डॉ.माधवी नानल यांनी संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीनिमित्त बिल्वबिभास प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'आनंदयात्री मास्टर कृष्णराव' या स्मरणिकेचे केलेले हे अभ्यासपूर्ण समीक्षण संगीत रसिक व अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारे आहे.
'आनंदयात्री मास्टर कृष्णराव' ही स्मरणिका २० जानेवारी २०२३ रोजी संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव (मास्तर) यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीपूर्तीनिमित्त ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांच्या हस्ते पुणे येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आली.
आनंदयात्री मास्टर कृष्णराव ही स्मरणिका म्हणजे जणु प्रतिभासंपन्न मास्तरांबद्दलच्या रम्य स्मृतींच्या अथांग अर्णवातील 'अमृतकलश'च! या स्मरणिकेत संगीत क्षेत्रातील बुजुर्ग कलावंत, नवीन पिढीतील तरुण कलावंत तसेच आप्तस्वकीयांचे लेख, मुलाखती, काव्य व हृद्य आठवणी समाविष्ट केलेल्या आहेत. डॉ.श्रीरंग संगोराम, ग.दि.माडगुळकर, गोपाळराव मेहेंदळे, मास्तरांचे पुत्र राजाभाऊ फुलंब्रीकर व कन्या संगीतकार वीणा चिटको यांचे यात पुनर्प्रकाशित केलेले लेख आहेत. ह्या स्मरणिकेमधून वाचकांना मास्तरांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व व अफाट सांगीतिक कार्यकर्तृत्व यांचे मनोहारी दर्शन घडते. एक विद्वान संगीततज्ज्ञ म्हणून मास्तर कृष्णराव प्रसिद्ध आहेतच; याशिवाय त्यांनी केलेल्या रागांच्या, बंदीशींच्या दर्जेदार नवनिर्मितीबद्दल माहिती मिळते. गाण्यास चाल लावताना ते त्वरित तिथल्या तिथे स्वरांची सुंदर गुंफण करून विविध चालींचे पर्याय दिग्दर्शकासमोर निवडीकरता ठेवत अशा त्यांच्या निसर्गदत्त प्रतिभाशक्तीची माहिती यातून मिळते. दोन भिन्न रागांचे कल्पकतेने मिश्रण करुन त्यांनी तिलक केदार, मंगल तोडी, देवी कल्याण, शिव कल्याण, बिल्वबिभास, जौनकली, हिंडोल बहार असे जोडराग निर्माण केले. पूर्वी पारंपरिक बंदीशींवरून संगीतकार नाट्यगीत किंवा चित्रपट गीत तयार करत; परंतु मास्तरांनी मात्र नाट्य व चित्रपट गीतांसाठी स्वतंत्र स्वररचना केल्या. तसेच स्वतःच्याच नाट्य/चित्रपट गीतांच्या चालींवरून दर्जेदार बंदीशीदेखील बांधल्या. या स्मरणिकेमध्ये पु.ल.देशपांडे यांचे ध्वनिमुद्रित केलेले जाहीर भाषण लेखी स्वरूपात समाविष्ट केले आहे. त्यात ते म्हणतात, " 'नवताम् उपैति' हे प्रतिभेचे लक्षण आहे आणि हे मास्तरांच्या गाण्यांमध्ये सतत अनुभवास येते. याचं कारण प्रतिभेचे जे अलौकिक देणं आहे ते मास्तरांना मिळालं आहे. शाळकरी ते माळकरी या सर्वांना पचनी पडेल आवडेल; पण तरीही सोपे करताना त्यातला अभिजातपणा, शास्त्रीय मांडणी हरवणार नाही याची जाण आपल्या रचनांमध्ये ठेवणारे मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर होते."
' वंदे मातरम् करता सांगीतिक लढा '
मास्तर कृष्णराव यांच्या जीवनातील एक तेजस्वी पर्व म्हणजे त्यांनी वंदे मातरम् हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासून अविरत व निर्भीडपणे दिलेला सांगीतिक लढा! मास्तरांनी वंदे मातरम् हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत होण्यासाठी सांगीतिक संघर्ष केला, त्याकार्याबद्दल श्री.मिलिंद सबनीस यांनी त्याविषयी संशोधन करून प्रदिर्घ लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की १९३५ च्या सुमारास मास्तरांनी संपूर्ण वंदे मातरम् ला चाल दिली आणि त्या गीताचे प्रभात फिल्म कंपनीच्या स्टुडिओमध्ये ध्वनीमुद्रण केले. पुढे त्यांनी मुख्यत्वे मंद्र व मध्य सप्तकात गायल्या जाणाऱ्या मिश्र झिंझोटी या रागात सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष समूहाला सांघीकरित्या सहजपणे म्हणता येईल अशा पद्धतीने त्या गीताची स्वररचना केली. झिंझोटी या रागाला मास्तर ' राष्ट्रीय राग ' असे संबोधत. पुढे त्यांनी या गीताची ध्वनीमुद्रिका प्रकाशित केली. ही रचना अत्यंत लोकप्रिय झाली. मास्तरांनी १९४७ ते १९५० या काळात दिल्लीला संसदेत घटना समितीच्या सदस्यांसमोर वंदे मातरम् हे देशाचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून प्रात्यक्षिके दिली. शेवटी अंतिम निर्णय घटना समितीचा असेल असं म्हणणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान पं.नेहरूंनी मतदान आपल्या विरोधी असेल याचा अंदाज आल्याने याविषयी मतदान आणि चर्चा होऊच दिली नाही. अखेर जन गण मन हे देशाचे राष्ट्रगीत (national anthem) आणि वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत (national song) घोषित करून राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी सरकारतर्फे तसे एकतर्फी जाहीर केले.
