गायनाचार्य पं.भास्करबुवा बखले यांच्या समृद्ध गायकीचा वारसा चालविणाऱ्या संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव ('कृष्णा मास्तर' किंवा नुसते 'मास्तर' हे नाव अधिक प्रचलित) यांनी शास्त्रीय संगीताबरोबर नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावसंगीत, देशसंगीत व चित्रपट संगीतक्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेली आहे. परंतु 'वंदे मातरम्' हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे याकरिता मास्तरांनी भारतीय घटना समितीबरोबर अमूल्य कार्य केलेले आहे. मास्तरांच्या ह्या दैदिप्यमान कार्यास उजाळा आणून त्याची नवीन पिढीला ओळख करून देण्याचा या लेखातून केलेला हा प्रपंच.
सन १९३५च्या सुमारास पुणे येथील 'प्रभात फिल्म कंपनी' मध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून कार्यरत असताना मास्तरांनी प्रथम 'झिंझोटी' रागात वंदे मातरम् संगीतबद्ध केले व प्रभातचे दिग्दर्शक व्ही. शांताराम यांची रीतसर परवानगी घेऊन प्रभातच्या स्टुडिओत त्याचे रेकॉर्डिंगही केले. अल्पावधीतच ते गीत लोकप्रिय झाले. मास्तर सच्चे देशभक्त असल्यामुळे आपल्या अनेक गानमैफलींच्या उत्तरार्धात स्वतः संगीतबद्ध केलेल्या त्या गीताचे गायन करून आपल्या संगीत मैफलीचा शेवट करीत असत. मात्र त्याकाळातील ब्रिटिश राजवटीत वंदे मातरम् जाहीरपणे गायला सरकारी पातळीवर बंदी होती. तरीसुद्धा मास्तरांनी आकाशवाणीवरील त्यांच्या एका कार्यक्रमात नाट्यपदाला जोडून अचानक वंदे मातरम् चे गायन सुरू केले. हे लक्षात येताच स्टेशन डायरेक्टर श्री.बुखारी यांनी ध्वनिक्षेपक बंद केले. याचा परिणाम म्हणून मास्तरांनी आकाशवाणीवर गाण्यास पूर्णपणे बहिष्कार टाकला. त्याकाळी दूरदर्शनचे आगमन भारतात झालेले नव्हते म्हणून रेडिओ हेच कलावंतांचे उपजीविकेचे आणि रसिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रमुख साधन होते. मास्तरांना रेडीओवर वंदे मातरम् गाऊ न दिल्याच्या घटनेचा भारतातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पुढे स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात असताना १९४७ साली चैत्री पाडव्याला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीमुळे आकाशवाणीने मास्तरांना वंदे मातरम् गायला सन्मानाने आमंत्रित केले. तेव्हा मास्तरांनी आकाशवाणीवर वंदे मातरम् गाऊन बहिष्कार मागे घेत आपल्या रेडिओवरील सांगीतिक कारकिर्दीस पुन्हा प्रारंभ केला. पुढे आकाशवाणीच्या विनंतीनुसार नव्यानेच सुरू झालेल्या पुणे आकाशवाणीचे अधिकृत संगीतकार, शास्त्रीय गायक व सल्लागार म्हणून मास्तरांनी काही काळ कार्य केले.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी राष्ट्रगीत कोणते हे निश्चित झाले नव्हते त्यामुळे १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्रीच्या कार्यक्रमात 'जन गण मन' व 'वंदे मातरम्' ही दोन्ही गीते गायली गेली होती. डिसेंबर १९४७मध्ये घटना समितीच्या कामास सुरुवात झाली, त्यावेळी मास्तरांनी पंतप्रधान पंडित नेहरूंना 'वंदे मातरम् विषयी एक संगीततज्ञ म्हणून माझे मत ऐकावे' अशी दिल्लीला तार केली. तार मिळताच पं.नेहरूंनी मास्तरांना दिल्लीला भेटण्याकरिता व सादरीकरणासाठी निमंत्रण पाठवले. मास्तरांनी दिल्लीत घटना समितीच्या सदस्यांसमोर समुह गायनातील व केवळ वाद्यवृंदातील वंदे मातरम् ची स्वतः कष्टाने तयार केलेली एकूण दोन ध्वनिमुद्रणे ऐकवली. तसेच स्वतः तिथे प्रत्यक्ष सादरही करून दाखवली. परंतु पं. नेहरूंनी संयुक्त संघात किंवा परदेशात सहजगत्या वाजविता येईल अशा प्रकारची रचना हवी असे सुचवले. मग मास्तर मुंबई येथील पोलीस बँडचे प्रमुख सी.आर.गार्डनर ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याला या संदर्भात भेटले. मिश्र झिंझोटी रागातील हीच रचना मास्तरांनी श्री.गार्डनर यांच्या मदतीने पाश्चात्य पद्धतीनुसार बँडवर बसवून घेतली. त्याचे पाश्चात्य पद्धतीचे नोटेशन छापून घेतले. या बँडवर वंदे मातरम् च्या सादरीकरणासाठी तीन ध्वनिमुद्रिका तयार केल्या. तसेच नेव्हल बँडचे प्रमुख असलेले श्री. स्टँले हिल्स यांनी देखील ब्रास बँडवर मास्तरांची रचना पाश्चात्य पद्धतीने बसवली. याबरोबरच श्री.गार्डनर आणि श्री. हिल्स या पाश्चात्य संगीत तज्ञांचे अभिप्राय, बँड नोटेशन व वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होण्यासाठी स्वतःची संगीतकार म्हणून असलेली मते यांची मास्तरांनी पत्रके छापून घेतली. हे सर्व साहित्य आणि साथीदारांसह मास्तर पुन्हा दिल्लीत पोहोचले. तत्कालीन संसदेमध्ये घटनासमितीच्या सदस्यांसमोर मास्तरांनी वंदे मातरम् ची प्रात्यक्षिके सादर केली. १ मिनीट ५ सेकंदांचे तसेच ध्वजारोहणाच्या वेळी वाजविण्यात येणारे २० सेकंदांचे वंदे मातरम् अशी ध्वनिमुद्रणे ऐकवली.
मास्तरांच्या सर्वच संगीत रचनांमध्ये सहजसुंदरता व माधुर्य दिसून येते. या मिश्र झिंझोटी रागातील वंदे मातरम् ची संगीतरचनासुद्धा सुरेल व सर्व वयातील स्त्री-पुरुषांना सांघिकरित्या गाता येईल अशी सुलभ होती. या तेजस्वी कार्याबद्दल सर्व संसद सदस्यांनी मास्तरांचा गौरव केला. पं. नेहरूंनी देखील, "आपण देशातील सर्वश्रेष्ठ संगीतकार आहात," अशा शब्दांत त्यांचा गौरव केला.
वंदे मातरम् या गीताला राष्ट्रगीताचे स्थान मिळण्याकरता नेहरूंसह काही जणांनी घेतलेले सर्व आक्षेप मास्तरांनी आपल्या संगीत रचनांमधून खोडून काढले होते. अगदी मार्चिंग साँगसारखेही वंदे मातरम् चे गायन-वादन होऊ शकते अशी प्रात्यक्षिके त्यांनी दिलेली होती. ही सर्व मेहनत मास्तरांनी स्वखर्चाने केलेली होती. त्याकरिता मास्तरांनी खूप पैसा खर्च केला होता शिवाय अगदी स्वतः पोलीस ग्राउंडवर जाऊन मार्च साँगसाठी परिश्रम घेतले होते. परंतु स्वातंत्र्यानंतर देशात वाद नकोत अशी कदाचित राज्यकर्त्यांची भूमिका असावी. स्वातंत्र्य लढ्यातील वंदे मातरम् या शब्दांचे महत्त्व, स्थान आणि मास्तरांचे राष्ट्रगीताकरिताचे अथक प्रयत्न यामुळे वंदे मातरम् ला पूर्णपणे डावलणे राज्यकर्त्यांना अशक्य झाले. विविध राज्यप्रमुखांची मतेही वंदे मातरम् राष्ट्रगीत व्हावे या बाजूची होती. स्वतः गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांनी वंदे मातरम् चे पहिले जाहीर गायन सन १८९६मध्ये केले होते. ते या गीताचे पुरस्कर्ते होते. परंतु दुर्दैवाने सन १९४७मध्ये ते हयात नव्हते.
शेवटी २४ जानेवारी १९५०च्या घटनासमितीच्या अखेरच्या बैठकीत कोणतेही मतदान न घेता घटनासमितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रबाबू प्रसाद यांनी 'जन गण मन' हे राष्ट्रगीत (National anthem) राहिल आणि 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत (National song) राहिल व त्यास समान राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात येईल असे एकतर्फी जाहीर केले. त्यावेळी मास्तर दिल्लीतच होते. त्यांची अर्थातच घोर निराशा झाली होती. त्यांनी वंदे मातरम् हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत असावे हे स्वप्न उराशी बाळगून ते गीत राष्ट्रगीत व्हावे हा ध्यास घेतला होता व त्यासाठी अनेक वर्षे अविरत परिश्रम घेतले होते. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत झाले नाही याचा मास्तरांना जरूर खेद झाला; परंतु त्यातही वंदे मातरम् ला पूर्णपणे न डावलता त्या गीतास समान राष्ट्रगीताचा बहुमान मिळाला ही समाधानाची गोष्ट घडली होती. या निर्णयास इतर कारणांबरोबर मास्तरांनी वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होण्याकरिता दिलेला हा प्रखर सांगीतिक लढा प्रामुख्याने कारणीभूत होता.
पुढच्या काळातही मास्तर वंदे मातरम् चा प्रचार व प्रसार करितच राहिले. त्यांच्या संगीत मैफलीचा शेवट वंदे मातरम् गायनानेच व्हावा याकरिता आता संगीत श्रोते आग्रह धरू लागले होते. सन १९५३च्या सुमारास भारत सरकारतर्फे चीन भेटीवर गेलेल्या कलावंतांच्या सांस्कृतिक पथकामध्ये एक प्रमुख कलावंत म्हणून मास्तर सहभागी होतेच. त्या कलावंतांनी चीनमध्ये सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आरंभीच मास्तरांनी वंदे मातरम् चे गायन केले होते व त्यास त्यांना इतर सहभागी कलावंतांनी गायन साथ दिलेली होती. मास्तरांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् ची ध्वनिमुद्रिका महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये अनेक वर्षे (सुमारे सन १९७० पर्यंत) दररोज वाजवली जात असे. तसेच अनेक संस्थांमध्ये कार्यक्रमाच्या वेळी व सभांमध्ये ही ध्वनिमुद्रिका वाजवली जायची. शिवाय पुणे येथील महाराष्ट्रीय मंडळ, शिवाजी मंदिर आणि अखिल भारतीय हिंदु महासभा यांसारख्या संस्थांमध्ये संपुर्ण कडव्यांसहित पूर्ण वंदे मातरम् गायला मास्तरांना सन्मानाने निमंत्रित केले जाई.
आपली कला राष्ट्रहितासाठी अर्पण करणाऱ्या आणि कलेसाठी स्वाभिमान-राष्ट्राभिमान दाखविणाऱ्या मोजक्या बाणेदार कलावंतांमध्ये मास्तर कृष्णरावांचे नाव कायम अग्रणी राहिल. या तेजस्वी कार्याचा गौरव करताना पु.ल.देशपांडे आपल्या भाषणात म्हणाले, "वंदे मातरम् साठी मास्तरांनी घेतलेले परिश्रम पाहून मास्तरांनाच 'वंदे मास्तरम्' म्हणावेसे वाटते!"