्णाबरोबर करार करवून घेतला. ते १९१६ साल होते. गुरुबंधू असलेल्या बालगंधर्वांनी पायघड्या अंथरून कृष्णाचे नाटक मंडळीत जल्लोषात स्वागत केले. साखर वाटून कृष्णाच्या कंपनीतील प्रवेशाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गंधर्व नाटक मंडळीतील संगीत विभाग सांभाळणारे भास्करबुवा त्यावेळी स्वयंवर नाटकाची पदे बसवत होते. त्या नाटकामध्ये कंपनीत नवीन प्रवेश केलेल्या मास्टर कृष्णाला महाराणीच्या भूमिकेसाठी घेतले. त्यात कृष्णासाठी खास जलशाचा प्रसंग निर्माण करण्यात आला. महाराणीच्या भूमिकेकरता खऱ्या जरीचा गर्भरेशमी शालू विणण्यात आला व महाराणीस शोभेसे खरे भासतील असे दागदागिने घडवण्यात आले. तसेच बुवांनी बालवयापासून गाण्यांना विविध चाली देण्याचे प्रयोग करून बघणाऱ्या कृष्णाची सर्जनशीलता पारखून त्यास त्या नाटक मंडळीमध्ये आपल्या बरोबर संगीत विभागात चाली लावण्यासाठी पण घेतले. बुवांना माहीत होते की कृष्णाला 'गोरिदा चित लगा' हे लोकगीत खूप आवडले आहे आणि तो हे गीत सारखे म्हणत असतो ते. कृष्णाने बुवांसमवेत जम्मूकाश्मीरच्या प्रवासात असताना हे लोकगीत गाणाऱ्या भिक्षेकऱ्याकडून त्याला ढब्बू पैसा परत परत देऊन शिकून घेऊन राजा हरी सिंगच्या विवाह सोहळ्यात म्हटले होते. त्या गाण्याचे विवाह सोहळ्यात खूप कौतुक केले गेले. या लोकगीताची पहाडीतील चाल कृष्णाने बुवांच्या अनुमतीने स्वयंवरमधील 'एकला नयनाला' या पदाला सहिसही लावली. ती चाल ऐकून खुश झालेले देवल मास्तर म्हणाले की कृष्णा या चालीतील भानगडी कमी करून ही चाल संशयकल्लोळ मधील 'मजवरी तयाचे प्रेम खरे' ह्या पदाला लाव. त्याप्रमाणे कृष्णाने त्याच लोकगीताच्या चालीत देवल मास्तरांना अपेक्षित होता तसा बदल करून ती पहाडीमधील चाल मजवरी तयाचे पदाला लावली.
गंधर्व नाटक मंडळीतर्फे १९१६ साली स्वयंवर (डिसेंबर) व संशयकल्लोळ (ऑक्टोबर) ही नाटके रंगभूमीवर आली. ही दोन्ही नाटके अत्यंत गाजली, तसेच मास्टर कृष्णा या तरुण संगीतकाराने एकाच लोकगीताच्या चालीवरून दिलेली ती दोन्ही पदे देखील अत्यंत गाजली.
पुढे १९२० साली संगीत द्रौपदी नाटकातील 'विराट ज्ञानी' व 'पांडवा सम्राटपदाला' या दोन्ही पदांना मास्तरांनी (मास्टर कृष्णाने) पहाडी रागातच स्वतंत्र स्वररचना करून चाली दिल्या. या सृजनात्मक कार्याबद्दल त्यांनी नाटकाचे संगीतकार असलेल्या गुरुवर्य भास्करबुवांची "कुशा, तू माझ्या भरजरी शालूला ठिगळ नाही लावलेस!" अशा शब्दांत प्रेमळ शाबासकी मिळवली.
१९२२ साली झालेल्या बुवांच्या निर्वाणानंतर नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकर यांनी "कृष्णा, तू स्वयंवरचे स्वरावली पुस्तक (नोटेशन) लिही," असे मास्तरांना सांगितले. त्यानुसार मास्तरांनी १९३२ साली स्वयंवर नाटकातील पदांच्या स्वरावलीचे पुस्तक लिहून तयार केले. (https://masterkrishnarao.com/mar/ebooks)
पुढे १९३४ साली गंधर्व नाटक मंडळी बंद पडल्यावर मास्तरांनी प्रभात फिल्म कंपनीमध्ये बालगंधर्वांबरोबर 'धर्मात्मा' चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यांनी धर्मात्मा चित्रपटातील भक्तिगीते व अभंगांना स्वतंत्र स्वररचना करून चाली दिल्या. मास्तरांनी संगीतबद्ध केलेली धर्मात्मा मधील 'भाव तोचि देव' अशी सर्वच दर्जेदार गाणी वाखाणली गेली. शास्त्रीय संगीताच्या चौकटीत बसवलेले भक्तिसंगीत हा त्याकाळी भक्तिसंगीत क्षेत्रात प्रथमच केलेला प्रयोग होता. असा अभिनव प्रयोग करून भक्तिसंगीतात मास्तरांनी नवीन दालन निर्माण केले. मग पं.भीमसेन जोशींनी गायलेली संतवाणी याच प्रवाहातून गेली.
१९३५ साली धर्मात्मा चित्रपट मराठी व हिंदी भाषांमधील आवृत्तींमध्ये सर्व भारतभर प्रदर्शित झाला. पुढे प्रभात फिल्म कंपनीच्या मालकांनी मास्तरांबरोबर करार करून त्यांच्याकडे 'गोपालकृष्ण' या संगीतप्रधान चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवली. १९३८ साली मराठी व हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झालेला गोपालकृष्ण हा चित्रपट व त्यातील संगीत अत्यंत गाजले. या चित्रपटापासून चित्रपटातील गाण्यांच्या स्पर्धा घेण्याची पद्धत रूढ झाली. पुढील काळात मास्तरांनी प्रभातचे संगीतकार म्हणून अमरज्योति, वहाँ, माणूस, शेजारी, लाखारानी या चित्रपटांना दर्जेदार संगीत दिले.
'कशाला उद्याची बात' आणि 'लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया' या मास्तरांनी संगीतबद्ध केलेल्या प्रभातगीतांना कालातीत गीतांच्या पंक्तीत मानाचे अग्रगण्य स्थान लाभले आहे.
वरील घडलेला इतिहास अनेक ठिकाणी नमूद केलेला आहे.