आज मास्तरांच्या या तेजस्वी सांगीतिक लढ्याला ७३ वर्षे पूर्ण झाली आहेत. वंदे मातरम् या गीताची एकूण सुमारे ८० संगीत रचनांमधील २३० पेक्षा अधिक ध्वनीमुद्रणे उपलब्ध आहेत. हा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे. त्यातील मास्तरांची झिंझोटी रागातील रचना विशेष लक्षात राहणारी आहे, हे मात्र नक्की! पु.ल. देशपांडे म्हणाले होते, "वंदे मातरम् करिता मास्तरांनी घेतलेले परिश्रम पाहून त्यांनाच ' वंदे मास्तरम् ' म्हणावेसे वाटते."
' बुद्ध वंदनेचे संगीत कार्य '
वंदे मातरम् सारखेच मास्तरांचे अजून एक तेजस्वी असे देशव्यापी कार्य म्हणजे त्यांनी संगीतबद्ध केलेली बुद्ध वंदना! मास्तरांनी वंदे मातरम् हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत होण्यासाठी संसदेत घटना समिती सदस्यांसमोर केलेले अथक प्रयत्न पाहून १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मास्तरांना बुध्द वंदना संगीतबद्ध करण्याची विनंती केली. ती विनंती मास्तरांनी बुद्धदेवाची सेवा या भावाने विनम्रपणे स्वीकारली. बुद्ध वंदना संगीतबद्ध करण्याचा हा भारतातील सर्वांत पहिला प्रयोग होता. त्यासाठी मास्तरांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन पाली भाषेचा अभ्यास केला व बुद्ध वंदनेतील मंत्रांचा अर्थ आधी समजून घेतला. त्यावेळी वीणा चिटको या त्यांच्या कन्या त्यांच्या बरोबर होत्या. त्यांनी या बुद्ध वंदनेच्या कोरसमध्ये गायन देखील केले. श्रीमती चिटको यांच्या 'आंबेडकर येती घरा' या दैनिक लोकमतमधून स्मरणिकेत पुनर्प्रकाशित केलेल्या लेखामधून मास्तरांच्या ह्या अभ्यासपूर्ण अशा महान कार्याची वाचकांना सविस्तर माहिती मिळते. १९५६ साली मास्तरांनी स्वरबद्ध केलेल्या व स्वतःच्या आवाजात गायलेल्या या बुद्ध वंदना त्रिशरण पंचशीलची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. ही ध्वनिमुद्रिका डॉ. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी सम्राट अशोक विजयादशमीला नागपूरमधील दिक्षा भूमी येथे संपन्न झालेल्या भव्य धर्मांतरण सोहळ्यात वाजवली.
'बहुआयामी कलावंत'
शास्त्रीय, नाट्य, चित्रपट, सुगम, देश संगीत, भक्तिसंगीत अशा विविध सांगीतिक क्षेत्रांमध्ये गायक व संगीतकार म्हणून उत्तुंग भराऱ्या घेतलेले मास्तर कृष्णराव आजदेखील त्यांच्या विविध स्वरशिल्पांमधून रसिकांच्या स्मरणात आहेत. मास्तरांनी शास्त्रीय गायक, संगीतकार, गायक नट व गुरू अशा भूमिकांमधून गुरुवर्य भास्करबुवा बखले यांची सांगीतिक परंपरा समर्थपणे पुढे चालवली. मास्तरांच्या अखंड भारतभर तीन हजारांपेक्षा अधिक मैफिली ठिकठिकाणी झाल्या. रंगसंगीत नायक असलेल्या मास्तरांची संगीत मैफल हमखास रंगणारी असायची म्हणून त्यांना 'मैफिलीचे बादशाह' म्हटले जाई. तसेच त्यांनी असंख्य शास्त्रीय व उपशास्त्रीय पदे भैरवी रागात स्वरबद्ध केल्याने त्यांना 'भैरवी के बादशहा' असे देखील प्रेमादराने म्हटले जात असे.
अत्यंत भावनाप्रधान, प्रेमळ, कट्टर देशभक्त, अध्यात्मिक, धार्मिक, आनंदी, मिश्किल, बोलके, निर्व्यसनी, कर्तव्यदक्ष, प्रतिभाशाली असे बहुगुणी कलावंत संगीतकलानिधी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या शतकोत्तर रजत जयंतीपूर्ती समारंभामध्ये बिल्वबिभास प्रकाशनातर्फे ही स्मरणिका प्रसिद्ध करुन स्मरणिकेच्या संपादक व प्रकाशक असलेल्या प्रिया फुलंब्रीकर यांनी आपले आजोबा मास्तर कृष्णराव यांना हृद्य स्मरणांजली वाहिली आहे. संदर्भ साहित्य म्हणून संगीत अभ्यासकांना महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या व रसिकांसाठीदेखील संग्राह्य असणाऱ्या ह्या दर्जेदार स्मरणिकेमुळे मराठी भाषेतील संगीत विषयक साहित्य विश्वात मौलिक भर पडली आहे. 'मेरो मन अत उल्हासा' या मास्तरांच्या स्वरचित बंदीशीसारखं उपजत आनंदी स्वभावाचं वरदान लाभलेल्या संगीतकलानिधी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या आनंदयात्री मास्टर कृष्णराव स्मरणिकेचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत!